November 12, 2025
प्रा. देवबा पाटील यांच्या ‘मुलांसाठी विज्ञान कथा’ या कथासंग्रहाचे परीक्षण – बालमनात वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणाऱ्या, कुतूहल वाढवणाऱ्या सोप्या विज्ञानकथा.
Home » वैज्ञानिक दृष्टीकोन पेरणार्‍या कथा – मुलांसाठी विज्ञान कथा
मुक्त संवाद

वैज्ञानिक दृष्टीकोन पेरणार्‍या कथा – मुलांसाठी विज्ञान कथा

पुस्तक परीक्षण…
लेखक प्रा. देवबा पाटील यांनी या कथासंग्रहाच्या माध्यामातून सभोवताली घडणाऱ्या अगदी लहान लहान गोष्टी टिपत त्यांचे वैज्ञानीक कारण सांगत बालमनाला विज्ञान दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे.

गुलाब बिसेन, गोंदिया
मो.नं. 9404235191

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात जगणारी आजची पिढी विज्ञान तंत्रज्ञानाच्या अद्भुत अविष्कारांच्या सहवासात वाढत आहे. सभोवतीचा निसर्ग आपल्या विविध कलांनी बालमनाला अचंबित करत असतो. हा निसर्ग रोजच्या घडणार्‍या घटनांतून कुतुहल जागृत करत असतो. वाहणारे वारे, नित्यनेमाने बरसणारा पाऊस, ऋतुंमध्ये होणारा बदल आपण नेहमीच अनुभवत असतो. परंतु ते बदल का होतात याचा खोलवर विचार आपण करतोच असे नाही. लहान मुलांना तर या साऱ्या गोष्टींचे कुतुहल वाटत असते. त्यांना त्यासंदर्भात नानाविध प्रश्न पडतात. परंतु त्या प्रश्नांची उकल होतेच असे नाही. ही उकल कथांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न प्रा. देवबा पाटील यांनी ‘मुलांसाठी विज्ञान कथा’ या कथासंग्रहातून केला आहे.

या कथासंग्रहामध्ये एकुण आठ कथांचा समावेश आहे. बर्‍याचदा विज्ञान हे समजायला अवघड जाते. मुलांना समजायला अवघड जाणार्‍या संकल्पना कथेच्या माध्यमातून सोप्या पद्‌धतीने सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यामुळे बालकांना आपल्या सभोवती घडणारे विज्ञान कथेच्या माध्यमातून समजून घेणे सहज साध्य होईल. या कथा स्वरूप आणि आनंदराव यांच्या संवादातून फुलत जातात. भारतीय विज्ञान संस्थेतून सेवानिवृत्त झालेले वैज्ञानिक आनंदराव निवृत्तीनंतर आपल्या गावी राहायला जातात. तेथे पुतण्याचा मुलगा स्वरूप आणि आनंदराव या दोघांमध्ये घडलेल्या कथा वाचकाला खिळवून ठेवतात. या संग्रहातील पहिली कथा ‘हवेची माहिती’ यातून आजोबा आनंदराव नातू स्वरूपला हवा न दिसणे, हवेचा दाब, हवेचा स्पर्श, वादळ कसा उत्पन्न होतो. हवेच्या तापमानातील बदल या गोष्टींची अगदी सहजतेणे उकल करून सांगतात.

आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमागे वैज्ञानिक कारणे असतात. ती कारणे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. नियमित घडणाऱ्या घटनांमागील कारणे समजली नाही तर प्रत्येकजण त्याचा अर्थ वेगळा काढण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचवेळा मग यामुळे चमत्कारासारख्या संकल्पना संधीसाधू लोकं मांडण्याचा प्रयत्न करतात. यातून भोंदुगीरीला खतपाणी मिळते. लेखक प्रा. देवबा पाटील यांनी या कथासंग्रहाच्या माध्यामातून सभोवताली घडणाऱ्या अगदी लहान लहान गोष्टी टिपत त्यांचे वैज्ञानीक कारण सांगत बालमनाला विज्ञान दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे.

ऋतू कसे होतात? या कथेत लेखकाने छोट्या छोटया प्रश्नाच्या माध्यमातून गोलार्ध म्हणजे काय? पृथ्वीचे अक्षाभोवतीचे फिरणे, त्यामुळे होणारे वातावरणातील बदल आणि या बदलातून होणारे ऋतुबदल सहज सुलभ पद्‌धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्वरूप आपल्या आजोबांच्या सोबत नियमितपणे फिरायला जातो. आजोबांच्या सततच्या सहवासात असणाऱ्या स्वरुपला निवृत्त वैज्ञानिक असलेले आजोबा निसर्गातील हे बदल का घडतात आणि कसे घडतात याची शास्रिय माहिती देतात.

स्वरूपला सतत वेगवेगळे प्रश्न पडत असतात. बालमनात अनेक गोष्टींसदर्भात असणारे कुतुहल निवृत्त वैज्ञानिक असलेले आजोबा विज्ञानाच्या दृष्टीकोनातून समजावून सांगतात. हिवाळ्यातील थंडी, धुळे – धुरके, हिवाळ्यातील बर्फ, दवबिंदू कसे पडतात या कथांतून आजोबा स्वरूपला थंडीत हुडहुडी शरीरात का भरते? थंडीत ओठ का फाटतात ? थंडीत सकाळी सकाळी तोंडातून वाफा का निघतात ? हिवाळ्यात सकाळी सकाळी धुके का दिसतात? धुरके म्हणजे काय? अशा बालमनाला पडणाऱ्या, कुतुहल जागवणाऱ्या प्रश्नांची सहज सोप्या पद्धतीने गोष्टीरूपात उकल या कथांतून करण्यात आली आहे. त्यामुळे ही वैज्ञानिक माहिती समजून घेताना कुठेही कंटाळा येत नाही. उलट आणखी कुतुहल जागे होते. या कथांतून लेखक प्रा. देवबा पाटील यांनी अगदी बेमालूमपणे वैज्ञानिक दृष्टीकोन बालमनात पेरण्याचा प्रयत्न कला आहे.

झाड, पाने, फुले या कथेमधून स्वरूपच्या बालमनाला पडणार्‍या अनेक प्रश्नांची उकल झालेली आहे. जसे की झाडांची पानं हिरवीच का असतात? झाडे नेहमी वरच का वाढतात? झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी कसे पोहचते? झाडाच्या सावलीत थंड का वाटते? झाडाची पाने कशी गळतात? पानगळ हिवाळ्यातच का होते? असे प्रश्न प्रौढांचेही कुतूहल जागृत करतात. त्यामुळे या कथा बालकांसोबतच प्रौढांनाही गोडी लावतात.

फूल कसे उमलते ? फुलांवर माशा, किरक, फुलपाखरे का बसतात ? फुलांना सुगंध कसा काय येतो ? रात्री उमलणारी फुले पांढरीच का असतात? अशा प्रश्नांची उकल लेखकाने ‘फुलांचा रंग- गंध’ या कथेतून अगदी फिरता फिरता केला आहे. या संग्रहातील कथांची मांडणी, त्यांची भाषा, क्लिष्ट विषय सहज सोप्या पद्धतीने समजावून देण्याची लेखकाची हातोटी या सर्व गोष्टी एकत्रीत जुळून आल्याने हा कथासंग्रह अत्यंत वाचनीय आणि ज्ञानवर्धक झालेला आहे.

पुस्तकाचे नाव – मुलांसाठी विज्ञान कथा
लेखक – प्रा. देवबा पाटील
प्रकाशक- ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे
पृष्ठ संख्या- 56
किंमत- 90 रु.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading