November 30, 2023
Home » म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।।
विश्वाचे आर्त

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।।

टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला हवेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

इया किरीटीचिया बोला । तो जगद् बंधु संतोषला ।
म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – या अर्जुनाच्या बोलण्याने तो जगद् बंधु श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाला, अरे अर्जुना तू प्रश्न करण्याचें चांगलें जाणतोस.

भगवंताला बोलते करण्याचे सामर्थ्य अर्जुनात

समोरचा बोलत नसेल रुसुन बसला असेल किंवा रागावलाही असेल तर त्याला प्रश्न विचारावा. पण तो प्रश्न असा असावा की त्याचे बोलणे सुरु होईल. त्याचे मौन सुटावे असा तो प्रश्न असावा. तो व्यक्त होईल असा तो प्रश्न असावा. व्यक्त होईल म्हणजे तो रागवेल किंवा हल्ला करेल असे नव्हे तर त्याचा राग क्षणात जाईल. त्याचा अबोला सुटेल म्हणजे तो शिव्या शाप देईल असे नव्हे तर तो सुसंवाद साधेल. त्याचा रुसवा दुर होईल. हा प्रश्न करण्याची हातोटी आपणाला जमायला हवी. अर्जुनाकडे ही हातोटी होती. म्हणूनच अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नावर भगवंत संतुष्ठ होत. कारण अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर भगवंताला उत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करते. म्हणजेच भगवंताला बोलते करण्याचे सामर्थ अर्जुनाच्या प्रश्नात होते.

गुरुंना असे शिष्य आवडतात…

अनेक शिक्षकांना, गुरुंना प्रश्न विचारणारे विद्यार्थी खूप आवडतात. प्रश्न करणारी मुले ही कल्पक असतात. त्यांच्या बुद्धीला त्यातून चालना मिळते. त्या मुलांची कल्पनाशक्ती जागृत असते. प्रश्न केव्हा पडेल ? जेव्हा तो विषय त्या विद्यार्थ्याला आवडला असेल. थोडाफार समजला असेल. तरच त्यावर त्याला प्रश्न पडतील. विद्यार्थ्याला तो विषय किती समजला आहे त्याने तो किती ग्रहण केला आहे. किती आत्मसात केला आहे. हे त्याने विचारलेल्या प्रश्नातून समजते. त्याने त्या विषयावर किती चिंतन, मनन केले आहे हे सुद्धा त्यातून स्पष्ट होते. म्हणून गुरुंना, शिक्षकांना असे विद्यार्थी आवडतात. यामुळेच कृष्णाला अर्जुन खूप आवडत असे. गुरु-शिष्याचे नातेही असेच आहे. हे समजून घ्यायला हवे.

प्रश्न विचारण्याचे कौशल्य हवे

खोचक पश्न विचारणारे पत्रकार, मुलाखतकार राजकारण्यांना फारसे आवडत नाहीत. फिरकी घेणारे पत्रकार, मुलाखतकार नेहमी चर्चेत राहतात. खोड्या काढण्याची सवय अनेक पत्रकारांना असते. कोंडीत पकडण्यासाठी काहीजण असे खोचक प्रश्न विचारतात. या प्रश्नातून अनेक गोष्टींचा उलघडा होतो खरा पण असे पत्रकार सुद्धा अशा सवयीने अडचणीत येतात. यासाठी मुलाखत घेणारा पत्रकार खोडकर नसावा पण तो समोरच्याला बोलता करणारा जरूर असावा. त्याच्या प्रश्नांनी समोरचा चक्रावून न जाता खेळीमेळीत बोलून रंगत आणणारा असावा. अगदी सहजपणे मुलाखत देणारा उत्तर देईल असे प्रश्न विचारण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे हवे. म्हणजेच प्रश्न विचारण्याची ही वेगळी हातोटी त्याला यायला हवी.

सुसंवाद घडवणारे प्रश्न पडायला हवेत

टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला हवेत. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला प्रश्न पडत नसतील तर त्याने पत्रकारिता करू नये. कारण ज्याला प्रश्न पडत नाहीत तो पत्रकार कधीच होऊ शकत नाही. यासाठी पत्रकाराने प्रश्न कसे विचारायचे, कसे प्रश्न हाताळायचे, कसे प्रश्न निर्माण होतात याचा अभ्यास करायला हवा. त्यावर चिंतन, मनन करायला हवे. ती हातोटी शिकून घ्यायला हवी. समोरच्याला बोलते करण्याचे सामर्थ्य त्याच्यात असायला हवे. सुसंवाद त्याने साधावा यासाठी तसा सुसंवाद घडवणारे प्रश्न त्याला पडायला हवेत.

Related posts

अमरत्त्वाचे भारतीय तत्त्वज्ञान संवर्धन करणे गरजेचे

ओवी मोक्षपटाची…

धनाचा अहंकार…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More