कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी व्यक्त केले.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग, स्पेसीज सर्वायवल कमिशन व वेस्टर्न घाट स्पेशालिस्ट ग्रुप यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधतेवर परिणाम होवून त्यांची संख्या सातत्याने घटत असल्याने अशा कार्यशाळांची नितांत गरज असल्याचे सांगितले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून २७ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत पुण्यातील डॉ. अपर्णा वाटवे व आदित्य गडकरी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विविध प्रजातींच्या संकट स्थितीचे मूल्यांकन कसे करायचे याची पद्धती समजावून घेण्यात येणार आहे ज्यामुळे भविष्यात भारतातील कोणत्या वनस्पती दुर्मिळ किंवा अति दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे याची माहिती मिळण्यास मदत होईल.
प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. एम. बी. वाघमारे यांनी केले तर कार्यशाळेचे उद्दिष्ट व पाहुण्यांची ओळख कार्यशाळेचे समन्वयक डॉ. व्ही. बी. शिंपले यांनी करून दिली. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठातील जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव, डॉ. एन. व्ही. पवार उपस्थित होते. आभार डॉ. एस. ए. देशमुख यांनी मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.