झाडीबोली शब्दकोश निमित्ताने….
प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही प्रमाण भाषा नसते पण आता सर्वत्र एकसाथ जर शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आले तर बहुतांश लोकसंख्या एकसारखी भाषा बोलू शकेल.
अरुण झगडकर ( गोंडपिपरी) , लक्ष्मण खोब्रागडे ( मुल )
झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर
भारतातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर बारा कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. पिढ्या न् पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ‘मी मराठी बोलतो’ असे कुणी विधान केले तर ‘कुठली मराठी बोलता ?’ असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे विविध प्रकार कानांवर पडतात. भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, खानदेशी, झाडीबोली असे बोलींचे प्रकार महाराष्ट्रातील विविध भागात दिसून येतात.
झाडीबोली नावाची एक बोली महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला असलेल्या काही भागात बोलली जाते.. महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे. बोली भाषा शिक्षणात वापरली गेली नसल्याने आपल्याला शिक्षणात संवेदना आणि भावना जाणवत नाहीत. बोली भाषेतून जास्त आपलेपणा आणि गोडवा अनुभवता येतो, या भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीतला गोडवा प्रमाण भाषेत जाणवत नाही. सांगायचा अर्थ एवढाच की प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही प्रमाण भाषा नसते पण आता सर्वत्र एकसाथ जर शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आले तर बहुतांश लोकसंख्या एकसारखी भाषा बोलू शकेल.
मराठी समृद्ध करायची असेल तर बोली टिकल्या पाहिजे. बोलीतील शब्द मराठीला प्राणवायू पुरवत असतात. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीत झाडीबोली ही अनेक अंगांनी मराठीला विशिष्ट पैलू पाडणारी नवसंजीवनी म्हणून तिच्याकडे पाहणे काळाची गरज आहे. भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते. प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्ये असते. यामध्ये उपभाषा, पोटभाषा, बोलीभाषा, लिपी या सगळ्यांचा गोतावळा असतो. परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य भाषेच्या माध्यमातून केलं जातं. भाषेमुळेच संस्कृतीची देवाणघेवाण होते. पण एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होतो. त्यामुळेच की काय, भाषा हा कोणत्याही संस्कृतीच्या अस्मितेचा विषय मानला गेला आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बोलीभाषेचा शब्दकोश हे एक वरदान ठरणार आहे. विविध क्षेत्रातील, विभिन्न परिसरातील शब्द एकत्र येऊन मराठीचे शब्द भंडार समृद्ध होऊ शकेल. एका बाजूला मराठीची शब्द संपदा अपुरी पडत आहे म्हणून ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूने ग्रामीण शब्दांना तुच्छ मानायचे हा दुप्पटीपणा करून चालणार नाही. वि. का. राजवाडे यांनी सतर-ऐंशी वर्षांपूर्वी “राष्ट्रीय मराठी कोश’ नामक आपल्या लेखात यासंबंधी मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, भाषेत रूढ झालेला नवा व जुना, लुक्त व प्रचलित, राष्ट्रीय व प्रादेशिक अशा प्रकारच्या एकूण शब्दांचा अंतर्भाव शब्दकोशात असावा आणि ग्रामीण शब्द रूढ असल्यास तो निराळा स्वतंत्र शब्द मानावा.
राजवाड्यांच्या या मार्गदर्शनात बोलीतील शब्दांच्या साधारण महत्त्व त्यांनी ओळखले होते हे स्पष्ट होते. श्री. म. माटे यांनी “भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी ” या गाजलेल्या निबंधात उल्लेख केलेला आहे की, बोली भाषेतील शब्दावली शब्दकोशात आल्याशिवाय मराठी शब्दकोश पूर्ण होणार नाही. त्यासाठी बोलींचा शब्दकोश आवश्यक ठरतो. बोली ही प्राचीन मराठी पेक्षा पुरातन अथवा समकालीन असू शकते. ना. गो. कालेलकर यांच्या मताप्रमाणे तर भाषा व बोली असा भेद करणे ही संयुक्तिक नसते. एक बोली प्रमाणभूत म्हणून तिच्या ग्रंथरचना होते आणि ती प्रमाण भाषा म्हणून नावारूपाला येत असते. या भाषेने स्वतःभोवती अनेक नियमांची कुंपण केलेले आहे. त्या कारणांनी तिचा प्रवाह अरुंद झालेला आहे. भाषेला प्रवाही करण्याचे कार्य बोली करीत असते. झाडीबोली शब्दकोश यासाठी महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
झाडीबोली भाषेतील शब्दकोशात अनेक शब्दांच्या उत्पत्ती दिल्या जातात. झाडीबोलीच्या संदर्भात तर ही बोली अस्तित्वात आहे अथवा नाही हाच एक वाद विषय ठरू शकतो. पण या शब्दकोशात जे भिन्न शब्द आलेले आहेत ते पाहून या वाचकांचा सहज भ्रमनिरास होईल असे वाटते. या व्यंजनांच्या अनुपस्थितीमुळे मूळ मराठीची जी नवीन रूपांतरे होतात ती झाडी बोलीतील रूपांतर पाहून हे शब्द कसे वेगळे आहेत हे या शब्दग्रहण करू शकेल.
झाडीबोलीतील शब्दांची लय आणि नैसर्गिक सहजता मराठीला नवा साज चढविण्यात कमानीचा दगड ठरेल ,याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे. म्हणूनच मी अरुण झगडकर गोंडपिपरी व लक्ष्मण खोब्रागडे मुल आम्ही दोघांनी मिळून जे शब्द ऐकले ,अनुभवले व कधी जाणूनबुजून परिसरातील लोकांकडून जाणून घेऊन संकलन घेण्याचा सपाटा लावला, त्यातून संग्रहित झालेला खजिना आपल्यासमोर उजेडात आणायला आनंद होत असला तरी अजून यावर अधिक संशोधन होण्याची नितांत गरज आहे. म्हणजे मराठी भाषेच्या समृद्धीच्या वाटा अधिक सुलभ होत जातील. हा शब्दसंग्रह आपणास अपुरा वाटत असला तरी , आम्ही यापुढेही शक्य तितका कस पणाला लावून याकामी झाडीबोलीचे पाईक म्हणून अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करू. पण तूर्तास ही आमची सुरुवात सर्वांनी गोड मानून घ्यावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.