जोतिबा डोंगरावर राजर्षी शाहू महाराजांनी भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडे लावली होती. ३ डिसेंबर १९०७ च्या आदेशानुसार या झाडांना पाणी मिळावे म्हणून विशेष खर्चासाठी ८७ रुपये मंजूर केले होते. महाराजांनी झाडांच्या रखवालीसाठी पगारी लोकांची नेमणूक केली होती. याबरोबरच ज्या त्या गावाच्या हद्दीतील झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी तिथल्या पोलीसपाटलांवर सोपविली होती.
डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे , सहाय्यक प्राध्यापक,
वनस्पतीशास्त्र विभाग, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय,
मलकापूर-पेरीड, मो. 8208437839 / 8552958096
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शेती आणि निसर्ग विषयक कार्य
भारत हा कृषीप्रधान देश आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने शेती व उद्योगधंद्यात आधुनिकीकरणाचा स्वीकार करून शास्त्रीय पायावर आधारित नवनवे प्रकल्प हाती घेतले. पण आधुनिकीकरणाची खरी सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीतच सुरु केली. छत्रपती शाहू महाराजांची कारकीर्द १८९४ ते १९२२ अशी २८ वर्षांची झाली. या कारकीर्दीतील काही ठळक घटना लक्षात घेतल्या तर महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन दिसून येतो. शाहू महाराजांचा स्वभाव वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारलेला, परंपरा जपणारा, रयतेची काळजी घेणारा आणि बोले तैसा चाले असा होता. परदेश दौऱ्यात त्यांनी युरोपमध्ये शेती शास्त्रीय पद्धतीने करून अन्नधान्याचे उत्पादन आपल्यापेक्षा अनेक पटीने जास्त घेतले जाते हे पाहिले होते. आपल्या शेतकऱ्यांच्यातही आधुनिकतेचा प्रसार व्हायला पाहिजे या दृष्टीने शाहू महाराजांनी अनेक उपक्रम हाती घेतले. शाहू चरित्रकार धनंजय कीर यांनी शाहू महाराजांना भारतातील हरितक्रांतीचा अग्रदूत असे संबोधले आहे.
छत्रपती शिवरायांच्या परंपरेचा पाईक
छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराबाई ही राजर्षी शाहू महाराजांची महान दैवते होती. शिवरायांच्या तेजस्वी परंपरा असलेल्या गादीवर आपण आलोत याचा शाहू महाराजांना अभिमान होता. राजाने प्रजेची काळजी आपल्या लेकराप्रमाणे घ्यायची असते याची जाण शाहू महाराजांना होती. ज्याप्रकारे शिवाजी महाराज रयतेची काळजी घेत तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे माफक दरात तसेच मोफत देऊन शेतकऱ्यांच्या कल्याणाची आपली वडिलोपार्जित परंपरा सुरूच ठेवली. शेतीतील आधुनिक संकल्पना शाहू महाराजांनी अमलात आणल्या आणि हिंदुस्थानात खऱ्या खुऱ्या लोकसत्तेचा पाया घातला. प्रजेबद्दल शाहू महाराजांना किती कळवळा वाटत असे हे शाहीर विठ्ठल रामजी डोणे यांनी केलेल्या पुढील वर्णनावरून कळते.
जाऊनि शेतसारा पाहूनि शेतकरी लोकांस
काय पाहिजे कोणास असा करूनि तपास
जसा आपुल्या पिल्लास माता घालिते घास
तसे पुरते साह्यास देई श्री शाहू प्रभू भोसले ….
शेतकऱ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले:
शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा दूर करण्यासाठी महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. तसेच खेडेगावातील शाळांमध्ये शेतीविषयक शिक्षण देण्याचीही सोय केली. जर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान करायचे असेल तर त्याला शिक्षणाची गरज आहे. यासंदर्भात शाहू महाराज म्हणतात-
” हल्लीच्या काळी शेतकी इतकी काही पद्धतशीर झाली आहे कि, ज्याला त्यात यश मिळवायचे आहे त्याला या विषयावरील पुस्तके वाचता आली पाहिजेत व समजली पाहिजेत.”
