कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता. कळस जरी दूरवर असला तरी त्याच्याकडे पाहात ते ठिकाण गाठण्यात अडचणी येत नसत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरुनि कळसु दिसे ।
आणि भेटीचि हातवसे । देवतेची तिये ।। ३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – लोकांत तरी अशी समजूत आहे की, दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळांतील देवतेची भेटच ( दर्शनच ) हस्तगत झाली असे होते.
पूर्वीच्या काळी लोकवस्तीच्या तुलनेत वृक्षसंपदा खूप होती. आत्तासारखी दळणवळणाची साधने नव्हते. पायी चालत किंवा घोडसवारी किंवा अन्य प्राण्याच्या मदतीने प्रवास केला जात असे. अशावेळी वाटा माहीत असणे खूप गरजेचे होते. वाटा माहीत नसतील तर प्रवासात चुकण्याची शक्यता अधिक होती. वनसंपदेच्या विपुलतेमुळे लोकवस्ती कोठे आहे ? वन्य प्राण्यांचा वावर कोठे आहे ? अशा गोष्टी शोधाव्या लागत. लोकवस्तीची ओळख पटकण व्हावी याच उद्देशाने मंदिरांचे कळस हे उंच बाधले जात होते. दुरून मंदिराचा कळस दिसल्यानंतर तेथे लोकवस्ती आहे ? गाव आहे याची वाटसरूंना माहिती होत असे. संध्याकाळची आरती, घंटानाद हा अधारापूर्वी पोहोचण्यासाठी प्रवाशांना मदतगार ठरत असे.
कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता. कळस जरी दूरवर असला तरी त्याच्याकडे पाहात ते ठिकाण गाठण्यात अडचणी येत नसत. थकलेल्या प्रवाशांना देवळाचा कळस हा देवदर्शन झाल्यासारखाच वाटत असे. प्रवासातील उचित ध्येय दिसल्यानंतरचा आनंदच तो प्रवास सुखकर करतो. ते ध्येय गाठल्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच.
अध्यात्माच्या प्रवासात आत्मज्ञान हा कळस आहे. तो दिसल्यानंतर मिळणारा आनंद सर्व प्रवास सुखकर करणारा असतो. कळस दिसण्यासाठी आणि गाठण्यासाठी मात्र आपणाला भटकंती ही करावी लागतेच. वाट चुकणार नाही, भरकटणार नाही याची काळजी मात्र शिष्याने घ्यायला हवी. आत्मज्ञानाचा कळस हा त्या देवळातील देवाचे दर्शनच घडवत असतो. त्या आनंदातच त्या आत्मज्ञानाच्या देवळापर्यंत पोहोचायचे आहे. वाटेत काटे असतील, वन्यप्राण्यांचा त्रास असेल, चालुन चालुन थकवाही येतो, पण हे सर्व अडथळे दूर सारत आत्मज्ञानाचा कळस गाठायचा असतो. साधनेतील सर्व अडथळे दूर सारत आत्मज्ञानाचे दर्शन घेत, त्या अनुभुतीतूनच प्रेरणा घेत त्या मंदिरापर्यंत पोहोचायचे असते.
कळसाचे असे हे महत्त्व आहे. पण आता वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात दळणवळणाची साधनेही सहज उपलब्ध झाली आहेत. प्रवास सुखकर झाला आहे. पण तरीही आपणास कळस गाठता येत नाही. कारण वाढत्या गर्दीत, लोकवस्तीत हा कळस दिसेनासा झाला आहे. त्याची उंची कितीही वाढवली तरी तो दिसत नाही ,कारण त्या कळसाची खरी ओळखच आपण विसरलो आहोत. टोलेजंग मूर्ती, पुतळे आणि कळस उभारून अध्यात्माचा दिखावा करण्यापेक्षा खरे अध्यात्म जाणून घेऊन वाटचाल करायला हवी. तरच जीवनाचा प्रवास सुखकर होईल.
पूर्वीच्याकाळी राजे, महाराजांनी महागडे सोन्याचे, प्लॅटिनमचे कळस गरजेच्यावेळी चोरून जनतेचे रक्षण केले. जनतेला परकियांच्या तावडीतून सोडवून स्वातंत्र्य दिले. असेच पराक्रम स्वातंत्र्यसैनिकांनीही केले आहेत. ही त्यांची कृती अधर्मी होत नाही, तर उलट खऱ्या धर्म रक्षणाची कृती आहे. प्राप्त परिस्थितीत जनतेला मुक्त करणे हे त्यांचे कर्तव्य होते. तो त्यांचा धर्म होता. यासाठी त्यांनी जनतेला जागृत करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी आवश्यक संपत्तीसाठी मंदिराच्या कळसांचा आधार घेतला. ती चोरी ठरत नाही तर तो धर्म रक्षणासाठी उभारलेला लढा असतो. उलट देवळांची संपत्ती ही राजाची अन् त्याच्या प्रजेचीच संपत्तीच आहे. परकीय येऊन सत्ताधिश झाले तरी त्या संपत्तीचे खरे हक्कदार तो राजा अन् त्याची प्रजाच आहे. त्यामुळे स्वतःच्याच घरातील, राज्यातील वस्तूचा योग्य उपयोग करणे ही चोरी ठरत नाही. देव, देश अन् धर्मासाठी उभारलेला तो लढा कळसाच्या दर्शनाने यशस्वी झाला. असा हा कळस दिसताच देवळातील खऱ्या देवाचे दर्शनच घडते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.