March 1, 2024
Home » … म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य
विश्वाचे आर्त

… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य

जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य सुराज्य ठरले कारण ते राजाच्या नावाने प्रजेने उभे केलेले राज्य होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८२३७८५७६२१

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडवं होते । कां राक्षसां दिलो पाहे । राती होऊनि ।। ७२४।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ : आणि राजा ज्या वाटेनें जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ते रात्र आहे असे वाटते.

राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवरती सत्याची पेरणी होते. सत्य टिकवणे हा त्याचा राजधर्म आहे. सत्याला न्याय देणे त्याचा राजधर्म आहे. तो त्याला पाळावा लागतो. राजधर्माचे पालन करणे त्याचे कर्म आहे. ‌मग तो राजा संन्याशी जरी असला किंवा त्याला दारिद्र्य जरी प्राप्त झाले असले तरीही त्याला या कर्मापासून मुक्ती नसते. धर्म त्याला पाळावा लागतो, म्हणूनच राजा जरी गरीब  झाला तरी तो राजा असतो. जरी तो संन्यासी असला, तरीही तो राजा असतो. कारण त्याने संपत्तीचा, ऐश्वर्याचा त्याग केलेला असतो. 

राजधर्म मात्र त्याला पाळवा लागतो. जोपर्यंत तो राजा राजधर्माचे पालन करत असतो, तोपर्यंत त्याच्यातील राजा जिवंत असतो. राजधर्माचे पालन करताना राजाला स्वतःचा जीव जरी गमवावा लागला तरी राजधर्म त्याच्यापासून सुटत नाही.पूर्वीच्या काळी राजदंड ज्याच्याकडे तो राजा असे मानले जायचे. राजदंड ज्याला माहित आहे. त्यांना गादीचा वारसा दिला जायचा. त्यालाच गादीवर राजा म्हणून मान्यता दिली जायची. पण हा राजदंड आहे तरी काय ?राजदंड म्हणजे एक काठी.? छे!  हा राजदंड मग कोणीही लपून ठेवेल आणि शोधून काढेल. यात वैशिष्ट्ये असे काय?  मग राजदंड म्हणजे काय? राजधर्माचे जो पालन करतो त्याच्याकडे हा राजदंड. म्हणजे राजधर्माचे पालन करणारा राजा असा याचा सरळ साधा अर्थ आहे.अध्यात्मिक दृष्ट्या विचार केला, तर राजा हा केवळ निमित्तमात्र असतो. राजधर्माचे पालन त्याच्याकडून आपोआप होत असते. राजधर्म पालन करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. धर्म रक्षणासाठी तो केवळ निमित्तमात्र हो, असे श्रीकृष्ण म्हणाले. राजा केवळ निमित्तमात्र असतो.

राजा  ज्या वाटेने जातो, त्या वाटेवर धर्माचे रक्षण होते धर्म म्हणजे सत्य. न्याय. ह्या सर्वात राजा केवळ निमित्तमात्र असतो. अशा स्वराज्यात सुराज्य कसे स्थापन होते. कारण तेथे सत्य लपून राहत नाही. ते प्रकट होते. सत्याचा विजय होतो.एकदा एक राजा रस्त्याने जात होता. यांचं वाटेवर एक कुंभाराची मुलगी मडक्याला आकार देत होती. राजाला पाहताच ती एकदम उत्साही झाली. तिची काहीतरी समस्या होती. ती राजा समोर प्रकट करणार होती पण राजा पुढे गेला. तिच्या जीवनातील ती गुढ समस्या ती व्यक्त करू शकली नाही. पण ज्यांच्यामुळे ती एका समस्येत गुरफटलेली होती त्यांना मात्र राजाची दहशत वाटू लागली. ती राजा समोर समस्या प्रकट करेल याला घाबरुन तिला तिचे असणारे गुढ सांगण्यात आले व ती त्या समस्येतून मुक्त झाली. कुंभाराची ती मुलगी खूप आनंदी झाली.

जीवनातील हे गुपित तिला राजामुळे समजलेले असते. या आनंदाच्या भरात ती राजाला तिचे सर्वस्व अर्पण करायला सुद्धा तयार झाली. राजा तिच्या विचाराने भारावून गेला. पण भानावर आला. आपण जर तसे केले तर ते जनतेचे शोषण ठरेल. म्हणून त्या स्त्रिचा मान राखत त्याने तिला समजावले.राजा त्या कुंभाराच्या मुलीला  म्हणाला यवनांच्या सत्तेमुळे माझी जनता भरडली जात आहे. आणि त्यातच माझा हा दहा वर्षांचा मुलगा फारसं अभ्यासात लक्ष देत नाही. या दोन्ही चिंता मला सतावत आहेत. तुला माझे उपकार फेडायचे असतील तर तुला यात तुझे योगदान देता येऊ शकते. देव, देश अन् धर्मासाठी तु तुझे योगदान दे. मडक्याला आकार देण्या ऐवजी तू या युवराजला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करुन त्याला योग्य आकार दे. गणपतीच्या सुंदर मुर्ती घडवतेस, सुंदर मडकी घडवतेस तसं तु आता सुंदर विचारांची  स्वराज्यासाठी योगदान देणारी माणसं घडव व या युवराजला ही घडव. जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य पुढे सुराज्य ठरले कारण ते राजाच्या नावाने प्रजेने उभे केलेले राज्य होते. यातून एकच बोध होतो राजा फक्त निमित्तमात्र असतो. पण तो राजधर्म पाळणारा असतो. लोकशाहीचा पाया सुद्धा यात आहे पण लोकशाहीत अशा विचारांची माणसं घडवणाऱ्यांची तितकीच गरज आहे. अशाप्रकारे देशासाठी योगदान देणाऱ्या मातांची व तरुणांची गरज आज देशाला आहे.

Related posts

अध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More