शाळा व शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम सुरु केला. जून १९०० मध्ये शेती तंत्रज्ञानाची माहिती देणारे ‘कृषीकर्म’ नावाचे ३२ पानाचे मासिक सुरु केले. ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ हे या मासिकाचे ब्रीदवाक्य होते. यावरून महाराजांनी शेतीला किती प्राधान्य दिले होते हे समजून येते. सुधारित शेतीचा प्रसार करण्यासाठी शाहू महाराजांनी १९१२ साली कोल्हापुरात ‘किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इंस्टीट्युटची’ स्थापना केली व खास शेती अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या.
शेतकरीच माझे मालक
राजर्षी शाहू महाराजांच्या मनाचा मोठेपणा व त्यांच्या हृदयातील शेतकऱ्यांचे स्थान काय होते हे त्यांनी परेल येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणातून समजून येते. धनंजय कीर यांनी या भाषणाची साम्यता १९१७ साली लेनिनने केलेल्या भाषणाशी केली आहे. महाराज म्हणतात-
“छत्रपतींची गादी तरी कोणी मिळविली ? मावळे वगैरे शेतकऱ्यांनीच ना? शेतकरी म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो. त्यांच्या विषयीचे प्रेम माझ्या धामन्या धमन्यांतून खेळत आहे. माझ्याकडून सेवा घेण्यास तुम्ही कचरू नका.” अशा प्रकारे स्वतः मालक असले तरी शाहू महाराज शेतकऱ्यांनाच आपले मालक समजत होते.
सावकारकीच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्याची “दिवाणी दाव्याने सावकाराने शेतकऱ्यांचं गुराढोरांची लिलाव करू नये” या कल्याणकारी आज्ञापत्राने सोडवणूक केली. महाराज सिंहासनापेक्षा शेतकऱ्यांच्या घोंगड्यावर बसण्यात, त्यांच्या घरातील मीठ भाकर खाण्यात, शेतकऱ्यांच्या घोळक्यात गप्पागोष्टी करण्यात धन्यता मानत होते.
शाहू महाराजांची कल्पकता: निर्धोक उसाचा घाणा
त्या काळात उसाच्या घाण्यामध्ये ऊस लावणाऱ्याचा हात सापडून मोठी दुखापत झाल्याच्या पुष्कळ घटना महाराजांच्या नजरेस आल्या. त्यावर उपाय म्हणून शाहू महाराजांनी हात न सापडेल असा सुधारित निर्धोक उसाचा घाणा शोधून काढणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारा हुकूम १ जून १८९५ रोजी काढला. यानुसार धोका नसलेल्या अनेक घाण्याचे नमुने आले. त्यातील मे. शानन या इंजिनियरची युक्ती पसंत पडल्याने त्याला मान्यता देण्यात आली. या घाण्याचा नमुना शेतकऱ्यांना-उसकर्याना पाहता यावा म्हणून सर्व पेठ्यांच्या मामलेदाराना व मालकरी यांचेकडे पाठविण्यात आला. वर्षअखेरीस अशा प्रकारच्या घाण्याचा किती लोकांनी प्रत्यक्ष वापर केला व किती लोकांनी नाही याचा तपशीलही मागविण्यात आला.
आपल्या संस्थानात तयार होणारा गूळ उत्कृष्ट प्रतीचा आहे. पण हा गूळ राजापूरच्या बाजारात जाऊन पुढे वितरित केला जाई त्यामुळे तो राजापुरी गूळ म्हणून प्रसिद्ध होता. गूळ कोल्हापूरचा आणि नाव राजापूरचे ? महाराजांनी ही परिस्थिती बदलायचे ठरविले. आणि शाहूपुरी व्यापार पेठेची निर्मिती झाली. शाहूपुरीची भरभराट एवढी झाली कि १९०९-१० या एका वर्षात ५० लाख रुपयांचा कोल्हापुरी गूळ अन्यत्र पाठविण्यात आला.
प्रयोगशील राजा :
प्रयोगशीलता हा आधुनिकतेचा पाया असतो. शाहू महाराजही प्रयोगशील होते. शेतीमध्ये नवनवीन लागवडीचे प्रयोग त्यांनी संस्थांनातर्फे करविले व स्वतः जातीने यात लक्ष घातले. पन्हाळा परिसरातील लोकांनी कुमरीच्या लागवडीची मारक अडचण महाराजांपुढे मांडली. यावर तोडगा म्हणून महाराजांनी या परिसरात चहा व कॉफी यांच्या लागवडीचे प्रयोग करायचे ठरविले. पन्हाळा पेट्यातील पेंढखले या गावी मृगनक्षत्राच्या सुरुवातीला २००० रोपांची म्हैसुरी पद्धतीने लागवड करण्यात आली. त्यानंतर भुदरगड पेठ्यातही कॉफीच्या लागवडीचे प्रयोग करण्यात आले. कॉफीबरोबरच महाराजांनी चहाच्या लागवडीकडे जातीने लक्ष दिले. कांग्रा व्हॅली व निलगिरीहून चहाचे बी आणून पन्हाळा परिसरात लागवड करण्यात आली आणि त्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. राधानगरी येथे देखील चहाची लागवड करण्यात आली होती. शाहुनगरीत उत्कृष्ट दर्जाचा चहा उत्पादित होऊ लागला. या चहाचे नाव ‘पन्हाळा टी नं. ४‘ असे ठेवण्यात आले. हा चहा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आवडीचा होता. शाहूमहाराजांच्यानंतर या चहाच्या शेतीकडे दुर्लक्ष झाले आणि कोल्हापूरचा पन्हाळा टी नं. ४ चहा इतिहास जमा झाला.
चहा-कॉफी बरोबरच महाराजांनी बुन्दा, वेलदोडे, कोरफड, कोको, रबर, ताग, अंबाडी, बेळगावी बटाटे, लाख, शिंगाडे, टॅपिओका, कापूस, हिरडा, जांभूळ, काजू, आंबा, फणस, मोह, तुती, केळी इ. तसेच औषधी आणि सुगंधी द्रव्य देणाऱ्या वनस्पतींची यशस्वी लागवड केली होती.
शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराजांनी अनेक शेतीशी निगडित प्रदर्शने गावागावात भरविली. शेती कशी असावी, शेतीविषयक पुस्तकी ज्ञान तसेच त्याबद्दलची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी शाहू महाराजांनी आदर्श शेती (मॉडेल फार्म)चेही प्रयोग केले होते.
स्वतःच्या युवराजला कृषिविद्या शिकण्यासाठी विलायतेला पाठवले:
ज्या कुर्मी क्षत्रिय समाजाने शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली त्यांची सामाजिक परिषद १९ एप्रिल १९१९ रोजी कानपुर येथे भरली होती. अध्यक्षीय भाषणामध्ये महाराज शेतीविषयी म्हणतात-
“कृषिकर्म वाईट अथवा हलके असे मी मुळात मनात नाही. मी माझ्या युवराजालाही (राजाराम महाराज) कृषिविद्या शिकण्याकरिता विलायतेला आणि अलाहाबादला कृषिस्कूलमध्ये पाठविले होते. आपल्याला माहीतच आहे कि कृषिकर्मापासून दुहेरी उन्नती होते. स्वतःला सुख होऊन सर्व मानवजातीलाही सुख मिळते. कृषी कर्माबरोबर पशुपालन आणि रक्षण याचाही संबंध येतो ……… “
यातून आधुनिक शेतीविषयी शिक्षण देण्याची सुरुवात महाराजांनी स्वतःच्या घरापासून केली त्याबरोबरच महाराजांचे शेतीविशषयीचे दृष्टिकोन आणि भूतदया या दोहोंचा संगम पाहावयास मिळतो.
शिकार रद्द केली:
५ ऑगस्ट १९१५ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी क्लाउड हिल याना रायबाग येथून एक पत्र लिहिले आहे, यामध्ये महाराज म्हणतात ” मी एका लहानशा ठिकाणी शिकारीला आलो आहे पण येथे शेतामधील पिके वाढल्यामुळे मी शिकार करू शकत नाही” अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून महाराजांनी शिकार करण्याचा मनसुबा रद्द केला.
