अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता
आई
आई असताना किंमत कळत नाही
आणि गेल्यानंतर करता येत नाही
तिचे असणे कळले नव्हते
तिचे असणे कळले नव्हते
नसणे मला छळत आहे
आई काय असते ते आज मला कळत आहे
फाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहे
फाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहे
अस्तित्वात नसली तरी अवतीभवती वास तिचा
मागेपुढे इकडेतिकडे पावलोपावली भास तिचा
अजुनही देवघरात समई सोबत जळत आहे
आई काय असे ते आज मला कळत आहे
फाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहे
रिते नशीब कोरडे भाळ वैशाखातले वर आभाळ
अनवाणी या पायाखाली फुफाट्याचा धुंडा माळ
किती मागे धावत सुटलो किती दुर पळत आहे
आई काय असते ते आज मला कळत आहे
फाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहे
माझं हसण विश्व तिच माझं दुःख तिचं रडणं
माझ्यासाठी आयुष्याचा कणकण खर्ची पडणं
बाजार फुलवून घेण्यावर हिशेब आता जुळत आहे
आई काय असते ते आज मला कळत आहे
फाटलेले आभाळ कसं वेड्यासारखं गळतं आहे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.