July 27, 2024
A battle against the self within itself article by rajendra ghorpade
Home » स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई
विश्वाचे आर्त

स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई

हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।
सांगे झुंजावेळे सदयता । उचित कायी ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – अरे, तूं जर चांगला जाणता आहेस, तर मग आता विचार करून कां पाहात नाहीस ? युद्धाच्यावेळी कारूण्य उचित आहे काय ? बोल.

आप्त, स्वकीयांना मारून आपण राज्यसुख भोगायचे हे अर्जुनाला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. आप्त, स्वकियाबद्दल करूणा, दया उत्पन्न होणे, तसा विचार अर्जुनामध्ये येणे स्वाभाविक आहे. युद्ध करून राज्यसुख मिळवायचे, हे सर्व कशासाठी ? पण आपण भानावर यायला हवे. हे युद्ध स्वतःसाठी नाही तर प्रजेसाठी आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रजेला न्याय देणे हा राजाचा धर्म आहे. अशावेळी अत्याचारी, अधर्माचा साथ देणारे आप्त, स्वकीय, नातलग यांना मारावे लागले, धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले. तरी त्यात मागे हटायचे नसते. हे सर्व कार्य प्रजेच्या रक्षणासाठी आहे हे विचारात घ्यायला हवे.

राजाने भावनिकता बाजूला ठेवून कार्य करायचे असते. प्रजेला न्याय देण्यासाठी लढायचे असते. यासाठी हे युद्ध करणे हा त्याचा धर्म आहे. प्रजेच्या सुखातच राजाचे खरे सुख असते. प्रजा आनंदी तरच राजा आनंदी. प्रजेची सेवा हीच खरी देवाची सेवा आहे. राजाचा देव राजवाड्यातील देवघरात नसतो तर तो प्रजेमध्ये असतो. त्यांच्या न्यायहक्कासाठी हे युद्ध राजाला करावे लागते. याचे भान राजाने सदैव ठेवायला हवे. भावनिक होऊन अधर्माचा साथ देणे ही चुक आहे.

आता अध्यात्म अभ्यासताना याकडे कसे पाहायला हवे ? अर्जुनासारखेच आपणही शिष्य आहोत. संसारातील सुख-दुःखांनी आपण त्यात गुंतून पडलेलो आहोत. खऱ्या सुखाला त्यामुळे आपण मुकत आहोत. शाश्वत खऱ्या सुखासाठी हे युद्ध करायचे आहे. ही लढाई स्वतःची अन् स्वतःशीच आहे. हे समजून घ्यायला हवे. हे युद्ध जिंकून स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे आहे. हे करताना आपल्या देहाचा आपणास मोह सुटू शकतो अन् देहातच आपण अडकून पडू शकतो. त्यामुळे या युद्धात आपला पराभव होऊ शकतो. याचे भान आपण ठेवायला हवे.

स्वतः कोण आहोत हे जाणणे हा आपला धर्म आहे. हे जाणून आत्मज्ञानी होणे, हेच आपले कार्य आहे. या कार्यासाठी आपणाला हे युद्ध करावे लागते आहे. हे करताना स्वतःतील दुर्गुणच स्वतःला अस्वस्थ करतात. आपल्यातील अहंकार, मोह, माया आदी विकारच आपणाला आव्हान देतात. हे स्वतःतील असल्याने आपण भावनिक होऊ शकतो. अन् त्यांच्याशी का लढायचे असा प्रश्न आपणास पडू शकतो. देहावरील प्रेमाने आपण अंध होऊ शकतो. देहाच्या सौंदर्यासाठी आपण त्याकडे आकर्षित होऊ शकतो. विषय, वासनांच्या आहारी जाऊन मग आपण या युद्धात पराभूत होऊ शकतो.

यासाठीच स्वतःतील अर्धमी, हिंसक गुणांना, विकार, वासनांना आवर घालून भावनिकता बाजूला ठेवून हे युद्ध लढायचे असते. स्वतःचे स्वतःशीच असणारे हे युद्ध आहे. स्वतःतील दुर्गुणाविरूद्ध हे युद्ध आहे. हे युद्ध जिंकून आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. देह हे आपले राज्य आहे. यावर राज्य करण्यासाठी त्याच्यातील अर्धमाला मारायलाच हवे. स्वतःतील अधर्म स्वतःच मारावा लागतो. येथे फक्त कृष्णासारखे सद्गुरु मार्गदर्शन करू शकतात. पण हे युद्ध स्वतःच लढावे लागते. आत्मा देहापासून वेगळा आहे, हे जाणून आत्मज्ञानी होऊन स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे आहे.

काय होतयं, चालतयं की अशी मानसिकता ठेवून हे युद्ध जिंकता येत नाही. कारण अशा मानसिकतेमुळे स्वतःमध्येच आपण गुतूंन पडू शकतो. त्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. स्वतःतील हे दुर्गुणच स्वतःला आव्हान देत असतात. आत्तापर्यंत आपण चालतयं की, चालतयं की म्हणत देहाच्या प्रेमात अडकून पडलो आहोत. देहावर राज्य करायचे आहे, तर मग देहाला समजून घ्यायला नको का ? हे समजून घेताना त्यातून बाहेर पडायचे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अन् युद्धाला तयार व्हायला हवे. धर्माची अधर्माविरुद्धची ही लढाई आहे. ती स्वतःलाच लढावी लागते. राज्य सुख उपभोगण्यासाठी नव्हे तर प्रजेच्या सुखासाठी, देहाच्या खऱ्या सुखासाठी स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भव्य महत्त्वकांक्षा ठेवणारी माणसेच ठरतात असामान्य..

फळ व्यापाऱ्यांना एफएसएसएआय‘चा खबरदारीचा इशारा

पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग होतोय कमी !

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading