आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – सध्या अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कमाल व किमान तापमान कसे राहील ?
माणिकराव खुळे – महाराष्ट्रात कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानांची सरासरीच्या खाली होणारी पाऱ्याची घसरण बऱ्याच ठिकाणी थांबली असुन तापमानात होणारी वाढ अशी –
कमाल तापमान –
महाराष्ट्रातील मुंबई सांताक्रूझ नाशिक पुणे छ.सं.नगर अकोला अमरावती ब्रम्हपुरी यवतमाळ ह्या शहरांत व जिल्ह्यात दुपारी ३ च्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास ४ डिग्रीने वाढ होवून सध्या तेथे ३५ ते ३८ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे तापमान नोंदवले जात आहे. बुलढाण्यात तर ९ डिग्रीने वाढ होवून, पारा चाळीशीकडे झुकत आहे.
किमान तापमान –
महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, जेऊर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा ह्या शहरांत व जिल्ह्यांत पहाटे ५ च्या किमान तापमानात सरासरीपेक्षा जवळपास दिड ते चार डिग्री से.ग्रेडने वाढ होवून, सध्या तेथे १५ ते २० डिग्री से. ग्रेड दरम्यानचे किमान तापमान नोंदवले जात आहे.
तर मुंबई कुलाबा सांताक्रूझ रत्नागिरी येथे तेवढ्याच वाढीने, पण २० ते २२ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे तापमान तेथे नोंदवले जात आहे. छ.सं.नगरमध्ये तर किमान तापमानाचा पारा साडेचार डिग्रीने वाढ होवून, २० डिग्री से. ग्रेडच्या आसपास किमान तापमान आहे. त्यामुळे वरील ठिकाणी उष्णतेच्या काहिलीत वाढ होवून पहाटेचा गारवाही कमी होईल.
प्रश्न – उष्णतेत फेब्रुवारीतच लवकर होणारी ही वाढ कश्यामुळे ?
माणिकराव खुळे – महाराष्ट्रावर वारा-वहनाच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झाला नाही, तो आहे तसाच टिकून राहिला. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्चं दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे, महाराष्ट्रात पोहचलेच नाही . त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष खास अशी थंडी अध्यापपर्यंत महाराष्ट्रात जाणवली नाही. जी काही जाणवली ती चढ उतारासह केवळ किरकोळ अशीच थंडी जाणवली.
प्रश्न – तर मग आता थंडी गायबच झाली असे समजावे काय ?
माणिकराव खुळे – उद्यापासूनच्या सुरु होणाऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चमत्कारीकपणे हवेचा दाबात व त्यामुळेच जर वारा वहन प्रणालीत जर अजूनही एकाकी काही बदल झाला तरच थंडीपूरक अश्या किमान तापमानाचा पारा खालावून थंडीची अपेक्षा करता येईल, असे वाटते. अन्यथा नाही.
प्रश्न – येत्या २-३ दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय ?
माणिकराव खुळे – बंगालच्या खाडीतील सध्याच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे केवळ फक्त विदर्भातच शुक्रवार व शनिवार, दि. २१-२२ फेब्रुवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.