September 12, 2024
need the strength to face adversities with a steady mind
Home » योद्धाप्रमाणे स्थिरबुद्धीने संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य हवे
विश्वाचे आर्त

योद्धाप्रमाणे स्थिरबुद्धीने संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य हवे

भिऊन पळून जाणे हे शुराला शोभणारे नाही. साधक हा शूर योद्धा हवा. शेतकरी हा सुद्धा एक योद्धा आहे. येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य त्याने ठेवायला हवे. बुद्धी स्थिर ठेवून कार्यभाग साधायला हवा. तरच प्रगती आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

उन्हाळेनि जो न तापे । हिमवंतीं न कांपे ।
कायसेनिही न वासिपे । पातलेया ।। 346 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – उन्हाळ्यानें जो तापत नाहीं व हिवाळ्यानें जो कांपत नाहीं आणि काहीं जरी प्राप्त झाले तरीं जो भीत नाही.

शेतकऱ्यांची बुद्धी ही स्थिर असते. उन्ह असो थंडी असो त्यांचे कामावरील लक्ष विचलित होत नाही. त्याला या नैसर्गिक गोष्टींचा सामना हा करावाच लागतो. निसर्गावरच शेती अवलंबून असल्याने निसर्गाची अतिक्रमणे ही त्याच्यासाठी नित्याचीच आहेत. वादळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हा निसर्गाचा कोप नित्याचाच आहे. तसा विचारच त्याला करावा लागतो. तितके कठोर मन होणे गरजेचे आहे.

नव्या पिढीमध्ये तितकी कठोरता दिसून येत नाही. शुराचे पोवाडे जाऊन आता प्रेमाच्या गोष्टींचा मारा त्याच्यावर होत असल्याने त्याचे मन आता हळवे झाले आहे. सुख-दुःखाच्या गर्तेत तो सापडला आहे. दुःख पचवण्याची क्षमता त्याच्यात दिसून येत नाही. अशा या बदलत्या विचारसरणीमुळेच अनेक समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागे हे एक कारणही आहे. उन्हाचा, थंडीचा सामना करण्याची कुवत त्याच्यामध्ये राहिली नसल्यानेच हे प्रश्न उभे राहत आहेत.

कठीण प्रश्नांचा सामना करण्यासाठी मनही तितकेच कठोर असावे लागते. आध्यात्मिक संतांचे मनही असेच कठोर असावे लागते. तरच आत्मज्ञान प्राप्तीचे मार्ग सुकर होतात. साधना करताना शरीरात अनेक बदल घडतात. साधनेने अंग तापते. कधी कोरडे पडते. कधी मुंग्या येतात. कधी अंग दगडासारखे कठीण होते. अशा सर्व गोष्टींचा सामना करण्याचे सामर्थ्य त्याच्यात असावे लागते. अशा समस्यांनी मन विचलित होता कामा नये. अशा प्रकारांना भिऊन चालत नाही. या गोष्टींचा सामना करण्याची, या गोष्टी पचविण्याची ताकद त्याच्यामध्ये हवी.

अनेकदा चुकीच्या पद्धतीने साधना केल्याने किंवा गुरूंचे मार्गदर्शन न घेता साधना केल्याने त्रास होतो. हा सहजयोग आहे. येथे समाधी ही सहज लागावी लागते. मारून मुरगुटून साधना होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. सर्व कठीण प्रसंगांचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. हळूहळू सवयीने या गोष्टींचा सामना करण्याचे सामर्थ्य येते. अंगात हे सामर्थ्य येण्यासाठी धीर धरावा लागतो. मनाची तयारी करावी लागते.

जीवनात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येणाऱ्या गोष्टीचा सामना करण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते. बुद्धी स्थिर ठेवून कामे करावी लागतात. तरच जीवनात यश संपादन करता येते. मनाची एकाग्रता ढळू न देता काम करावे लागते. सुख असो दुःख असो मनाचा तोल ढळता कामा नये. सुखाने हुरळून जाऊ नये. दुःखाने मोडून जाऊ नये. सदैव स्थैर्य हवे. जीवनात स्थैर्य असेल तर यश निश्चित आहे. साधनेतही स्थैर्य ठेवले तर आत्मज्ञान प्राप्ती निश्चित आहे.

भिऊन पळून जाणे हे शुराला शोभणारे नाही. साधक हा शूर योद्धा हवा. शेतकरी हा सुद्धा एक योद्धा आहे. येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य त्याने ठेवायला हवे. बुद्धी स्थिर ठेवून कार्यभाग साधायला हवा. तरच प्रगती आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गोकर्णची लागवड…

शो मस्ट गो ऑन…

Saloni Art : असे रेखाटा खरेखुरे नयन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading