March 25, 2023
No one becomes a king by begging article by rajendra ghorpade
Home » भिक मागून कोणी राजा होत नाही तर….
विश्वाचे आर्त

भिक मागून कोणी राजा होत नाही तर….

राजा हा गुणांनी, पराक्रमांनी, कर्तृत्त्वाने राजा होत असतो. प्राप्त परिस्थितीत दाखवलेले कर्तृत्वही राजासाठी महत्त्वाचे असते. जनतेला न्याय मिळवून देणे हे राजाचे प्रथम कर्तव्य कर्म आहे. तो त्याचा राजधर्म आहे. तो धर्म त्याने सांभाळणेही तितकेच गरजेचे असते. गादीचा धर्मही सांभाळणे हा सुद्धा राजधर्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

सुरवाडेंसि भिकारी । वसो पां राजमंदिरी ।
तरी काय अवधारीं । रावो होईल ।। 239 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – हे पाहा, एखादा भिकारी चैनित राजवाड्यात बसेना का ? तर तेवढ्यावरून तो राजा होईल काय ?

राजा कोणास म्हणावे ? राजा कोण असतो ? राजा सुद्धा एक व्यक्तीच असते. पण मग इतर लोक आणि त्याच्यामध्ये फरक काय असतो ? सध्या लोकशाहीच्या युगात राजेशाहीची संकल्पना फारशी परिचित नाही. त्यामुळे कदाचित राजेशाहीचा हा विचार मनाला पटणे थोडे कठीण जाणार आहे. प्रत्येक देशात एखादातरी महान राजा होऊन गेलेला इतिहासात आढळतोच. राजाचे पुढचे वारसदार त्याच्यासारखे राजे होतात असेही घडत नाही. मग राजा या व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थाने अभ्यास होण्याची गरज आहे. सम्राट किंवा छत्रपती झाल्यानंतर राजाने संन्यास घेतल्याचेही अनेक ठिकाणी आढळते. याचाही अध्यात्मिक दृष्टिने अभ्यास होणे गरजेचे आहे.

अधर्माचा विनाश करण्यासाठी राजाचा जन्म झाल्याचा इतिहास सांगतो. काही राजांनी पराक्रमाने, कर्तृत्त्वाने प्रज्येच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवले. त्यामुळे त्यांचे गोडवे, त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही चर्चिली जाते. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास भावीपिढीला आजही प्रेरणादायी ठरतो. म्हणजे राजाचा अधिकार वारसाहक्काने मिळाला असला तरी पराक्रमाने, स्वकृत्त्वाने तो टिकवावा लागतो. राजाचा वारसा सांगून भिकाऱ्यासारखी गादी मिळवणारे वारसदार चैनित जरी गादीवर बसले तरी ते राजा होत नाहीत. कागदपत्रे गोळा करून वारसा दाखवून गादी मिळवणारे राजे हे फक्त नामधारी असतात.  ते जनतेच्या मनात कधीही चिरकाळ स्थान निर्माण करू शकत नाहीत. गादीचा वारसा हा पराक्रमाने मिळवायचा असतो. परकियांच्याबरोबर युद्धाचा पराक्रम करून तर स्वकीयाच्याबरोबर कर्माने पराक्रमाने, न्यायदानाने मिळवायचा असतो.

लोकशाहीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हाच नियम आहे. घराणेशाही फार काळ टिकत नाही. अनेक घराणी आली आणि गेली. असे का झाले ? कारण पराक्रमाने, कर्त़त्त्वाने वारसा पुढे चालवायचा असतो. हायकमांडची मर्जी मिळवून मिळवलेली सत्ता फारकाळ टिकत नाही. जनतेला पैसे वाटून मिळवलेली सत्ताही अशीच असते. पैस वाटले, तो पुन्हा पैसे पुन्हा गोळा करणार हे जनतेच्याही लक्षात येत नाही. अशा राज्यकारभाराचा शेवट त्यांच्या मृत्यूनंतर संपतो.

लोकांच्या हृद्ययात स्थान निर्माण करणारे कार्य करून दाखवले तरच ते कार्य अमर ठरते. उत्स्फुर्तपणे जनतेने दिलेली दाद ही कायमची स्मरणात राहाते. पण राजकारणात आता तसे घडत नाही. अशानेच सज्जन व्यक्ती राजकारणापासून दूर गेल्या आहेत. राजा हा गुणांनी, पराक्रमांनी, कर्तृत्त्वाने राजा होत असतो. प्राप्त परिस्थितीत दाखवलेले कर्तृत्वही राजासाठी महत्त्वाचे असते. जनतेला न्याय मिळवून देणे हे राजाचे प्रथम कर्तव्य कर्म आहे. तो त्याचा राजधर्म आहे. तो धर्म त्याने सांभाळणेही तितकेच गरजेचे असते. गादीचा धर्मही सांभाळणे हा सुद्धा राजधर्म आहे. तो सांभाळण्यात कसूर केल्यास तो वारसाही कायमचा नष्ट होऊ शकतो. धर्म पाळण्यासाठी त्याला कितीही मोठा लढा उभारावा लागला तरी तो आवश्यक असतो. कारण राजा हा कर्माने, कर्तृत्त्वाने राजा ठरत असतो. तरच राजा म्हणून तो नावलौकीक मिळवतो. बुद्धीबळाच्या खेळात राजा मारला की खेळ संपतो. पण तो खेळ आहे. प्रत्यक्ष जीवनात राजा मेला म्हणून राज्य संपत नसते कारण जो जन्माला आला त्याचा शेवट हा निश्चितच आहे. मग तो राजा असो वा रंक.

सध्या राजकारणात भाट, शाहिर गोळा करून स्वतःच्या नावाचा डंका वाजवून सत्ता मिळवणारे अनेकजण पाहायला मिळतात. काही हरकत नाही. यातून काहींना रोजगार उपलब्ध होतो. आपल्याबाजूने बोलणारे शंभर लोक जमवून सत्तापट जिंकणारे राजकारण सध्या सुरु आहे. ते नुसतेच बोलघेवडे असतात. त्यांचे कर्तृत्व शुण्य असते. अशांचा सध्या बोलबोला राजकारणात झाला आहे. दुरदृष्टीठेवून कार्य करण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे सध्या राजकारणात अस्थिरता अधिक पाहायला मिळत आहे. कोणतीही दृष्टी नसणारे नेते आज पाहायला मिळत आहेत. अशानेच देशाच्या राजकारणात अस्थिरता आली आहे. ही अस्थिरता संपवायचा अधिकार जनतेकडेच आहे. यासाठी जनतेलाच दृष्टी देणे महत्त्वाचे आहे. राजकिय शुद्धीकरणाचे परिवर्तन हे आणायला हवे. म्हणूनच राजा कसा असतो याचा पाठ समजावून घेणे गरजेचे आहे. जनताच अशा राज्याचे शुद्धीकरण करू शकते. लोकशाहीत तसा अधिकार जनतेला दिला आहे. इतिहासातील उठाव हे यातूनच झाले आहेत. हे विसरता कामा नये.

Related posts

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

कुंडलिनी नावाची तेजःशक्ती…

भेटीलागी जीवा…चा आनंद

Leave a Comment