शरद जोशींनी १९८० च्या दशकात महाराष्ट्रात आंबेठाणला शेतकरी संघटना स्थापन केली. त्याआधी ते स्वित्झर्लंडला युनोमध्ये अत्यंत अभिजात आणि संपन्न जीवन जगत होते. पृथ्वीवरचा स्वर्ग स्वित्झर्लंड सोडून ते भारतात आले. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आंबेठाण गावात त्यांनी साडेतेवीस एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली. हेतू हा की, १ किलो लोखंडाचं १ ग्रॅम सुद्धा जास्त लोखंड वाढवू न शकणारा कारखानदार श्रीमंत कसा आणि १ दाण्याचे लाखो दाणे करणारा शेतकरी दरिद्री कसा…ही काय भानगड आहे…शेतीच्या दारिद्र्याची कारणं शोधण्यासाठी ते भारतात आले…
वसुंधरा काशीकर
शेतकरी संघटना हा दबाव गट म्हणून अत्यंत प्रभावी होता. शरद जोशींच्या सभांना १०-१० लाख शेतकरी येत. युनोतून आलेला, जिन्स पँट आणि टि शर्ट घालून शुद्ध मराठीत भाषण करणारा अत्यंत हँडसम, डायनॅमिक नेता… सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे शरद जोशींना ‘डेनिम घातलेला गांधी’ असं म्हणाल्या होत्या..कारण शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला…
चांदवडला शरद जोशींनी १९८६ साली लक्ष्मी मुक्ती आंदोलन भरवलं होतं…३ ते ४ लाख शेतकरी कष्टकरी स्त्रिया त्या आंदोलनात सहभागी झाल्या. शरद जोशींनी शेतकऱ्यांना आवाहन केलं….एक दिवस सकाळी ५ वाजता उठा. वही पेन घ्या आणि रात्री झोपेपर्यंत लिहून काढा तुमची बायको काय काय काम करते ते…ती किती कष्ट करते याचा हिशोब नाही वर ती नुसती नावाची लक्ष्मी..तीच्या नावावर साधा चमचाही नाही…
शरद जोशींच्या आवाहनावर २ लाख…पुन्हा नीट वाचा—दोन लाख शेतकऱ्यांनी आपल्या बायकोच्या नावावर जमिनीचा सातबारा केला..घर नावावर करुन दिलं…२०२५ सालीसुद्धा मुलीचा गर्भ पोटात असला तर मारला जातो, मुलगा होण्यासाठी तीन-तीन मुली जन्माला घातल्या जातात…१९८६ ला बायकोच्या नावावर जमिनीचा सातबारा करणे काय अद्भूत, अविश्वसनीय आणि ऐतिहासिक घटना होती…विचार करा…
तर शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाचं काम केलं, त्याला अर्थसाक्षर केलं…शेतकरी डंकेल प्रस्तावावर बोलू लागला…आयात-निर्यात धोरणावर चर्चा करु लागला…शरद जोशी नावाचं चक्रीवादळ आलं होतं….शेतकरी इतिहासात प्रथमच ‘वर्ग’ म्हणून (Class ) संघटित झाला होता. त्याचा परिणाम राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात शेतमालाचा हमीभाव हा विषय प्रथमच आला…याचं सर्व श्रेय शरद जोशींना…
पुढे झालं असं जोशींनी निवडणुका लढण्याचं ठरवलं….आणि हा निर्णय गेम चेंजर ठरला…भारत, महाराष्ट्र हा जातीचा देश आहे. जात हे या देशाचं सामाजिक वास्तव आहे हे कोणाही नाकारू शकत नाही.
शरद जोशींनी शेतकऱ्याला ‘वर्ग’ म्हणून संघटित केलं होतं. आंदोलनात तो वर्ग म्हणून काम करत होता. पण निवडणुकीत सत्तेच्या राजकारणात जातीचं कार्ड चालतं. १९९५ ला स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना जोशींनी केली. स्वतंत्र भारत पक्षाजवळ इमानदार, कष्टकरी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांशिवाय काही नव्हतं. पैसा तर नव्हताच नव्हता. निवडणुकीत वेगळं भांडवल काम करतं. सरोजताई काशीकर, वामनराव चटप, मोरेश्वर टेंभुर्णे हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवडून आले त्यामागे संघटनेपेक्षा जनता दलाची ताकद जास्त होती.
याशिवाय व्यावहारिक चातुर्यही संघटनेजवळ नव्हतं. राष्ट्रवादीशी १९९९ ला युती केली. ५ जागा राष्ट्रवादीने संघटनेला देऊ केल्या. संघटनेजवळ प्रचारासाठी रुपयाही नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे ते निधी मागायला गेले. तेव्हा एका वरिष्ठ नेत्याने हसत हसत म्हटलं अहो, तुम्ही पाच जागा कशाला लढवतां…२ जागा विकायच्या, पैसा उभा करायचा आणि तीन त्या बळावर लढवायच्या. ( शेतकरी संघटनेचे नेते ॲड. दिनेश शर्मांनीच मला हा किस्सा सांगितला. ते त्यावेळी उपस्थित होते)
हिंगणघाटला शरद जोशी उभे राहिले आणि केवळ १२०० ते १८०० च्या फरकानं पडले…त्यात दोन मुद्दे होते…जोशी प्रचाराला एकदा सुद्धा हिंगणघाटला आले नव्हते. दुसरा मुद्दा हा की, जोशींनी एकेकाळी म्हटलं होतं की, निवडणुकीत उभा राहिलो तर जोड्याने मारा, एका वकिलाने खरंच जोशींवर चप्पल फेकली..याचाही उलटा प्रचार झाला…ते फार कमी फरकाने पडले…आणि त्याचं विश्लेषण जात हे करण्यात आलं… जे काही प्रमाणात सत्य होतं…शिवाय “जोशी जोवर राजकारणात येत नाही तोवर ते अजेय आहेत. एकदा आमच्या आखाड्यात येऊ दया मग बघा कसे लोळवतो ते” असेही एका राजकीय नेत्याने म्हटल्याचे ऐकिवात आहे…
शेतकरी संघटना हा केवळ दबाव गट म्हणूनच राहिला असता तर आज महाराष्ट्राचा आणि शेतकरी संघटनेचा इतिहास वेगळा राहिला असता…शरद जोशी निर्विवाद असामान्य-श्रेष्ठ माणूस होता…कडक सलाम…
पुस्तकाचे नाव – शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा
लेखक – वसुंधरा काशीकर
प्रकाशक – राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत – २०० रुपये
पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.rajhansprakashan.com/product-details/sharad-joshi-shodh-asvastha-kallolacha-sharatha-jasha-shathha-asavasatha-kalllica
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.