सारद मजकूरच्या वतीने मुळातून माणूस हा पुरस्कार सचिन परब यांना प्रदान
माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी सारद मजकूरच्या वतीने दर महिन्याला ‘मुळातून माणूस’ पुरस्कार देण्याचा संकल्प
पुणे : एखाद्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार करणे ही भावना प्रेमातूनच जन्माला येते. माणसाचा मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असू दे, त्याला माणूस म्हणून स्वीकारणं, ही गोष्ट महत्त्वाची असून प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केलं.
सारद मजकूरच्या वतीने मुळातून माणूस हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तेजस्विनी गांधी आणि अभिजित सोनावणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शनिवारी (दि. २१) एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डेलीहंटचे सिनियर मॅनेजर महेंद्र मुंजाळ, ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे, नितीन कोत्तापल्ले, प्रतीक पुरी, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, प्रा. संजय तांबट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्यासाठी सारद मजकूरच्या वतीने दर महिन्याला ‘मुळातून माणूस’ हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी चार जणांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
परब म्हणाले, ‘प्रेम ही जबरदस्त गोष्ट असून तो एक विचार आहे. आपला देश आज जाती-पातीत अडकून पडला आहे. याला उतारा म्हणून प्रेम हीच जात आणि प्रेम हाच धर्म ही शिकवण संतांनी रुजवली. विठ्ठलाच्या भक्तीतून प्रेमाची भावना संतांनी जनमानसात पेरली. मराठी माणसातल्या माणूसपणाचा शोध घेत मागे गेलो असता तो थेट पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत नेतो.’
वर्तमानपत्रांच्या वाचनानं दिलेलं भान, कांदिवलीच्या चाळीतून एकमेकांमध्ये सहज मिसळण्याची तयार झालेली वृत्ती, भेटलेल्या माणसांमधून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून येत गेलेलं शहाणपण, मुंबईच्या महानगरात जपलं गेलेलं गावपण, आई-वडील आणि जवळच्या माणसांकडून मिळालेल्या गोष्टी या विषयांवरही सचिन परब यांनी यावेळी मांडणी केली.
फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड या भूमिकेतून एखाद्यावर सहज विश्वास ठेवून अनेकांना लिहितं केल्याच्या भावना सचिन परब यांच्याबद्दल काहींनी व्यक्त केल्या. थिंक बँकचे विनायक पाचलग, एमआयटीचे संचालक महेश थोरवे, कीर्तनकार स्वामीराज भिसे, लेखिका अमृता देसर्डा, रेणुका कल्पना, सदानंद घायाळ, हर्षदा परब यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रसन्न कुलकर्णी यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.