राजर्षी शाहू महाराज आणि वन्यजीव रक्षण
छत्रपती शिवाजी महाराजांनी वन संरक्षणाचा संदेश आज्ञापत्रातून दिला आहे. खास राखीव जंगले निर्माण करण्याची परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केली आणि हि परंपरा भारतातील इतर सर्व राजेरजवाड्यांनी स्वीकृत केली. वन्यजीवांच्या प्रजनन काळात शिकारी केल्या नाहीत. ज्यामुळे राखीव जंगलातील प्राण्यांचे संगोपन आणि संवर्धन झाले. स्वातंत्र्यानंतर हि जंगले टिकून राहिली आणि त्यांचे रूपांतर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूरसारख्या अभयारण्यामध्ये झाले. मैसूरच्या वडियार राजाचे बंदीपूर, अलवर राजाचे सारिस्का, जयपूर राजाचे रणथम्बोर, भरतपूर संस्थानचे केवलादेव घाना, त्रावणकोर राजाचे पेरियार, बिहारच्या राजाचे पलामू हि सारी त्याकाळातील संरक्षित अरण्ये आज राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये बनली आहेत.
राजर्षी शाहूंनी शिकारीसाठी केलेले कायदे कानून:
संस्थानकाळात शिकारीचा छंद असला तरी शाहू महाराजांनी शिकारी विषयी तसेच पाळीव जनावरांविषयी कडक कायदेकानून बनविले होते. शिकारीचा पास असल्याशिवाय कोरवी लोकांस शिकारी जनावरे मारण्यास महाराजांनी मनाईची ताकीदिचा १९०२ रोजी हुकूम काढला होता. २६ मे १९०२ रोजीच्या जाहीरनाम्यात करवीर इलाख्यात कोणत्याही प्रकारची शिकार पासाशिवाय करणेची नाही. ज्यास लहान अगर मोठी कसलीही शिकार करणेची असेल त्यांनी त्या त्या प्रकारची शिकार करणेबद्दल पास घेतल्यावर करणेची आहे. हा पास दरवर्षी नवीन घ्यावा लागेल. परवानगीशिवाय शिकार केल्यास कलम १८८ प्रमाणे काम चालविण्यात येईल अशी नोंद आहे. राधानगरी येथील महादू जिवबा पाटील याने बिगरपासी डुक्कर मारले होते. त्याचेवर १८ जुन १९१० रोजी जंगल कानून कायद्याप्रमाणे खटला चालून त्यास ७ रुपये दंड केला होता. बंदूक बिगरपासी असलेने ती सरकारात जमा करून घेतली होती.
जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीत किंवा शेतात घुसखोरी करू नये म्हणून केलेल्या उपाययोजना
हत्ती, गाव, वाघ, बिबट्या किंवा इतर जंगली प्राणी मानवी वस्त्या तसेच शेतामध्ये येऊन नुकसान करणाऱ्या घटना आजच्या विज्ञान युगात सर्रास पाहावयास मिळतात. शाहू महाराजांच्या काळातही अशा घटना घडत होत्या. त्यासाठी त्यांनी योग्य उपाययोजना केल्या होत्या. राधानगरी येथे गावाच्या हद्दीत हत्तीमहाल बांधलेला होता. हत्तीमुळे लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून त्या इमारतीच्या आवारातील जमिनी सरकारात घेतल्या होत्या. १९११ मध्ये एक जाहीरनामा काढण्यात आला होता. त्यानुसार करवीर इलाख्यात जागोजागी शिकारीच्या संबंधाने जंगलात रानडुकरे राखलेली होती. हि रानडुकरे आजूबाजूच्या शेतात जाऊन पिकाची नासाडी करत होती. अशी डुकरे शेतकरी लोकांनी त्यांच्या शेताच्या हद्दीत बंदुकीशिवाय इतर साधनांनी मारावयाची आहेत अशी नोंद आहे. डुक्कर सोडून इतर शिकारी जनावरे मारण्यास मनाई केली होती. याबरोबरच शिकारी जंगलात उनाड जनावरे चरताना आढळल्यास, अतिक्रमण केल्यास जंगल कानून कलम ५२ प्रमाणे दुप्पट दंड आकारण्यात आला होता (१९१९). जेणेकरून जंगल व्यवस्था सुरळीत चालून लोकांमध्ये चांगली दहशत राहील.
राजर्षी शाहू निर्मित पार्क आणि अभयारण्ये:
राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानात कात्यायनी पार्क, चिप्री पार्क, रेंदाळ पार्क उभे केले होते. या पार्कसाठी लोकांकडून ज्या जमिनी घेतल्या होत्या त्याचा योग्य मोबदला देण्याचा हुकूम महाराजांनी काढला होता. चिप्री पार्कमध्ये हरणे वगैरे शिकारी जनावरे सोडून जंगल वाढविण्याचा आदेश शाहू महाराजांनी दिला होता. तसेच बऱ्याचदा या पार्कमधील होणारी हरणांची बेकायदा शिकार रोखण्यासाठी २५ रुपयेपर्यंतचा दंडाची तजवीज केली होती. महाराज्यांच्या संरक्षित अभयारण्यात काळवीट, हरण, ससे, रानडुक्कर तसेच इतर अनेक स्थलांतरित प्राणी आणि पक्षी आढळत होते.
या सर्वात वैशिट्यपूर्ण अभयारण्य म्हणजे कोलिक येथील “शिवारण्य” हे संरक्षित जंगल. जंगलातील प्राण्यांनी त्यांच्या सीमेबाहेर जाऊ नये म्हणून ३० मैल लांबीचा १२ फूट रुंद आणि १५ फूट खोलीचा खंदकच तयार करून घेतला होता. या अभयारण्याला किल्ल्यासारखे स्वरूप असून त्यास दोन प्रवेशद्वारही होती. याच अभयारण्यात महाराजांनी परदेशातून आणलेले रानहत्ती वास्तव्यास होते. हत्ती या जंगलात प्रजनन करीत. या अभयारण्यातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तलावही बांधण्यात आला होता.
१८९४ मध्ये बालिंगा येथे ८ एकर जमीन वनौषधी बाग करण्यासाठी फोरेस्ट ऑफिसच्या ताब्यात दिली होती तसेच कात्यायनी येथे बोटॅनिकल पार्क देखील शाहू छत्रपतींनी निर्माण केला होता.
जंगल संरक्षण:
जंगल संरक्षणासाठी शाहू महाराजांनी जंगलांचे दोन प्रमुख विभाग केले होते. पहिले राखलेले जंगल तर दुसरे संरक्षित जंगल. राखलेल्या जंगलात फोरेस्ट ऑफिसरच्या परवानगीशिवाय कोणतेही कृत्य करण्यास मनाई होती. तसेच आग लावणे, विस्तव नेणे किंवा पेटवणे यासारख्या दुष्कृत्यावर बंदी होती.
या प्रमाणेच संरक्षित केलेल्या जंगलामध्ये फोरेस्ट ऑफिसरने जाहिरात काढल्यावरच फुले-फळे-पाने-गवत-कंद काढण्यास परवानगी होती. राखीव किंवा संरक्षित जंगलाचे जर कोणी नुकसान केले तर कोर्ट जी शिक्षा देईल त्याखेरीज सहा महिने दंड किंवा ५०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी दिल्या जातील अशी तरतूद केली होती.
एखादया व्यक्तीने जंगल सुधारणा किंवा बंदोबस्ताच्या कामात मदत केली तर त्याला ५० रु. किमतीची लाकडे बक्षीस देण्याचा नियम शाहू महाराजांनी केला होता. जंगल संरक्षणामध्ये रयतेने उत्सुफुर्त सहभाग घ्यावा हा या मागचा हेतू होता.
१९०० साली रस्त्याच्या बाजूची झाडे, फांद्या, पाने, शिरी, मुळया, कोंब हे ज्या खात्याच्या ताब्यात आहे त्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणी तोडले किंवा झाडांची वाढ खुंटेल असे कृत्य केले तर तो व्यक्ती शिक्षेस पात्र होईल, असा जाहीरनामा राजर्षी शाहू महाराजांनी काढला होता.
एकदा झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराने पन्हाळा येथील घाणेरी तोडण्याची परवानगी महाराजांकडे मागितली, त्यावेळी महाराजांनी पुढीलप्रमाणे निकाल दिला –
” सदरहू जातीची झाडे तोडू द्यावीत पण ती झाडे तोडताना इतर झाडे तुटणार नाहीत याचा बंदोबस्त ठेवावा.”
या काळात कळंबा तलावाचे पाणी पाटाने शहरात यायचे. या पाटामध्ये झाडांच्या मुळ्या आल्या होत्या त्याविषयी महाराज म्हणतात –
“मुळ्या तोडल्या तरी त्या पुन्हा पाटात येणार आणि झाडे तोडलेपासून विशेष उपयोग न होता यावरील छाया नाहीशी होईल सबब पाटात लोखंडी नळे घालणे सोईचे होईल” यातुन झाडांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत तळमळ दिसून येते.
१९१२ साली शाहू महाराजांनी तोरगल जहागिरीतील जंगलाच्या व्यवस्थेचा ठराव केला होता. जंगलाचे नुकसान होऊ नये म्हणून त्या परिसरातील लोकांना परवाना (पास) देऊन घरखर्चापुरता लाकूडफाटा मोफत देण्यात येत होता. तसेच लाकूड विक्रीवर ज्यांचा उदरनिर्वाह आहे अशा लोकांना पास दाखवून लाकूड घेण्याची परवानगी होती. हद्दीबाहेर लाकूड जाऊ नये म्हणून तजवीज केली होती. आणि नेल्यास योग्य मोबदला घेण्याची व्यवस्था महाराजांनी केली होती. गावाचे पाटील, कुलकर्णी तसेच जहागिरीतील नोकर यांना या सर्वावर लक्ष ठेवण्याचे आदेश महाराजांनी दिले होते.
जोतिबा डोंगरावर राजर्षी शाहू महाराजांनी भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडे लावली होती. ३ डिसेंबर १९०७ च्या आदेशानुसार या झाडांना पाणी मिळावे म्हणून विशेष खर्चासाठी ८७ रुपये मंजूर केले होते.
महाराजांनी झाडांच्या रखवालीसाठी पगारी लोकांची नेमणूक केली होती. याबरोबरच ज्या त्या गावाच्या हद्दीतील झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी तिथल्या पोलीसपाटलांवर सोपविली होती.
चित्त्याच्या पैदाशीचा प्रयोग:
रायबाग येथे महाराजांनी पशुनिपज केंद्र उभारले होते. या केंद्रात बंदिस्त जागेत चित्त्याच्या पैदाशीचा प्रयोग महाराजांनी केला होता. कोल्हापूरजवळ सोनतळी येथे महाराजांनी जनावरांच्या पैदाशीसाठी पॅडॉक उभे केले होते. यामध्ये विविध प्राणी आणि पक्षांमधील संकर त्यांनी घडवून आणले होते. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून खेचाराच्या काही जातीही तयार केल्या होत्या. ज्यामध्ये अशाच पद्धतीने सोनतळी येथे उत्तम जातिवंत घोड्यांच्या पैदाशीसाठी स्टडफार्म उभाराला होता.
वरील सर्व संदर्भ पाहता पूर्वीचे राजेरजवाडे वन्यजीवांच्या शिकारीबरोबरच त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबतहि सजग आणि आग्रही होते. त्यासाठी त्यांनी विविध कायदे-कानून बनवून वेळोवेळी त्यांचे काटेकोर पालन देखील केले होते. आजच्या काळात शाहूकालीन प्रयोग, अनेक कायदे-कानून आणि नियमांची अंमलबजावणी केल्यास भारतातील वनसंपदेचे क्षेत्र वाढून वन्यजीवांचे संरक्षण होण्यास नक्कीच मदत होईल. जेणेकरून आपला भारत जैवविविधतासंपन्न होईल अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.
शाहू महाराज आणि जोतिबा येथील रेशीम कारखाना:
जोतिबा येथील दख्खनचा राजा श्री केदारनाथ देवाच्या पूजेमध्ये देवासाठी रेशमी महावस्त्र वापरले जाते. यासाठी राजर्षी शाहू छत्रपतीनी इ.स. १९०९ च्या सुमारास जोतिबा डोंगरावरच रेशमाचा उत्पादनाचा कारखाना चालू केला होता. आजही राजेशाही थाट, बैठी पूजा, घोड्यावरील पूजा अशा विविध पूजामध्ये रेशमी कापडाचा वापर केला जातो. शाहू महाराजांनी जोतिबा डोंगरावर रेशीम किड्यांच्या पैदाशीसाठी तुतीची अनेक झाडे लावली होती. गायमुख तलावाजवळ रेशीम कारखाना सुरु करण्यात आला होता. या कारखान्यासाठी लागणारे तंत्रज्ञान खास कलकत्त्याहून आणले होते. ११ ऑगस्ट १९०९ च्या आदेशावरून या कारखान्यावर री. ओ. झो. तोफो या जपानी व्यक्तीची दर महा २५ रुपये पगार आणि रेशीम कारखान्याच्या उत्पन्नातील तिसरा हिस्सा देण्याचे ठरवून नेमणूक केली होती. हा सर्व कारभार व्यवस्थित चालण्यासाठी जपानी भाषा समजून घेण्यासाठी शाळीग्राम यांची नेमणूक केली होती. तसेच आवश्यक साहित्य, भोजन व्यवस्था आणि इतर मदत खाजगीतून देण्याचा आदेश महाराजांनी स्वतःच्या स्वाक्षरीने दिला होता.
राजर्षी शाहू महाराजांची जलनीती:
शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानातील पाण्याची काळजी घेतली. त्यांनी अनेक तळी-तलाव बांधले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं राधानगरी धरण हा तर हरितक्रांतीचा पायाच आहे. राजर्षी शाहू महाराजांनी तळी-तलाव बांधण्याबरोबरच त्यांच्या संरक्षणाची, पाण्याच्या स्वच्छतेची, सार्वजनिक आरोग्याची देखील काळजी घेतली होती. शाहू महाराजांची हि जलनीती व तिचे दूर दृष्टिकोन पुढील उदाहरणावरून समजून येतात.
रंकाळ्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून शाहू महाराजांनी स्वतंत्र धुण्याच्या चाव्या:
रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठीचा असा शाहूकालीन पर्याय म्हणून आजही धुण्याची चावी ही योजना मार्गदर्शक ठरते. दुधाळी भागात आजही ही योजना अस्तित्वात आहे. दगडी कट्टे बांधून १२० नळ येथे जोडण्यात आले. प्रत्येक नळाखाली दगडाचे एक कुंड व कपडे धुण्यासाठी मोठा घडीव दगड. अंघोळीसाठी ३८ स्वतंत्र स्नानगृहेही येथे बांधण्यात आली. या ठिकाणी पाण्याचा वापर झाल्यानंतर या कुंडातून बाहेर पडणारे पाणी पाटाद्वारे शेतीला पुरवण्यात आले. या योजनेसाठी १८८३ साली २५ हजार ७४० रुपये इतका खर्च आला होता.
तलाव प्रदूषण बाबतीत निर्णय:
२५ जुन १८९५ रोजीच्या करवीर सरकारच्या ठरावाप्रमाणे, तमाम लोकांस कळविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे कि, कळंबे तलावात लोक स्नाने करितात, जनावरे घालतात, कपडे धुतात, तेणेकरून तलावाचे पाणी खराब होते. सबब सदरहू कळंबे तलाव भरपूर भरला म्हणजे जी पाण्याची मर्यादारेषा राहते त्या रेषेपासून आणखी पलीकडे ४०० वारावर दुसरी रेषा काढली असता जशी निघेल त्या रेषेचे आतील तलावाच्या सर्व भागास डिस्ट्रिक्ट पोलीस ऍक्ट कलम ३१ हे लागू (मनाई) करण्यात आले आहे.
अशाच प्रकारचा ठराव १६ जुलै १८९५ रोजी विहिरी संदर्भात केला होता. तमाम लोकांस कळविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे कि, ठाणे हिरणीपैकी मौजे कलविकट्टे येथील सर्वे नं. १२६ यात सार्वजनिक लोकांची पाणी पिण्याची विहीर आहे त्या विहिरीचे पाणी लोक स्नाने करून, कपडे धुऊन नासून टाकितात. सबब सदरहू ठिकाणी मनाई करण्यात येत आहे.
१८९५ साली रायबाग प्रांतात पर्जन्य व्यवस्थित झाले नसल्याने पाण्याचा तुटवडा होता. त्यामुळे शाहू महाराजांनी चिंचली येथील प्रदर्शन बंद केले होते.
शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांमुळे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून उपाययोजना:
२७ जुन १९०५ रोजीच्या जाहीरनाम्यात अतिग्रे येथील तलावासंदर्भात पुढील प्रमाणे उल्लेख आहे. तलावापासून २०० यार्डाचे आंतील जमिनीस सोनखत आगर तसेच दुसरे एखादे घाणखत घालणेचे मन करण्यात आले आहे. ते सर्वास मालुम व्हावे.
नदीचा घाट वाचविण्याचा प्रयत्न:
दि. २२ ऑक्टोबर १९१२, खाली लिहिलेले लोकांस कळविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येते कि नृसिंहवाडी येथील कृष्ण-पंचगंगा संगमावरील घाटानजीकच्या मळई जमिनी सरकारात घेऊन शेवरी लावून घाटाचा बचाव करण्यासाठी गाळ साचणे करीत वाढविणेचा आहे (१८ जणांची नावे).
कोल्हापूर संस्थानात नदी, ओढ्यास शेतकरी लोक बंधारे उर्फ धरणे घालून पाणी तुंबवितात अथवा नेहमीच्या प्रवाहाप्रमाणे जाण्यास बंदी करतात. त्यापासून सार्वजनिक अडथळा न होण्याबाबबत शाहू महाराजांनी नियम घातले होते.
पाणी खराब होईल असे करण्याची सक्त मनाई:
हल्ली आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने जलप्रदूषण करतच असतो. शाहू काळात अशा सर्व घटक-गोष्टीवर सक्त मनाई करण्यात अली होती. त्यासंबंधीचा १८ सप्टेंबर १९०६ रोजीचा जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहे:
“तमाम लोकांस कळविण्याकरीत प्रसिद्ध करण्यात येते कि कोल्हापूर शहरातील कपिलतीर्थ मुजविले होते, त्यात अलीकडे विहीर काढन्यात येऊन त्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पिण्याकरिता उपयोग करीत आहेत. यासाठी सदरहू विहिरीचे पाण्यात अगर विहिरीचे नजिक १० फुटात स्नान करण्याचे, कपडे धुण्याची, खरकटे, निर्माल्य, गणपती किंवा दुसऱ्या असल्या मुर्ती व पिंड वगैरे टाकण्याची किंवा अन्य रीतीने पाणी खराब होईल असे करण्याची सक्त मनाई करण्यात आली आहे. सदरहू विरुद्ध ज्याज कडून वर्तन होईल त्याजवर कायद्याप्रमाणे खटला करण्यात येईल.”
राजा कालस्य करणम- म्हणजे राजा हा युगकर्ता असतो, काळ किंवा परिस्थिती घडविण्याचे सामर्थ्य त्याच्यामधे असते. या उक्तीप्रमाणे राजर्षी शाहू महाराज आपल्या तेजस्वी बुद्धीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करत होते. शाहू महाराज शतकाच्या पुढचा विचार करत होते, राष्ट्रउभारणीच्या कामामध्ये नेहमीच अग्रेसर होते. द्रष्टे पुरुष आपल्या काळाच्या पुढे असतात (Prophets are ahead of their time) हि म्हण महाराजांना तंतोतंत लागू पडते.
मुंबईतील पन्हाळा लॉज येथे ६ मे १९२२ रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास महाराज खुर्चीत उठून बसले, रात्रभर त्यांना छातीत वेदना होत्या. “ मी जाण्यास तयार आहे. डर कुछ नाही. सबकू सलाम बोलो. असे म्हणून त्यांनी डोके खाली टेकले आणि महाराजांनी आपली जीवित यात्रा संपविली.
(साभार – जीपीए मिरर )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.