वाचन संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाटू लागली आहे. वाचनाचे महत्व आता पटवून सांगावे लागत आहे. नव्या पिढीसमोर आता माध्यम बदलले आहे. ज्ञान मिळवण्याचे माध्यम बदलल्यामुळे हा बदल आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे ।
आइकतां रुचि न विटे । पीयूषी जैसी ।। २२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते, आपला अनादिपणा (आत्मस्वरुप) पुन्हा प्राप्त होते, व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले, तरी त्याच्या बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही.
गोड आहाराचे सेवन ठराविक मर्यादेच्या पुढे होऊ शकत नाही. त्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. डोके दुखते, पित्तादी विकार बळावतात. पाणी सुद्धा ठराविक मर्यादेपर्यंतच पिऊ शकतो. त्यानंतर त्याचेही दुष्परिणाम होतात. पण अमृताचे सेवन कितीही करा त्याची गोडी काही कमी होत नाही. त्याच्या सेवनाचा कंटाळा येत नाही. अन् त्याचे दुष्परिणामही होत नाहीत. असे हे अमृत कोणाला नकोसे होईल. अमरत्व प्राप्त करून देणारे हे अमृत प्रत्येकाला हवेहवेसेच असते. त्याच्या सेवनाने रुची अधिकच वाढते. त्यामुळे ते अधिकच घ्यावे अशी मानसिकता निर्माण होते. अज्ञान जाऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते तेंव्हा हे ज्ञानही अमृतासारखेच असते. या ज्ञानाची अधिकच गोडी लागते. या ज्ञानाचा कंटाळा कधीही येत नाही. ते नित्य ओसंडून वाहायला लागते.
वाचनातून ज्ञान प्राप्त होते. पण आजकाल वाचणाची आवड कमी होताना दिसून येत आहे. मोठ मोठ्या कादंबऱ्या, मोठी मोठी पुस्तके आवडीने वाचली जायची. पुस्तक वाचून पूर्ण झाल्याशिवाय ते खाली ठेवावे असे वाटत नव्हते. त्या विचारातच माणूस गुंग होऊ जायचा. प्रवासातही त्याचे नित्य वाचन सुरु असायचे. इतकी वाचनाची गोडी होती. पण आता हे चित्र बदलताना दिसते आहे. वाचन संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाटू लागली आहे. वाचनाचे महत्व आता पटवून सांगावे लागत आहे. नव्या पिढीसमोर आता माध्यम बदलले आहे. ज्ञान मिळवण्याचे माध्यम बदलल्यामुळे हा बदल आहे. आता नव्यापिढीला व्हिजुअल हवे असते. तो वाचत नाही तर तो ऐकतो, पाहातो आहे. यातून तो ज्ञान ग्रहण करतो आहे. माध्यम बदलले आहे, पण ज्ञान ग्रहण करण्याची त्याची गोडी काही कमी झालेली नाही. हे विचारात घ्यायला हवे. फक्त ज्ञान मिळवण्याचे माध्यम बदलले आहे.
पूर्वी तो कथा वाचत होता. आता तो चित्रपटाच्या माध्यमातून ती कथा समजून घेतो आहे. त्या कथेचा आनंद तो घेतो आहे. किंवा ती कथा तो वाचण्याऐवजी ऐकण्याकडे त्याचा कल वाढला आहे. ती कथा तो ऐकू इच्छित आहे. म्हणजेच येथे फक्त साधन बदलले आहे. पुस्तकाऐवजी येथे मोबाईल हातात आला आहे आणि त्यातून तो हे ज्ञान ग्रहण करत आहे. कदाचित उद्या या पेक्षाही वेगळे माध्यम निर्माण होईल. पण त्याची ज्ञान ग्रहण करण्याची गोडी वाढतच आहे. पुस्तके नव्हती तेव्हा लोक कीर्तन, नाटक आदीच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करतच होते ना. कोणीतरी पोथी वाचत होते अन् बाकीचे त्या ज्ञानाचा आस्वाद घेत होते. ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती ही नित्य वाढतच राहाते आहे.
आत्मज्ञान प्राप्तीची ओढ जेंव्हा लागते तेव्हा ती वाढतच राहाते. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही त्याची गोडी कायम राहाते. इतकेच नव्हेतर त्याची गोडी ही वाढतच राहाते. अमृतासारखे असणारे हे ज्ञान अमरत्व प्राप्त करून देते. त्यामुळेच आजही ज्ञानेश्वरीची पारायणे केली जातात. उलट त्यांची संख्या आजही वाढत आहे. कारण यात सांगितलेले ज्ञान हे आपली गोडी अधिकच वाढवते. वारंवार वाचावे अन् ते ज्ञान हस्तगत करावे अशी ओढ लागते. आत्मज्ञानी झाल्यानंतरही त्याची गोडी कमी होत नाही. ज्ञानाची गोडी ही नित्य वाढतच राहाते. तिचा वीट येत नाही. म्हणून आत्मज्ञानी होऊनही ज्ञानाची सेवा सुरुच राहाते. बाराव्या शतकात सांगितलेली ज्ञानेश्वरी ही प्राकृतमध्ये होती. आता तिचे अर्थ समजून घेऊन ती आजही वाचली जात आहे. यापुढेही ती वाचली जाईल, कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञान देणारी भाषा ही अमर असते. म्हणूनच अमरत्व देणारे ज्ञान सांगणारी मराठी भाषा ही अमर आहे. तिची गोडी नित्य वाढतच आहे. त्या गोडीचा वीट कोणालाही येणार नाही. पण ही ज्ञानाची परंपरा नित्य सुरु ठेवायला हवी. आत्मज्ञानी परंपरेचे संवर्धन हे करायला हवे. यासाठी प्रयत्न होणे मात्र गरजेचे आहे.