July 27, 2024
uskondi-shrikant-patil-book-review-by-shashikant-jadhav
Home » ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी

युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात आणि कुणब्याची आव्हाने संपता संपत नाही हीच खरी खंत वाटते. शेतकरी जीवनावर प्रचंड पगडा असलेली डॉ. श्रीकांत पाटील लिखित ‘ऊसकोंडी’ ही कादंबरी ग्रामीण वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

प्रा. शशिकांत जाधव,
अध्यक्ष, शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढा

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारत देशाची कृषी संस्कृती जपत असणारा ग्रामीण भागातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. स्वतःच्या जमिनीत राबणूक करीत असताना तो स्वतः उपाशी राहून जगाला पोसण्याचा आणि जगाला अन्नधान्य पुरवण्याचे काम करत असतो. तर दुसरीकडे जागतिक क्रांती उद्भवत असताना या अल्प भूधारकाकडे कोणत्याही गर्भश्रीमंत माणसांची नजर जात नाही. भूमीत स्वप्न पेरून आकाशाला गवसणी घालणाऱ्या भू पित्याची अवस्था अशी का? हा आजतागायत चालत असलेला आणि वर्षानुवर्षे निर्माण होणारा शेतकऱ्यांपुढील गंभीर प्रश्न आहे.

आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या ज्या भागातून नदी वाहते, त्या त्या परीसरात स्वातंत्र्यानंतर अनेक दिग्गजांनी, प्रामाणिक नेत्यांनी आपल्या गाव शिवारामध्ये शासनाकडून शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सुरुवात केली. तेव्हा ऊस उत्पादकांनी गर्भ श्रीमंत होण्याची स्वप्नं पाहिली होती. पण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ती अल्पभूधारकाची स्वप्ने खरोखर सत्यात उतरली का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेती स्वच्छ करून घेत असताना शेतकरी आकाशाकडे मृग नक्षत्रासाठी परमेश्वराला विनवण्या करत असतो. प्रत्येक अल्पभूधारक एकच स्वप्न असतं की प्रत्येकाच्या शिवारात भरभरून पाऊस पडू दे, धनधान्यांनी शिवार फुलू दे. अन्नधान्याची रास प्रत्येक कुणब्याच्या घरी भरभरून वाहू दे. निसर्गाच्या आशेवर आणि निसर्गाच्या इच्छावर आयुष्यभर जगणारा हा जगाचा पोशिंदा नेहमी उपाशीच का? एका बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी, तिसर्‍या बाजूला कर्जबाजारीपणा, चौथ्या बाजूला आर्थिक कुचंबणा, पाचव्या बाजूला सावकारी, सहाव्या बाजूला रोजंदारी अशी एक ना अनेक कुचंबनेत कुणबी सापडलेला असतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक पदवीधर शेतकरी मनोहर ऊर्फ मनुदा नोकरीची वाट न पाहता आपल्या बाबांची वडिलोपार्जित जमीन पिकवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वडिलांबरोबर व आपली पत्नी शीतल हिच्या सहकार्याने आपली बागायत जमीन पोसण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. शेतकरी म्हटलं की आर्थिक संकटे येतात. या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सख्ख्या बहिणीकडून उसनवारी पैसे घेऊन तो ऊस लागवडीचे स्वप्न पाहतो.

मनुदा स्वप्न सत्यात उतरवीत असताना जयसिंगरावसारख्या सवंगड्याकडून, त्याच्या मित्रांकडून तो आपलं रान शिवार सरळ आणि स्वच्छ करतो. लागवडीसाठी लागणारे ऊस बियाणे मित्रांच्या सहकार्याने लगतच्या शेतकऱ्याकडून आपल्या शिवारात आणले जाते. शिवारात ऊस पसरवणे, रानात सरी सोडणे, ऊस बियाणाच्या कांड्या करणे, योग्य ऊस बियाणे अंथरून लागण करणे, त्याचबरोबर आपल्या कामाला आलेला कामगार हा कष्ट करून भुकेलेला असेल याची चिंता करणारा मनुदा, शिवारातील प्रत्येक कामगाराची पोटाच्या खळगीची काळजी करताना ‘ऊसकोंडी’तील मनुदा आपणास पहावयास मिळतो.

ऊस लागवडीच्या तयारीत असलेला हा मनुदा आपल्या दूध डेअरीतून आलेल्या पैशातून प्रत्येक रोजगाराची रोजंदारी भागवतो. त्यामुळे मनुदाच्या शिवारात प्रत्येक रोजंदारी कामगार प्रामाणिकपणे कष्ट करण्यात उत्सुक आहे हे लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांनी ऊसकोंडी या कादंबरीतून आवर्जून दर्शविलेले आहे. त्याचबरोबर घर ते शिवार व शिवार ते घर असे दिवसातून दोन ते तीन हेलपाटे मारणारा मनुदा कधी जनावराच्या वैरणीसाठी, कधी आबाच्या जेवणासाठी, कधी गोठा स्वच्छ करण्यासाठी, तर कधी जनावरांची धार काढण्यासाठी सायकलीवरून हेलपाटे मारणारा मनुदा आपणास ऊसकोंडी कादंबरीतून वाचकांच्या पसंतीस उतरतो.

जो कुणब्याच्या अपार कष्टानंतर कोपणार नाही तो निसर्ग कसला? दुष्काळी, अवकाळी तर कधी ओला दुष्काळ यांच्या गर्तेत सापडलेला मनुदा व त्याची ऊस लागवड या ओल्या दुष्काळामध्ये सापडते आणि मनुदाच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. गावातील ओढा नाल्याचा पूर ओसरल्यानंतर आपल्या सवंगड्यांच्या साथीने पुन्हा मनुदा अथक परिश्रमाने ऊसाची लागवड करतो. इथून त्याची लढाई पारंपरिक शेती बरोबरच रब्बीच्या हंगामात येणाऱ्या पिकासोबत सुरू होते.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर या भारत देशामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सरपंचापासून खासदारापर्यंत काही भ्रष्ट राज्यकर्ते कष्टकऱ्यांची, दीनदुबळ्यांची आर्थिक कोंडी करून पिळवणूक करतात. अशा वेळेला शिकल्या-सवरल्या युवकांनी समाजापुढे न्यायाची व हक्काची मागणी केली पाहिजे. ऊसकोंडीची लढाई या एकट्या मनुदाची नसून प्रत्येक ग्रामीण भागातील साखर ऊस पेरा करणाऱ्यांची आहे. साखर कारखानदाराच्या प्रत्येक कामगाराला बारा महिने आर्थिक वेतन मिळत असताना हे लोक शेतकऱ्यांच्या ऊस काढणीसाठी नोंदणीपासून चिटबॉयपर्यंत प्रत्येकाचे हात भ्रष्टाचाराने ओले झालेले असतात. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचा ऊस रस्त्यापासून खूप दूर असेल, तर तो ऊस घेऊन जाण्यासाठी शेजारील जमीन मालकाला विनंती करणे, मुरमाच्या ट्रॉली टाकून वाट करून देणे, उशीर झाल्यामुळे तुरा आलेला ऊस कारखान्याला विनंती करून घालवणे आणि त्यातून ऊस कारखाने वजनात काटा मारणे, त्यातून चुकूनमाकून शेतकर्‍यांच्या सातबारावर, ऊसाच्या नोंदीवर जर काही उचलीची नोंद असेल तर ऊसाचा पहिला हप्ता घेत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही.

युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात आणि कुणब्याची आव्हाने संपता संपत नाही हीच खरी खंत वाटते.

शेतकरी जीवनावर प्रचंड पगडा असलेली डॉ. श्रीकांत पाटील लिखित ‘ऊसकोंडी’ ही कादंबरी ग्रामीण वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

पुस्तकाचे नाव- ‘ऊसकोंडी’
लेखक- डॉ श्रीकांत पाटील
प्रकाशन- ललित पब्लिकेशन
पृष्ठ संख्या-१८५
किंमत- ₹२५०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

मान्सून केरळात आदळला

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading