घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि कष्टाची असूनसुद्धा भारत सातपुते यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, जिद्दीमुळे आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश म्हणजे धकधकती ज्वालाच.
परशराम आंबी, मुख्याध्यापक,
नवनाथ हायस्कूल, पोहाळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

जागरण या आपल्या आत्मकथनामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचे सार मांडलेले आहे. त्यांचे जागरण हे आत्मकथन माझ्या वाचनात आले. सुरुवातीस वाचताना जागरण म्हणजे गोंधळी समाजाने धार्मिक कार्यात घातलेल्या गोंधळाचे जागरण आहे असे वाटले. पण जसजसे वाचत गेलो, तसतसे लेखक भारत सातपुते यांनी स्वराज्याबरोबर सुराज्यासाठी निर्भीडपणे देशभक्तांनी कसे जागरण केले, देशासाठी बलिदान दिले. अशा देशभक्तांना ही साहित्यकृती अर्पण केलेली आहे हे वाचताना दिसून येते.
भारत सातपुते यांनी बालसाहित्य, व्यक्तिचरित्रे, कथासंग्रह, काव्यसंग्रह, वात्रटिका संग्रह अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी ६० पेक्षा जास्त साहित्यकृतीचे लेखन केलेले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीमधील त्यांचे योगदान अनमोल आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अनेक प्रकारच्या जीवनानुभवाचे शिक्षण दिले आहे. त्यांनी अनेक शाळा मोडकळीला आल्या होत्या, त्यांचे पुनरुज्जीवन केलेले आहे. वाडी-वस्त्यावरील शाळांना नवसंजीवन देण्याचे कार्य त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरणा नावाचे हस्तलिखित काढले. शिक्षणाची नाळ समाजाशी जोडण्यासाठी ते पारंपरिक सण-उत्सव यांचा खुबीने वापर करून घेत होते. आज नैसर्गिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असताना भारत सातपुते यांनी शाळांतून मुलांमध्ये प्राणी, पक्षी, झाडे यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण केली.
शिक्षक म्हणून काम करताना अनेक पदावर आपली जबाबदारी ओळखून सचोटीने काम केले. हे काम करताना अनेकवेळा संघर्षाचे प्रसंग आले; पण ते आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे हटले नाहीत. त्यांचे जागरण आत्मकथन म्हणजे त्यांच्या जीवनातील संघर्षाचा परामर्श आहे. विविध संघटनांमध्ये काम करताना समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये अनिष्ट रूढी, लाचखोर पद्धती यांना सडेतोड प्रतिकार केला आहे.
भारत सातपुते यांना लहान वयात वर्गमित्राचे कपडे घालावे लागत होते. यावरून त्यांच्या गरीब परिस्थितीचे वास्तव दिसून येते. त्यांचे वडील म्हणजे भऊ वह्यांची कोरी पाने फाडून ती दोऱ्याने शिवून देत होते. पत्तीचा पेन व शाईची दौत फार जपून वापरायचे. नंतर कांड्यांचे बॉलपेन घेत होते. कांडी संपली की नवी घेऊन ती पेनात घालून वापरायची. कांड्या जास्त लागू नयेत म्हणून गणितासाठी पाटी-पेन्सिलचा वापर करत होते. ( पान नं. २० – २१ )
भाऊला चप्पल आणायला सांगितल्यास ते म्हणायचे, “या आठवड्यात डाव्या पायातला आणू अन पुढच्या आठवड्यात उजव्या पायाचा आणू.” यावरून घरचे अठराविश्वे दारिद्र्य दिसून येते.
लेखकांनी शिकल्यानंतर समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत केली आहे. आपल्या वाट्याला जे दुःख आले ते समाजातील अशा गरीब मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी मदत केली. त्यांनी आयुष्यात बेईमानी न करण्याचा धडा घेतला तो दुधाच्या प्रसंगातून.
शिक्षक पदाची ऑर्डर आल्यानंतर ते जि. प. शाळा भातांगळीला गेले. शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर नलावडे गुरुजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करून घरी गेले होते. लेखक त्यांच्या घरी गेले. तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, “अरे लक्षात ठेव. शाळेत मुलांना सुट्टी असेल पण कार्यालयात सुट्टी नसते. आपण नोकरीला २४ तास बांधलेले असतो. तू सांगितले तेवढे ऐक. एक-एक दिवसांनी जेष्ठता महत्वाची असते.” तो दिवस होता १४ एप्रिल १९८२.( पान नं. ३७ )
भ्रष्टाचार हा वाईट असतो. हे त्यांनी स्वतःच्या भावाला म्हणजे आबाला सांगितले होते. पण आबावर परिणाम झाला नाही. शेवटी एका अपघातात ते गेले. तेव्हा लेखकांनी गाडीवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला. भावजयीला नुकसान भरपाई मिळाली. शिवाय तिला अनुकंपामध्ये नोकरी लागली.(पान नं. ८०)
भ्रष्टाचाराच्या बाबतीत ते लिहितात कडक अधिकारी गेल्या गेल्या प्रभारी अधिकारी या सर्व फायली मंजूर करतो. ही किमया आहे. या काळात शेकडो फायलींवर निर्णय होतात. पुन्हा दुसरा अधिकारी आला तरी त्या प्रभारी अधिकाऱ्याच्या काळातील तारखा टाकून म्हणजे मागील त्या तारखेस वर्षानुवर्षे फायली मंजूर होतात. या कागदांना लागणारा आवक-जावक नंबर हा बरोबर त्या तारखेचा मिळतो. ( पान नं. १३१ )
लातूरला डी. एड. शिक्षण घेतानाच लेखकाला कविता लेखनाचा छंद लागला होता. आई-वडिलांचे कष्ट, लेखकाची शिकण्याची ओढ, कौटुंबिक अडचणी, कामातील प्रामाणिकपणा, निर्भयवृती याचे चित्रण त्यांच्या कवितेतून विशेषतः वात्रटिकातून त्यांनी केलेले आहे. जे अनुभवले ते परखडपणे मांडण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. यामध्ये कौटुंबिक जबाबदारी, शालेय अनुभव, प्रशासक म्हणून आलेले अनुभव आणि शिक्षक संघटनेमध्ये काम करताना जिल्हा परिषद अध्यक्ष, शासकीय यंत्रणा याविषयी परखडपणे आपले अनुभव मांडलेले आहेत.
शाळेमध्ये असताना शाळेतील शिक्षकांची वृत्ती, कॉपी प्रकार, विनाकष्ट घेतलेला पगार याविषयी आपल्याच शिक्षकांविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला दिसून येतो. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले. त्यामुळे ६० ते ७० टक्के लागणारा निकाल अगदी शून्यावर आलेला आपणाला पाहायला मिळतो. यावरून शिक्षणातील अंधागोंदीला त्यांनी केलेला विरोध दिसून येतो. प्रौढ साक्षरता कार्य करत असताना मिळणारे तुटपुंजे मानधन. तरीही स्वतः पदरचा खर्च करून कार्य करत होते.
निलंग्याला ते प्रभारी मुख्याध्यापक झाले होते. शाळेचा पहिला दिवस होता. सकाळी गडबडीने जात असताना त्यांना त्याच भागातील ओळखीचे केंद्र प्रमुख असलेली व्यक्ती भेटली. बसच्या तिकीटाचे पैसे द्या म्हणाले. त्यांनी आपल्या गाडीवर बसवून नेले. पण वीस किलोमीटर गेल्यानंतर गाडीचे मागील चाक पंक्चर झाले. खूप त्रास झाला. पंक्चरचे पैसे लेखकांनीच दिले. पंक्चर काढल्यानंतर पाच सहा किलोमीटर गेल्यावर पुन्हा तेच चाक पंक्चर झाले. आडरानात काय करावे? तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाले, “मी काय केंद्रप्रमुख आहे. मला वेळेवर गेले काय अन् न गेले काय. पण तुम्ही कसे करताव? तुम्हीही ताण घेऊ नका. मुख्याध्यापकच झाला हो ना! शाळेत सांगायचे जिल्ह्याला काहीतरी काम होते म्हणून गेलो होतो.’ पण लेखकांना हे पटले नाही. ते धावपळ करत अगदी कसेबसे प्रार्थनेच्या वेळी शाळेत पोहोचले. ( पान नं. १३९ )
एकदा निकालावर सही करताना त्यांनी संबंधिताच्या उत्तरपत्रिका गट्टा मागवला. चाचणीचा इयत्ता तिसरीचा मॅडमचा निकाल पाहताना त्यांना पुढील गोष्टी आढळून आल्या.
१) विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तरे लिहूनही मार्क दिलेले होते. ४२ × ४ = ८८ , ३२१ – ७९ = ३५२ , २२ × २ = ७४ तर काही मुलांनी बरोबर उत्तरे लिहून चूक दिले होते. ९ × ० = ० म्हणजे शिक्षक असूनही संख्येतील चढ-उतार गुणाकार भागाकार या प्राथमिक क्रियासुद्धा मॅडमना येत नव्हत्या. भागाकार गणितातील भाज्य , भाजक, भागाकार व बाकी कशाला म्हणतात तेही कळाले नाही. शेवटी त्यांना लेखी समज देऊन सुधारणा करण्याची संधी दिली. ( पान नं. २६४ – २६५ )
भारत सातपुते यांच्या जीवन प्रवासात अनेक चढ-उतार आलेले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनैतिक गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तरीही कशाची भीडभाड न ठेवता ‘जसं घडलं तसं’ त्यांनी जागरणमध्ये आत्मकथन मांडलेले आहे. ते स्वतः ज्या परिस्थितीतून गेले तशी परिस्थिती कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. अनेक अनिष्ट पद्धतीला विरोध केला. पण चांगल्या गोष्टीला साथही दिली.
मी त्यांच्याबद्दल इतकेच म्हणेन की, ‘जंगलाला आग लागली होती. सर्व पशु-पक्षी पळून गेले. पण एक चिमणी आपल्या परीने आग शमवण्याचा प्रयत्न करीत होती. तिला कुणीतरी विचारले, “तुझ्या इवल्याशा प्रयत्नाने जंगलची आग नियंत्रणात येईल का ॽ” तेव्हा तिने दिलेले मार्मिक उत्तर हे आशावादी आहे. ती म्हणते, “उद्या कोणी इतिहास लिहिला तर माझे नाव पळून जाणाऱ्यामध्ये न येता आग शमवणाऱ्यामध्ये येईल.” हाच भावार्थ लेखक भारत सातपुते यांच्यासाठी आहे. त्यांनी आपल्या परीने जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारासारखे, अनैतिकतेसारखे प्रसंग आले. तेव्हा त्यांनी त्या प्रसंगाना स्पष्टपणे विरोध केला. म्हणजे त्यांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे.
त्यांचे आत्मकथन साध्या, सोप्या व सरळ शब्दांमध्ये आहे. त्यांनी आपल्या बोली भाषेचा वापर केलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या चांगल्या बाजूच मांडल्यात असे नाही; तर आपली दुसरीही बाजू मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे हे मला नमूद करावे वाटते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके वाटते. एक व्यक्ती संबळ वाढविते आहे. तो त्यांचा पारंपरिक व्यवसाय झाला. पण त्यातून निघणाऱ्या ज्वाला या समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा, भ्रष्टाचार, अन्याय यासारख्या गोष्टींना जाळून टाकतात. देशभक्तांनी मुस्लिम, इंग्रज यासारख्या सत्तांना उलथवून टाकले. त्याप्रमाणे आजही घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टींना उलथवून टाकण्याचे कार्य भारत सातपुते यांच्यासारखे (लेखक) लोक करत आहेत हे प्रतिकात्मक रुपाने मुखपृष्ठावरील संबोधातून सूचित होते. तर मलपृष्ठावरील मजकूरातून आत्मकथनातील सार समजून येतो. या नंतरही त्यांच्या हातून समाजोपयोगी, सकस व निर्भीडपणे साहित्य निर्मिती व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
पुस्तकाचे नाव – जागरण
लेखक – भारत सातपुते
साहित्य प्रकार – आत्मकथन
प्रकाशन – मांजरा प्रकाशन
किंमत – ६०० ₹
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.