April 25, 2024
Book review of Maybap Ayub Pathan Lohagaonkar
Home » ‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण
मुक्त संवाद

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून केले आहे. त्यांच्या जीवनाचे आणि जगण्याचे खडतर अनुभव त्यांच्या साहित्यात उमटतात.

संजय खाडे, औरंगाबाद.
मो.9421430955.

मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी अय्युब पठाण लोहगांवकर हे एका गरीब, सामान्य शेतकरी, मजूर कुटुंबातून आलेले आहेत. शिक्षण घेत असताना त्यांना स्वतः मजुरी करावी लागली. बँडबाजा पथकात काम करून त्यांनी आपले स्वतःची शिक्षण पूर्ण केले आणि कुटुंबाला देखील हातभार लावला .अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून केले आहे. त्यांच्या जीवनाचे आणि जगण्याचे खडतर अनुभव त्यांच्या साहित्यात उमटतात. ‘मायबाप’ हा त्यांचा आठवा कवितासंग्रह आहे . या अगोदर त्यांचे “जिव्हाळा, वाजंत्री ,अनाथ, मला साळंत जायचं ,पाणपोई, आईचा हात,” इत्यादी कवितासंग्रह आणि ” झुमरी, गोदाकाठचा गावकुस, पाणक्या, मर्मबंध ,” हे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.

औरंगाबादचे प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे यांच्या घरी त्यांच्याच हस्ते सदरील ‘मायबाप’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बालसाहित्यिक प्रा.डॉ. लीलाताई शिंदे, कवी अय्युब पठाण लोहगांवकर, हबीब भंडारे, संजय खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“मायबाप” या कवितासंग्रहात चौऱ्यांनव प्रौढ आणि बालकविता अंतर्भूत आहेत.
लहान मुले कल्पनाविश्वात रमतात. परी, बाहुली, चिऊताईच लगीन, प्राण्यांचे किल्ले , चांदोबा , चंद्रावरची शाळा, चांदोबाचे घर , चिऊताई अशा अनेक कवितांमधून बालमनाच्या कल्पनाविश्वाला कवी अय्युब पठाण यांनी फुलविले आहे. ” चांदोबा ” या कवितेतून ते म्हणतात ,

” रात्रीला भरते तुझी शाळा
चांदण्याचे खडू ,आकाशाचा फळा
सारे काढतात सुंदर माळा
ढगांना लागे शाळेचा लळा “

बाल मनाला बऱ्याच वेळेस आकाशात उडावं, सगळं आकाशातून कसं दिसतं, ते पहावं असं वाटत राहतं. त्या भावना कवींनी ” परी ” या कवितेतून मांडल्या आहेत,

” परी गं परी मी तुझ्या
पाठीवरती बसून
सगळे सुंदर जग
पाहून येई फिरून “

मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक व्हावी या हेतूने देखील कवींनी अनेक कवितांची गुंफण केली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता , बंधुभाव, सर्वधर्मसमभाव अशी मूल्य त्यांच्या बालकविता मधून रुजविली जातात.

” डोरेमॉन ” या कवितेतून सर्व धर्माच्या लहान मुलांची नावे दिसून येतात.

” बाल गोपाल जमले
छोटा भीम, क्रिश आला
सिनचॅनला बोलावून
डोरेमॉन सुद्धा आला “

पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं असतं . पाऊस पडला की, शेतकरी आनंदून जातो. पिके डोलायला लागतात. तसंच लहान मुलांचे देखील असते. पाऊस आला की मुलांना घरा बाहेर जावं वाटतं, अंगणात- पावसात भिजावं वाटतं. कवीला पावसाच्या या भावना दाटून येतात. या काव्यसंग्रहात त्यांच्या पावसाशी संबंधित असलेल्या पाच कविता समाविष्ट आहेत.

” आई पाऊस दे!, दिवस पावसाचे, मिरगाचा पाऊस आणि पावसाळा.” पावसाशी संबंधित असलेल्या प्रत्येक कवितेत वाचक कविता वाचत असताना चिंब चिंब भिजून जातो .

” या पावसाने सगळा शिवार हा चिंब केला,
तृप्त झाली काळी भुई, सारा परिसर न्हाला.”

कवीला ऋतूंचा झालेला बदल भावतो . ” पावसाळा, वसंत ऋतु ,थंडीचे दिवस आणि उन्हाळा “अशा कवितेमधून कवीनी ऋतु बदलाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. वसंत ऋतु कवितेतून कवी म्हणतात ,

” आला हा वसंत ऋतू, सारी सृष्टी बहरली,
लाल-केशरी फुलांची , चादर ही पांघरली.”

कवीच्या सामाजिक जाणिवा अत्यंत प्रगल्भ आहेत. माणूस समाजशील प्राणी आहे. समाजाला- माणसाला सण-उत्सव प्रिय आहेत. कवीचं संवेदनशील मन या सणांना उत्सवांना आपल्या लेखणीतून सुंदररित्या मांडले आहे . कवी ” बकरी ईद, रमजान ईद ” या सणांचा उल्लेख करतात. त्याचबरोबर हिंदू समाजाच्या ” दिवाळी , नवे वर्ष, महाशिवरात्र, रक्षाबंधन , दहीहंडी , मकर संक्रांत ” इत्यादी सणांवर देखील त्यांच्या कविता दिसून येतात. ” नाताळ ” या ख्रिश्चन बांधवांच्या सणावर देखील त्यांची कविता या कविता संग्रहात समाविष्ट आहे. राष्ट्रीय सण,”प्रजासत्ताक दिन ” यावर देखील त्यांची कविता आहे. म्हणजेच सर्वधर्मसमभावाचे तत्व कवीच्या खोल मनात किती रुजले आहे, ते या ठिकाणी दिसून येतं. ” रमजान ” या कवितेतून कवी म्हणतात,

” पाच वेळेची नमाज रोज पढण्यात येई,
पहाटे सेहरी आणि सूर्यास्त इफ्तार होई.”

दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी हा अनेक सणांचा एकत्र असा मेळा घेऊन येतो.

” फटाके वाजे जोमाने , दिव्यांने सजे अंगण,
पंचपक्वान- भोजन, आला दिवाळीचा सण.”

आपले महापुरुष आणि संत हे सातत्याने आपल्याला मार्गदर्शक ठरले आहेत. संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा, गुरुनानक, जाणता राजा शिवाजी , राजमाता जिजाऊ, भीमराव प्रणाम , महात्मा फुले, सावित्री माय, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे, इंदिरा गांधी, स्वर लता, अनाथांची माय, इत्यादी चौदा कवितांमधून संत महापुरुषांचे व्यक्तीचित्रण करणाऱ्या कविता आल्या आहेत.

महात्मा फुले या कवितेतून कवी म्हणतात,

” पुण्यात मुलींची शाळा काढली,
स्त्री शिक्षणाची हिम्मत वाढली.”

ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात दुसरी कोणतीच नाही. म्हणूनच कवी ‘मी ज्ञानपोई होईन’ या कवितेतून अविरत ज्ञानदानाचे कार्य करण्याचा संकल्प करीत आहे. ” साक्षरता ” या कवितेतून सर्वांनी शिकावं, पुढे जावं असं सांगत शिक्षणाचे महत्व कवीने मांडलं आहे . ‘पुस्तकांशी दोस्ती’ या कवितेतून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.

” पुस्तकांशी दोस्ती ” या कवितेत कवी म्हणतात,

” जे सूर्याला न दिसते
ते पुस्तकात असते,
पुस्तकांचे आणि आपले
नाते दोस्तीची असते.”

आपलं गाव, आपला परिसर, आपलं राज्य ,आपला देश, यांचा अभिमान वाढवणारी कविता अय्युब पठाण मोठ्या सामर्थ्याने लिहितात. त्याची सुरुवात, ” माझे गाव, शिवार, आनंदाचे गाव , माझा मराठवाडा, महाराष्ट्र माझा ” या कवितातून दिसून येते. या काव्यसंग्रहात पहिली कविता ” महाराष्ट्र माझा ” मध्ये म्हणतात,

” शूरविरांनी इथे प्राणाची लावून बाजी,
या राष्ट्रसाठी लढले मावळे राजे शिवाजी.”

राष्ट्राचा अभिमान वाढवणार्‍या, ” तिरंगा, प्रजासत्ताक दिन, ऑगस्ट क्रांती ” या कवितादेखील वाचकाच्या मनात आपल्या पूर्वजांविषयी आदरभाव वाढवितात.

” प्रजासत्ताक दिन ” या कवितेत कवी म्हणतात,

” प्रजासत्ताक राष्ट्र भारत सरकार
येथे थोर रत्न, फुले-शाहू-आंबेडकर आम्ही माथा टेकतो तुमच्या चरणावर,
हे भारत माता जय जयकार.”

आपल्याला लहानचे मोठे करत, संस्कार देत ,आपले आई-वडील मोठे परिश्रम आणि कष्ट घेतात. त्यांच्या विषयीची कृतज्ञता त्यांच्या ” मायबाप,आई, माझी आई , माहेर ” या कवितेतून दिसून येते. “मायबाप ” कवितेत कवितेतील-

” जेव्हा मस्तक टेकतो
माय बापाच्या चरणी,
दुवा देई मायबाप
घर होई आबादानी.”

अशी आई- वडिलांची माहिती सांगणारी ही कविता पुस्तकाच्या नावासाठी सार्थ ठरते. कोरोना काळात मानवी जीवन मोठे दोलायमान झाले. अनेक आप्तेष्ट आपल्याला सोडून गेले . त्या वेदना त्यांनी ‘सरण’ या कवितेतून मांडल्या आहेत.

” कोरोनाच्या संकटात यमा वर ताण आले,
कोरोनाने माणसाचे मरण हे स्वस्त केले.”

मानवी जीवनाचे वास्तव सार,” माणसा रे !, जीवनात आणि जीवनाचे मर्मगंध ” या कवितेत कवीने मांडले आहे. प्रौढ व बाल कविता असलेला हा कवितासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.

पुस्तकाचे नाव :-“मायबाप” (काव्यसंग्रह)
कवी – अय्युब पठाण लोहगांवकर.
प्रकाशक – तेजस प्रकाशन, औरंगाबाद.
पाठराखन:- डॉ. श्रीकांत पाटील.
पृष्ठे:- ९९, मूल्य:- १००/-

Related posts

साथ दे तू मला

नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा

दु:खाला आवर घाल माणसा…

Leave a Comment