शाहुवाडी तालुका हा जैविविधतेने समृद्ध असून अनेक नवीन वनस्पतींचा शोध या भागातून लागलेला आहे. पिवळ्या फुलांच्या काटेसावरीचा एकमेव वृक्ष आम्हाला शाहुवाडी तालुक्यात मिळाला आहे. त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रशासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच या अस्सल देशी वूक्षाला हेरीटेज अर्थात वारसा वृक्षाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.
डॉ. मकरंद ऐतवडे
कोल्हापूर जिल्हा हा जैविविधतेने समृद्ध आहे. अलीकडेच प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आणि त्यांचे सहकारी डॉ. पांडुरंग बागम यांना शाहुवाडी तालुक्यातील बजागेवाडी येथे आकर्षक सुंदर असा दुर्मिळ पिवळ्या फुलांचा काटे सावरीचा फुललेला वृक्ष आढळला.
सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये काटेसावरीला लालसर गुलाबी फुले येतात. परंतु काही ठिकाणी संपूर्ण पिवळी फुलेही आढळून येतात. सन 1966 मध्ये सांतापाऊ या वनस्पती तज्ञांनी काटेसावरीचा संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले देणारा वृक्ष पाहिल्याची शास्त्रीय नोंद आहे. तसेच वृक्षतज्ज्ञ डॉ. अलमेडा यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्रात असे पिवळी फुले देणारे वृक्ष पाहिले आणि त्यानी अशा वृक्षांना बोम्ब्याक्स सीबा व्हरायटी ल्युटीया (Bombax ceiba var. lutea) असे शास्त्रीय नाव दिले. सन 1984 मध्ये डॉ. वर्तक व कुंभोजकर यांनी काटेसावरीचा पांढरी फुले असणारा वृक्ष पाहिल्याची नोंद आहे. वनस्पती तज्ज्ञ डॉ मधुकर बाचूळकर 2008 मध्ये चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी येथे संपूर्ण पिवळ्या रंगाची फुले असणारा काटेसावरचा वृक्ष आढळला होता. तसेच गगनबावडा रोडवर शेणेवाडी गावाच्या थोडं पुढे उजव्या बाजूला रस्ताच्या कडेस एकाच फांदीवर गुलाबी आणि पिवळी अशी दोन्ही प्रकारची फुले असलेला एकमेव दुर्मिळ वृक्ष नोंदवला आहे. त्यास रस्ते रुंदीकरण प्रकल्पात नष्ट होण्यापासून देखील वाचवले आहे.
डॉ. ऐतवडे म्हणाले की झिंग आणि रेन या शास्त्रज्ञांनी चीनमधील पिवळ्या आणि लालसर गुलाबी फुलांच्या परागीभवनाचा अभ्यास २०१९ साली केला आहे. अभ्यासांती त्यांना असे लक्षात आले कि दोन्ही प्रकारच्या फुलांमध्ये मधातील शर्करेचे आणि इतर रसायनांचे प्रमाण समान आहे. लालसर गुलाबी फुलांचे परागीभवन पक्षी करतात. परंतु पिवळ्या फुलांना मधमाशा भेट देतात. सापेक्ष वर्णक्रमीय परावर्तनातून त्यांना असे दिसून आले की पक्षी आणि मधमाश्या दोघेही पिवळी फुले ओळखू शकतात. पण ज्यावेळेस पक्षांची भेट कमी असते त्यावेळी मधमाशा या फुलांना भेट देऊन पक्षांची कमतरता भरून काढतात. लालसर गुलाबी फुलांपेक्षा पिवळ्या फुलांमध्ये फळधारणा कमी असते. या सर्व अभ्यास आणि निरीक्षणानंतर झिंग आणि रेन यांनी असा प्रस्ताव मांडला की पिवळी फुले विविध परागीभवन करणाऱ्या किटकांना आकर्षित करून परागीभवनाला चालना देतात आणि लालसर गुलाबी फुलांना मधमाश्यांच्या त्रासापासून वाचवतात.
काटेसावरचे वनस्पतीशास्त्रीय नाव बॉम्बॅक्स सीबा (Bombax ceiba) असून तो जास्वंद कुळातील वृक्ष आहे. बॉम्बॅक्स म्हणजे कापूस. सीबा हे जातीनाम दक्षिण अमेरिकेतल्या नावावरून तयार केलं गेलंय. याला शाल्मली असे संस्कृत नावही आहे. हिंदीमध्ये त्याला सेमल किंवा रगतसेमल म्हणतात. इंग्रजीमध्ये रेड सिल्क कॉटन ट्री आणि रेड कपोक अशी नावे आहेत. भारताप्रमाणेच श्रीलंका, म्यानमार, दक्षिण अमेरिका, चीनच्या काही प्रदेशातील पानझडी जंगलात काटेसावर आढळतो. हा वृक्ष १५ ते २५ मीटर उंच वाढतो. मोठ्या वृक्षाला काहीवेळा बट्रेस रूट अर्थात आधारामुळे असू शकतात. याच्या खोडावर आणि फांद्यांवर काटे असतात. याची पाने संयुक्त असून त्यावर ३ ते ७ पर्णिका असतात. याची फुले आकर्षक, मोठी लालसर गुलाबी किंवा क्वचितच पिवळया रंगाची पाहावयास मिळतात. फळे बोंड प्रकारची असून त्यात कापूस आणि बिया असतात.
काटे सावरचे विविध उपयोग:
१. सावरीच्या डिंक हा मोचरस म्हणून ओळखला जातो. त्याचा उपयोग हा जुलाब, आव आणि रक्तस्रावामध्ये करतात.
२. अर्श रोगात फुले, खसखस, साखर आणि दूध याबरोबर देतात.
३. पानाचा लेप सुजलेल्या गाठीवर लावतात.
४. प्लिहा रोगामध्ये फुलांचा काढा रात्री तयार करून ठेवावा आणि सकाळी मोहरीचे चूर्ण घालून द्यावा.
५. कोवळी फळे उत्तेजक, मूत्रजनक आहेत.
६. सावरीच्या कापूस जो शेवरीच्या कापूस म्हणूनही ओळखला जातो. हा कापूस गाड्या उशांमध्ये भरण्यासाठी उत्तम समाजाला जातो. सिमला या नावाने तो युरोपातही निर्यात केला जातो.
७. याच्या बिया (सरकी) गुराना खायला देतात. आदिवासी भागात फुले आणि कळ्यांची भाजी करून खातात.
८. सावरीच लाकूड हलकं, मऊ, आणि कुजणारा असल्यामुळे त्याचा उपयोग प्लायवूड, चहाची खोकी, पादत्रानांच्या उंच टाचा बनविण्यासाठी करतात.
९. कागदाचा लगदा हा वृत्तपत्रासाठी चांगला समाजाला जातो.
१०. अंतर्सालीचा उपयोग दोरखंड करण्यासाठी होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.