प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण
कणकवली – महाराष्ट्रातील नव्या आणि गुणवंत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभा प्रकाशन, कणकवलीतर्फे दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले जातात. या वर्षीच्या ‘शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कारासाठी’ कपिलेश्वर ( ता. राधानगरी ) येथील कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
ही कादंबरी पुण्यातील दर्या प्रकाशनतर्फे प्रकाशित झाली आहे. पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पांडुरंग पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराची निवड नामवंत समीक्षक डॉ. दत्ता घोलप आणि प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांनी केली आहे.
प्रभा प्रकाशन कणकवली ही कोकणातील अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. अल्प कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील नव्या जुन्या लेखकांचे ग्रंथ प्रकाशित करून चांगलं लेखन अभिजात वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न संस्थेने केला. आता गेल्या वर्षीपासून प्रभा प्रकाशनातर्फे इतर प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील लेखक कवींच्या उत्तम ग्रंथांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. यावर्षीपासून प्रभा प्रकाशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कारासाठी पांडुरंग पाटील यांच्या ‘ नांगरमुठी’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
पांडुरंग पाटील हे ग्रामीण भागातील लेखक असून ते स्वतः शेती करतात. आपल्या शेती व्यवसायाच्या विदारक अनुभवातूनच त्यांनी ‘ नांगरमुठी’ या कादंबरीचे लेखन केले आहे. नामवंत लेखक आसाराम लोमटे यांनी या कादंबरीची पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, या कादंबरीची कहाणी एका कुटुंबापुर्ती न राहता पाहता पाहता समस्त कुळवाडींच्या आयुष्याचा नकाशा म्हणून आपल्यासमोर उभी राहते. लोकजीवनाला लाभलेले बोली भाषेचे अस्तर हे या कादंबरीचे बलस्थान आहे. आशय आणि रूपबंधाच्याही दृष्टिकोनातून ‘नांगरमुठी’ची पकड अद्वितीय आहे. वर्षानुवर्षे पडीक राहिलेल्या जमिनीत खोलवर नांगराचा फाळ घुसावा आणि त्याने कुंधा, हरळीला तळामुळातून उखडून टाकत मातीचे काळीज उघडे करावे तसा जोरकस परिणाम या कादंबरीने समर्थपणे साधला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
