November 12, 2025
परभणी जिल्ह्याच्या निसर्गरम्य काठावर नीलगायी, राजहंस, आणि विविध पक्ष्यांचे अधिवास; जैवविविधतेचा सुंदर प्रवास अनुभवणारा मनोहारी निसर्गलेख.
Home » परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार

निसर्गाचं देणं

नीलगायींचे अनेक कळप पुढ्यात उभे राहतात. त्यांच्या निळ्या पाठी पाहून जणू आकाश त्यांच्या पाठीवर उतरल्याचा अनुभव येतो. मादी, वासरं लहानशा दरीतून पुढे सरकताना दिसतात. त्यांच्या मखरीवरील लेंड्यांचं निरीक्षण करून नोंदी ठेवता येतात. जलाशयाकडील सगरीजवळ बसून त्यांना आणखी जवळून पाहता येतं.

माणिक पुरी, परभणी
मो.9881967346

प्रत्येक व्यक्तीच्या मनात निसर्गाविषयी आंतरिक ओढ असते. घनदाट जंगल, उघडं माळरान, नदीचा काठ, पाणथळ जागा आणि डोंगर माथ्यावर गेले की, मनातील फुलांचा ताटवा फुलून येतो. पुन्हा – पुन्हा हे निसर्गातील विरामचिन्ह डोळ्यात साठवून ठेवावीशी वाटतात. हे निसर्गाचे देणं आयुष्याची सुंदरता वाढवितात.

परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार लाभलेली आहे. गोदावरी नदीच्या पात्रातील ‘जांभुळबेट’ पर्यटकांना खुणावतं. त्या बेटावरील जांभळाची झाडं शेवटच्या घटका मोजताहेत हे जरी खरं असलं तरी तिथे हिवाळ्यात येणारा ‘युरोपियन रोलर’ पक्षी पाहणं किती आनंददायी असतं! त्यानं केलेला दूरवरचा प्रवास पाहून मनात धडकी भरते. अनेक डोंगर, दऱ्या, नद्या पार करत तो परभणीत दाखल होतो. त्याचं जांभूळ बेटावर असणं ही सुखकारक गोष्ट आहे. पूर्णा नदीच्या पात्रात कमळपक्ष्याची अनेक घरटी आढळून येतात. या पक्ष्यांना पाणमोर म्हणून ओळखलं जातं. ही पाणपाखरं कितीतरी वेळ मनाच्या सरोवरात विहार करतात. त्यांचा आवाज ऐकला की, आपोआप पाय नदीच्या पात्राकडे वळतात. काठावर बसून त्यांना पाहताना मोठी गंमत वाटते.

पूर्णा नदीचं पात्र आणि येलदरी परिसरादरम्यान ‘लहान चोरकावळा’ दिसला तेव्हा किती आनंद झाला. खरं तर हा समुद्रपक्षी आहे. त्याचं इथं येण्याचं कारण नाही. पण त्याच्या प्रवासाचा मार्ग हा असावा. तो महाराष्ट्रात दुसऱ्यांदा आढळला होता. परभणी जिल्ह्यातील ‘सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था जिंतूर’ या पक्ष्याच्या स्थलांतराविषयी अभ्यास करत आहे. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या मार्गाविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.

निवळीचे तळे पाणपक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. राजहंस पक्ष्याला पाहायचंय तर निवळी आणि कुडा गावालगत भटकंती करायला चला. एक नव्हे दोन नव्हे तर शंभराहून अधिक राजहंस आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात. सोबतच रोहित पक्ष्यांचा थवा आणि चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्या ठिकठिकाणी स्वागताला उभ्या असतात.

मिनखाई घार (ऑस्प्रे), गॉडविट, क्रेन, नकटा बदक, वारकरी, टिबुकली, रात्रीचर बगळा, तुतवार, धनवर अशी अनेक पाखरं निवळीच्या तळ्यात विसाव्याला येतात. हिवाळ्यात हा परिसर पाखरांच्या आवाजानं आनंदून जातो. कुडा गावातील माणसं या पाणपाखरांवर जिवापाड प्रेम करतात. निवडीचं तळं म्हणजे परभणी जिल्ह्यातील भरतपूरच !

कवडा तळ्याभोवती ‘थिकनी’ पक्ष्याचा अधिवास आढळतो. येनोली तलावात ‘शेकाट्या’ पक्ष्यांची विण अनुभवता येते. आळंद तळ्यालगत सारंगगार दिसून येतात. उजळंबा परिसरात चमचा, पाणकावळे, हळदीकुंकू बदकांच्या रांगा पाहता येतात. मासोळी प्रकल्पाभोवती अनेक पाणपाखरे भिरभिरताना दिसून येतात. खरं तर या सगळ्या पाणपऱ्याच आहेत.

इंद्रायणी माळावरील सुगरण पक्ष्यांची दुमजली घरटी पाहणं मनोहारी असतं. उदी पाठीचा खाटीक, लहान शेपटीचा खाटीक ही पाखरं माळाभोवती भेटतात. लालपंखी चंडोल, तुरेवाला चंडोल, चिमण चंडोल या पाखरांच्या आवाजानं माळरानाला जाग येते. त्यांची पिल्ले गवतातून डोकावताना दिसतात. ज्यांना चंडोल पक्ष्यांवर संशोधन करायचे आहे त्यांनी माळरानावर खुशाल फिरावं. या माळावर रातवा पक्ष्यांची नव्याने नोंद करता आली याचा मला आनंद आहे. आता माळरान रात्रीचंही जागच असतं..

मीनखाई घार (ऑस्प्रे) पाहायचा असेल तर येलदरी जलाशयाच्या बॅकवॉटर कडे जावं लागतं. तिथं बसून या शिकारी पक्ष्यांच्या नोंदी ठेवणं सोपं जातं. निम्न दुधना प्रकल्प सेलू या ठिकाणी ‘तपकिरी डोक्याचा कुरव’ या पक्ष्याची नव्याने नोंद घेता आली.

नवरंग, स्वर्गीय नर्तक, ब्राह्मणी घार, धनेश, धाविक, तांबट, सुतारपक्षी असे अनेक दुर्मिळ होत चाललेले पक्षी ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ’ परिसरात आढळून येतात. धाविक पक्ष्यांचा उत्तम अधिवास म्हणून हा परिसर ओळखला जातो. ‘आखूड बोटाचा सर्पगरुड’ आपलं लक्ष वेधून घेतो. कापसी घारीचा आवाज दूरवरूनच ऐकू येतो. ‘पिंगळा’ पक्ष्यांच्या अनेक ढोली म्हणजे कुतूहलाचा विषयच! विद्यापीठ परिसराने अनेक पक्ष्यांना आसरा दिला आहे. हरोळी, शिंपी, सुभग, कोकीळ अशा गोड गळ्याच्या पाखरांना विद्यापीठ परिसर नेहमीच खुणावतो.

चारठाणा गावालगत ‘निळ्या डोळ्यांचा मुंगशा’, ‘मानमोडी’ ही पाखरं दिसल्याने आनंदाला उधाण आलं आहे. भोगाव गावाजवळच्या झाडीत ‘टकाचोर’ पक्षी वास्तव्यास आला आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक माणसं या पाखरांवर भरभरून माया करतात हे यावरून कळू लागते.

पक्षीनिरिक्षण करणं तसं सोपं असतं. पण वन्यप्राण्यांचं निरीक्षण करणं फारच अवघड आहे असं मी मानतो. पक्षी दिवसा पाहता येतात पण वन्यप्राण्यांचा अधिवास समजून घेण्यासाठी रात्री बेरात्री भटकंती करणं जीवावर बेतू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा परभणी जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा अधिवास चांगला अनुभवता आला.

जिंतूर तालुक्यातील हंडी, वझर, धमधम, वाघी धानोरा या परिसरात तरसाचा अधिवास अनुभवता येतो. त्यांची पिलावळ पाहता येते. त्यांना शिकार खाताना पाहणं फारच दुर्मिळ असतं. पण तो अनुभव सुद्धा घेता येतो. त्यासाठी एका जागेवर बसून योगसाधना करावी लागते.

नीलगायींचे अनेक कळप पुढ्यात उभे राहतात. त्यांच्या निळ्या पाठी पाहून जणू आकाश त्यांच्या पाठीवर उतरल्याचा अनुभव येतो. मादी, वासरं लहानशा दरीतून पुढे सरकताना दिसतात. त्यांच्या मखरीवरील लेंड्यांचं निरीक्षण करून नोंदी ठेवता येतात. जलाशयाकडील सगरीजवळ बसून त्यांना आणखी जवळून पाहता येतं. रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर आलेल्या नीलगायी पाहण्याचा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपता आला.

याच माळरानावर खोकडाची विण अभ्यासता आली. खोकडाची मादी पिलांचा कसा सांभाळ करते याविषयीची रात्रीची निरीक्षणे महत्त्वाची ठरली. रात्रीचर पक्ष्यांचं आणि वन्यप्राण्यांचं सहचर्य अनुभवता आलं. त्यांच्या भाषेचा एकमेकांना कसा फायदा होतो हे कळू लागतं. माळरान उघडं असलं तरी खूप काही बोलत असतं. दिसायला उघडं असलं तरी तिथे सुद्धा धोका उद्भवू शकतो हे विसरता कामा नये.

गंगाखेड शहरालगतच्या माळरानावर लांडग्यांचा कळप अनेकदा दिसून येतो. त्यांनी शेळ्यांची आणि मेंढ्यांची केलेली शिकार अनेकदा कानी ऐकू येते. ऑगस्ट 2025 या महिन्यात 20 मेंढयांचा फडशा पाडल्याची नोंद सापडते. या वन्यजीवांचं संरक्षण महत्त्वाचं आहेच पण सोबतच शेतकऱ्यांच्या नुकसानीचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे असे मला वाटते. जिथे शेळ्या, मेंढ्या, हरिण आणि काळवीट या प्राण्यांची संख्या जास्त असते तिथे लांडग्यांचा कळप हमखास दिसून येतो.

बिबट्याचा अधिवास अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. भोगाव परिसरातील राखीव जंगल, येलदरी परिसरातील काही जंगलाच्या भागात बिबट्याने शिकार केल्याच्या खाणाखुणा सापडतात.

परभणी जिल्ह्यात 40 फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. 193 पक्ष्यांची पक्षीसूची बनविण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासाच्या नोंदी उपयुक्त ठरत आहेत. इथे घनदाट जंगल नाही पण इटोली जंगलाचा भाग घनदाट जंगल म्हणून ओळखलं जातं. तेथील दुर्मिळ वनस्पतीचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे. या जिल्ह्यातील जैवविविधता अजूनही टिकून आहे. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी ही जैवविविधता जपली पाहिजे एवढीच अपेक्षा!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading