November 21, 2024
Today's woman is capable of meeting the changing challenges of time
Home » काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील
काय चाललयं अवतीभवती

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

  • महिला असण्याचा अभिमान बाळगा; सवलत नको
  • भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करा

कोल्हापूर : काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी तसेच स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह व महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी समाजाने मानसिकता बदलावी, असे आवाहन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजमध्ये “वुमन एमपॉवरमेंट कमिटी” व अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने “आजच्या स्त्री समोरील आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्रीमती पाटील बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही.एम.पाटील, उपप्राचार्य डॉ. रघुनाथ ढमकले, “वुमन एमपॉवरमेंट कमिटी”च्या प्रमुख सरोज देशमुख प्रबंधक एम.वाय कांबळे, अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा. कविता गगराणी तसेच प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वृषाली पाटील म्हणाल्या, सध्याच्या आधुनिक युगात घर सांभाळून करिअर करताना महिलांची तारेवरची कसरत होते. अशावेळी घरातील प्रत्येक सदस्याने घरातील कामांमध्ये हातभार लावल्यास तिच्यावरील ताण कमी होऊ शकतो. सन्मानाची वागणूक मिळवण्यासाठी स्त्रियांना पावलोपावली संघर्ष करावा लागतो. गुणवत्ता असली तरी देखील प्रत्येक टप्प्यावर ती कामातून, कर्तृत्वातून सिद्ध करुन दाखवावी लागते.

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन होण्याबरोबरच वेळोवेळी बैठका व मार्गदर्शन सत्र आयोजित करुन या समित्या बळकट करणे आवश्यक आहे.

वृषाली पाटील, माहिती अधिकारी

स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह रोखण्याबरोबरच स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. माध्यमांनी देखील स्त्रीचे चित्रण सकारात्मक पद्धतीने समाजापुढे मांडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. करिअर करताना रात्रीच्या वेळी समाजात वावरताना संकटकालीन परिस्थिती ओढवलीच तर त्यावेळी देखील संरक्षण करता यावे यासाठी कराटे, ज्यूडो, बॉक्सिंग, लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यावे त्याचबरोबर दक्षता समितीचे हेल्पलाइन क्रमांक जवळ बाळगून इतर महिलांपर्यंत ही पोहोचवा. मुलगा मुलगी भेद दूर होण्यासाठी कुटुंबातून संस्कार द्यावेत. वृद्धाश्रम आणि पाळणाघराची संख्या कमी होण्यासाठी तडजोड वृत्ती स्वीकारा. मुले आणि पालकांमधील संवाद वाढवा, असे आवाहन वृषाली पाटील यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.रघुनाथ ढमकले म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थिनींनी अधिकाधिक ज्ञान संपादन करावे. आवड असणाऱ्या क्षेत्राशी निगडित कौशल्ये आत्मसात करावी. त्याचबरोबर त्या त्या विषयीची अद्ययावत माहिती घेत जागरुक रहा. सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक माहिती व ज्ञान घेण्यासाठी करुन रोज थोडी प्रगती करा. छंद जोपासा. आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

प्रास्ताविक प्रा.सरोज देशमुख यांनी केले. परिचय अंतर्गत तक्रार समिती प्रमुख डॉ.कविता गगराणी यांनी करुन दिला. आभार एस. बी. लोहार यांनी मानले. सूत्रसंचालन एस. एस. घाटगे यांनी केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading