सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे यांनी हजारो वर्षापूर्वीची कळसुत्री बाहुल्यांची कला जोपासली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहीशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम परशुराम यांनी केले. याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय…
गेली 45 वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम परशुराम गंगावणे करीत आहेत. कठीण परिस्थीतीमध्ये त्यांनी ही लोककला जतन करून ठेवली. ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम आणि कलादालन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. याची सुरुवात ३ मे 2006 ला झाली. त्यावेळी त्यांनी हे म्युझियम गुरांच्या गोठ्यामध्ये सुरु केले. या संग्रहालयात ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल, डोना वाद्य, गोंधळ, पोथराज अशा लोककलेची मांडणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक कलेला राजाश्रय दिला. यामुळे आमच्या समाजाची दारोदारी होणारी भटकंती थांबली. भीक मागून समाजाचा विकास होत नाही, हे राजांचे तत्त्वज्ञान होते. समाजाच्या विकासासाठी व कलेच्या जोपासनेसाठी छत्रपतींनी आमच्या समाजाचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने कुडाळमध्ये केळबाय, माऊली आणि वेताळ ही मंदिरे दिली. यामुळे ही कला जोपासली गेली. राज्यकारभारामध्ये महाराजांनी या कलेच्या माध्यमातून आमच्या समाजास प्राधान्य दिले. सांकेतिक भाषेतून गोपनिय संदेश वहनात राजांना आमच्या समाजाची मदत झाली. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात गोंधळ घालून प्रथम आमची भटकंती राजांनी थांबवली. ही राजाश्रय मिळालेली कला जोपासावी या उद्देशाने आमचे हे कार्य सुरु आहे.
– परशुराम गंगावणे
मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://www.freewebs.com/mounimaharaj/
सामाजिक विषयावर कलेतून जनजागृती
श्री. गंगावणे यांनी या कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयावर जनजागृतीही केली आहे. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती , स्वच्छ भारत अभियान, एड्स जागृती अशा अनेक सामाजिक विषयावर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातुन कार्यक्रम केले. या त्यांच्या कामात त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ व चेतन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणूनही नेमले आहे. गुरू शिष्य परंपरा योजने अंतर्गत त्यांनी आठ कार्यशाळेतून 150 हून अधिक विद्यार्थींना प्रशिक्षणही दिले आहे. शालेय अभ्यासक्रमात दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग ही समाविष्ट करण्यात आला आहे. पीएचडी करणारे अभ्यासक तसेच शाळेच्या शैक्षणिक सहली कला आंगणला या निमित्ताने भेटी देत असतात.
कला आंगणच्या माध्यमातून सांस्कृतीक पर्यटन विकास
गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटनचा सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे. या संग्रहालयात आता देशी विदेशी पर्यटक भेटी देत असतात. भारतात पर्यटक घेऊन फिरणाऱ्या डेक्कन ओडिसी ट्रेनच्या कार्यक्रमामध्ये गंगावणे यांच्या कलाआंगणचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा सांस्कृतीक पर्यटन म्हणून विकसित व्हावा यासाठी आदिवासी कला आंगणच्या माध्यमातुन गंगावणे काम करत असतात. मुंबई गोवा महामार्गावर गुढीपूर येथील या ठिकाणास अनेक पर्यटक भेट देतात.