स्त्रीचे शोषण आजही थांबलेले नाही. जन्मलेल्या अपत्याचा बाप कोण आहे हे स्त्रिला लपवून ठेवावे लागते. ते अपत्य ठराविक वयाचे झाल्यावर त्यालाही आपला बाप कोण याची उत्सुकता लागते. आपल्या बापाचे नाव ऐकण्यासाठी ते व्याकूळ असते. पण त्याची आई काही ना काही कारण सांगून नाव सांगणे टाळते. कादंबरीच्या शेवटी मात्र अभिषेक करण्याचा हक्क बजावताना त्या मुलाची आई त्याच्या बापाचे नाव सांगते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
हिंदू…? महाजन ही मराठीतील कादंबरी म्हाजन या मुळ कोकणी भाषेतील कादंबरीवरून घेतली आहे. समाजाला पोखरणारी जात, वर्ण-वर्चस्वाची कीड नष्ट होऊन निखळ मानवतेचे आल्हाददायक दर्शन साकार व्हावे हाच लेखक एन. शिवदास यांचा कादबंरीमागचा उद्देश आहे. कादंबरीतील कथानकाचा काळ हा गोवामुक्ती पूर्वीचा असल्याने त्या काळातील परिस्थिती आणि पोतुर्गीज राजवट या दोन्हीचाही प्रभाव दिसतो. त्यामुळे भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचे महत्त्व येथे अधोरेखित होते. स्वातंत्र्य, सार्वभौम आणि समतेचा विचार घटनेत मांडलेला आहे. यामुळे जुलमी राजवटीतून सर्वसामान्यांची सुटका होण्याचा आनंद अन् अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणाही या कथेतून मिळते.
गोव्यातील मंदिरामध्ये असलेली ही परिस्थिती देशाच्या अन्य भागातील मंदिरामध्येही आहे. या कथेतून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. यामुळे अशा कथांचे भाषांतर भारताच्या अन्य भाषांतही होणे तितकेच गरजेचे आहे. कोकणीतून मराठीत भाषांतरामागचा हाच उद्देश असावा असे वाटते. महाराष्ट्रातही ही परिस्थिती अन्य भागात पाहायला मिळते. देवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शनाचा अधिकार सर्वांना आहे. अस्पृश्यता निवारण चळवळ, देवदासी निर्मुलन चळवळ या अशा घटनातूनच पुढे आल्या आहेत. दलितांसह सर्वांना मंदिरात प्रवेशाचा अधिकार यासाठी झालेली आंदोलने ही यातूनच झाली आहेत. पण आजही सत्ता मुठभर लोकांच्या हातीच असल्याचे पाहायला मिळते. कायद्यातील पळवाटा काढून हक्क मिळवणारा हा समाज इतरांची आजही पिळवणूक करतो आहे. सामाजिक अन्यायाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत ते तपासावे लागेल. तरच सुनियोजित मार्गाने लढे देता येतील. हा पाठ या कथेतून मिळतो. या जुलमी सत्ते विरोधात एकजुटीने लढण्याची प्रेरणा हिंदू…? महाजन या कादंबरीतून मिळते. यासाठी याचे भाषांतर अन्य भाषात होणे तितकेच गरजेचे आहे असे वाटते.
पोर्तुगिज, कोकणी, मराठीसह अन्य भाषांचा वापर गोव्यामध्ये होता. साहजिकच या भाषांचा तेथील जनमानसावर परिणाम झाला आहे. कथानकातील काही प्रसंगामध्ये याचा उल्लेखही आला आहे. तसे प्रंसगही कथानकामध्ये लेखकाने उत्तमरित्या उठवले आहेत. उदाहरणच सांगायचे झाल्यास बागेला पोर्तुगिज भाषेत जार्दीन असे म्हणतात. पण खेड्यातून शहराकडे प्रथमच जाणाऱ्या मुलाला मुळात बाग म्हणजे काय हेच प्रथम सांगावे लागते. तो मुलगा परसबागेलाच बाग समजतो. शहराशी संपर्क नसल्याने त्याला शहरातील गोष्टींची माहिती नसते.
अन्य भाषिकांच्या संपर्कात नित्य आल्यास आपणासही त्या भाषेतील शब्द समजू शकतात. ती भाषाही आपणास थोडीफार समजू लागते. हे सांगणारे अनेक प्रसंग या कथेत आले आहेत. पण यातून या सर्व भाषांची ओळखही वाचकाला होते. वाचकाला काही कोकणी शब्द थेट वापरले असते तर समजले नसते पण भाषांतर करताना या शब्दांचे अर्थ त्याच ठिकाणी म्हणजे त्याच ओळीत कथेची लय न तुटता अगदी सहजपणे वापरले आहेत. त्यामुळे वाचकाला कथा वाचताना कोणतीही अडचण वाटत नाही. उलट त्या कथेचे सौंदर्य यामुळे वाढले आहे. कथा वाचताना आपण त्यात गुंतून जातो. आपणास कोणताही अडथळा वाटत नाही. इतक्या सोप्या आणि सुंदर पद्धतीने कथेतील शब्दरचना साकारली आहे.
दिवजा म्हणजे पाच पणत्यांचा समूह, रायस म्हणजे धर्मादेश, सापांचे निवासस्थान असलेली वारूळे म्हणजेच रोयणी, पाखले म्हणजे पोर्तुगिज सैन्यातील सैनिक, तोंका म्हणजे लांब बांबू (कोंडा) ज्याच्या टोकावर पूर्वाचाऱ्याची प्रतिमा बसवलेली असते, पयरीकर म्हणजे पाळीवाला अर्थात कामावर असणारा, रेजिदोर म्हणजे पोलिसपाटील, ओसरीवजा दर्शनी भागाला पोर्तुगिज भाषेत बल्काव म्हणतात असे विविध शब्दांचे अर्थ कथेतच सांगितल्याने अर्थ न समजण्याची समस्या उद्धभवत नाही.
भाषेचे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे प्रसंगही लेखकाने प्रेरणादायी व्हावेत असे मांडले आहेत. उदाहरणार्थ एका प्रसंगात मुले वह्यांना चोपड्या म्हणत असत परंतु मास्तर मात्र मराठी भाषा रुजविण्यासाठी वही हाच शब्द वापरत. तसेच वाचनामुळे आकलन क्षमता वाढते अशा गोष्टींचे प्रबोधन केल्याचे पाहायला मिळते. लोकशाहीचे, लोकशक्तीचे महत्त्वही अनेक प्रसंगात दाखवून दिले आहे. एक व्यक्ती युद्ध जिंकू शकत नाही पण लोकशक्ती ही प्रचंड शक्ती आहे ती व्यवस्थित रितीने संघटित केली तर कोणत्याही संकटाचा बिमोड करू शकते असे प्रेरणादायी विचार, प्रसंग कथेत वारंवार आले आहेत. अन्यायाविरुद्ध तसेच हक्कासाठी लढताना याचा कसा वापर करायचा हे सुद्धा या कथेत छोट्या छोट्या प्रसंगात दाखवले आहे. यामुळे कथा वाचनिय झाली आहे.
ही कथा म्हणजे मनोरंजन नाही तर इतिहास, कथा, दंतकथा, आख्यायिका आणि इतिहासाचा खराखूरा नसलेला कल्पित असा भाग पूर्णपणे आकलनाने कशासाठी समजून घेतला पाहीजे हे सांगणारे हे कथानक आहे. सत्यासाठी खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा देणारे हे कथानक आहे. इतकेच नव्हे तर शिक्षकांनी केवळ शिक्षक असणे उपयोगाचे नाही तर त्यांच्यात संशोधकवृत्ती हवी. तसेच त्यांनी विचारवंत होणे गरजेचे आहे असे सांगणारे हे कथानक आहे. आज जी मोठाली मंदिरे उभी आहेत. तिथे पूर्वी काय होते. मंदिरासाठीच्या जागा कुणी शोधल्या ? जर गुराख्याने मंदिराचा शोध लावला तर मग मंदिरावर अधिकार कुणाचा ? आजच्या मंदिरावर सत्ता कुणाच्या आहेत ? त्यांच्याकडे ही सत्ता कशी आली ? देव गावाचा असतो मग त्याला जातीपातील कुणी गोवले ? यातील श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा अभ्यास संशोधकवृत्तीने करायला हवा. देवाला जातीपातील जखडून ठेवले जाते या विरुद्ध या कादंबरीत आवाज उठवला आहे. देवाला यातून सोडवून मुक्त करण्याची प्रेरणा ही कादंबरी देते. या कादंबरीचे कथानक हे कोणत्या एका जातीविरुद्ध नाही तर त्या मानसिक वृत्ती विरोधात आहे. हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
देवदासी निर्मुलन झाले असले तरी समाजात आजही गरीब, श्रीमंत ही दरी कायम आहे. त्यामुळे शोषणाचा प्रकार आजही समाजात आहे. मुलाला जन्म द्यायचे अन् त्याचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा. इतकेच काय तर स्त्रीने मुलाला जन्म देऊ नये यासाठी जबरदस्तीने गर्भपात करायचा. हे प्रकार आजही समाजात आहेत. स्त्रीचे शोषण आजही थांबलेले नाही. जन्मलेल्या अपत्याचा बाप कोण आहे हे स्त्रीला लपवून ठेवावे लागते. ते अपत्य ठराविक वयाचे झाल्यावर त्यालाही आपला बाप कोण याची उत्सुकता लागते. आपल्या बापाचे नाव ऐकण्यासाठी ते व्याकूळ असते. पण त्याची आई काही ना काही कारण सांगून नाव सांगणे टाळते. कादंबरीच्या शेवटी मात्र अभिषेक करण्याचा हक्क बजावताना त्या मुलाची आई त्याच्या बापाचे नाव सांगते. कोणत्याही देवस्थानात विधी करण्यापूर्वी आई-वडील पूर्वज्यांची तसेच पती-पुत्रांची नावे सांगावी लागतात. गोत्र सांगावे लागते. ही पद्धत यासाठीच असावी.
महिलांना एकट्याने विधी करण्याचा अधिकार का नाही ? हा अधिकार आता सर्व धर्मियांना, सर्व जातींना मिळायला हवा. सर्वांना अधिकार दिले तर सर्वांना न्याय मिळेल. लपवून ठेवलेली गुपीतेही समजू शकल्याने निश्चितच अनाथांना न्याय मिळेल. केवळ देवदासी निर्मुलन होऊन चालणार नाही तर समाजातील या प्रकारांना न्याय मिळण्यासाठी देवस्थानांनी हा अधिकार सर्वांना द्यायला हवा. देवावर सर्वांचा अधिकार आहे. तेथे सर्वांना न्याय मिळतो यासाठी हा अधिकार प्रत्येक मानवाला मिळायला हवा. हेच ही कादंबरी सांगते. हा केवळ गोमंतकीय देवदासी भाविणिच्या मुलाचा संघर्ष नाही तर समस्त जाती-धर्मीयांचा, सर्व सामान्याचा संघर्ष आहे.
पुस्तकाचे नावः हिंदू…? महाजन
लेखकः एन. शिवदास
प्रकाशकः अनुबंध प्रकाशन, पुणे
पृष्ठेः २२१, किंमतः २७५