काही वेळा अचानक खांदेदुखी होते. हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याचेही असू शकते. तसेच खांद्याला इजा झाल्यास, रक्तस्राव होत असल्यास तसेच सूज असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. काही वेळा अगदी हात हालवणेही शक्य नसते किंवा घरगुती उपायांनीही वेदना मात्र कमी होत नाहीत.
डाॅ. मानसी पाटील
खांदेदुखीचा त्रास आता फक्त जेष्ठांना होतो असे नाही तर तो तरुणांमध्येही आढळतो. अर्थात म्हातारपणी ही समस्या जास्त असते. ६५ वर्षांवरील तीन पैकी एका व्यक्तीला खांदेदुखी असते. खांदेदुखी ही त्या सांध्याची असू शकते किंवा आजूबाजूंच्या स्नायू, लिगामेंट च्या वेदनाही असू शकतात. जसे वय वाढते तसे खांदेदुखीचा त्रास अधिक भेडसावतो कारण वयानुसार सांधे झिजतात, हाडांचे पृष्ठभाग खडबडीत होतात. वय वाढल्यामुळे अर्थातच हालचालही कमी होते. वेदना होतात. काही वेळा हृदयविकार, न्युमोनिया, स्ट्रोक यांच्यामुळेही खांदेदुखी होत असल्याचे जाणवते.
खांद्याच्या सांध्याची रचना-
खांदा तीन हाडांनी तयार झालेला असतो. हाताच्या वरच्या बाजुचे हाड, खांद्याचे हाड ज्याला स्कॅपुला म्हणतात. आणि कॉलरबोन. खांद्याची रचना साधारपणे गुडघ्याच्या खुब्यासारखी असते. म्हणजे बॉल आणि सॉकेट. वरच्या बाजूच्या खांद्याच्या त्रिकोणी हाडाच्या टोकाला वाटीसारखा खोलगट भाग असतो. खालच्या बाजूला दंडाच्या हाडाचा वरचा गोलाकार भाग असतो. हे दोन्ही एकमेकांना जोडलेले असतात. बॉल सॉकेट फिरतो तेव्हाच हात पुढे मागे, बाजूला – वर उचलता येतो. फिरवता येतो. हे सॉकेट उथळ असते तिथून बॉलने जागा सोडू नये यासाठी तीन स्नायूंचा म्हणजे रोटेटर कफ ची योजना निसर्गानेच केली आहे. रोटेटर कफ मुळे खांद्याच्या सांध्याला स्थिरता मिळते.
खांदेदुखीची कारणे-
- सर्व्हायकल रेडिक्युलोपॅथी – ही अशी स्थिती आहे ज्यामुळे मान आणि वरच्या भागात लक्षणीय अस्वस्थता आणि वेदना होऊ शकते.
- खांद्याचे हाड उतरणे किंवा डिसलोकेट होणे.
- घट्ट झालेले खांदे
- इजा होणे
- ऑस्टियोआर्थरायटिस
- सांध्याची सूज
- रोटेटर कफ ला इजा
- खांद्याची किंवा मानेची नस दबली जाणे.
लक्षणे-
खांद्याच्या वेदना आणि आखडलेले सांधे अनेक महिने, वर्ष बरे होत नाहीत.
खांद्यांचा वापर करताना वेदना होतात.
हात लावल्यास वेदना होणे, सुन्न होणे, कमजोर होणे
अचानक खूप वेदना आणि हात हलवणेही शक्य नसणे.
काही वेळा अचानक खांदेदुखी होते. हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याचेही असू शकते. तसेच खांद्याला इजा झाल्यास, रक्तस्राव होत असल्यास तसेच सूज असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. काही वेळा अगदी हात हालवणेही शक्य नसते किंवा घरगुती उपायांनीही वेदना मात्र कमी होत नाहीत.
खांदेदुखीची तपासणी, निदान-
शारिरीक तपासणी करावी लागते. डॉक्टरांना गरज भासल्यास ते सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, रक्त परीक्षण, एक्स रे, इलेक्ट्रोमोग्राफी
उपचार-
दुखऱ्या खांद्याच्या चाचण्या केल्यानंतर वेदना कमी होण्यासाठी डॉक्टर काही गोळ्या देतात.
इंजेक्शन
काही वेळा वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर स्टिरॉईडच्या इंजेक्शन घेण्याची शिफारस करतात.
फिजिओथेरेपी करता येते, शिवाय इलेक्ट्रीकल, अल्ट्रासोनिक आणि चुंबकीय उपचार केले जातात.
शस्त्रक्रिया-
खांद्याच्या शस्त्रक्रियेत पारंपरिक पद्धतीने खराब झालेल्या मांसपेशी, उती काढून टाकण्यासाठी आर्थोस्कोपी केली जाते. मात्र या शस्त्रक्रियेनेही रुग्णाला बरे वाटत नसेल तर एक आधुनिक शस्त्रक्रिया केली जाते तिचे नाव आहे रिव्हर्स शोल्डर शस्त्रक्रिया केली जाते. हल्ली नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया खूप सर्वसामान्यपणे केली जाते. ही शस्त्रक्रिया अगदी सांध्याच्या नैसर्गिक रचनेसारखीच असते. सांध्यातील खराब हाडांचा भाग काढून टाकून तिथे धातुचा कृत्रिम बॉल देठासह बसवला जातो आणि बाजुने सिमेंट टाकले जाते. खांद्याच्या हाडाच्या टोकाला प्लास्टिक कप बसवला जातो. ते एकत्र जोडले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण ८० टक्क्यांपर्यंत पुर्वीसारखी हालचाल करु शकतो.
अर्थात ही शस्त्रक्रिया सरसकट सर्वच खांदेदुखीसाठी केली जात नाही. रुग्णाचे वय ६५ वर्षापुढे आणि पारंपरिक शस्त्रक्रिया फसलेली आहे किंवा सांध्याच्या आतील हाड मोडले आहे त्यांना ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरते. ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची आहे. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर खांद्याची हालचाल पुर्वीइतकी होऊ शकत नाही शिवाय हात आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वळवता येत नाही.
खूप ठिसूळ हाडे असतील तर ही शस्त्रक्रिया करता येत नाही. सांध्यांत जंतुसंसर्ग असेल तर ही शस्त्रक्रिया करणे फायद्याचे नाही. अजूनही ही शस्त्रक्रिया अगदी सर्वसामान्यपणे केली जात नाही. कारण गुंतागुंतीची आहेत. तसेच यातील तज्ज्ञांची संख्याही कमी आहे.
खांदेदुखी ही हृदय संबंधी आजाराचे लक्षणही असू शकते. संशोधनातून असे कळले आहे की खांदा गोलाकार फिरवताना वेदना होत असतील तर हृदयाशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते. त्यामुळे खांदेदुखीकडे दुर्लक्ष करू नये.
डाॅ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.