October 28, 2025
श्रमिक मुक्ती आंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांना आदरांजली. आदिवासी हक्क, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
Home » विजय: आनंदी आनंद !
मुक्त संवाद

विजय: आनंदी आनंद !

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. एक अभ्यासू, संघर्षशील कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातील मानवी हक्काच्या चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांच्यासोबतचे अनुभव या लेखात मांडले आहेत.

राजन इंदुलकर,
सती, चिपळूण, जि. रत्नागिरी. 9423047620, 8600890162
indulkarrajan@gmail.com

भारतातील आणीबाणी दरम्यानचे म्हणजे सन १९७०-८० हे दशक चळवळींचे होते. समाजातील विषमता, शोषण याविरुद्ध आवाज उठविणे, वंचित, शोषित, कष्टकरी जनतेला संघटीत करणे आणि एकूणच समताधारित, न्यायाधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या हजारो युवा कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. अनेकानेक जनसंघटना निर्माण झाल्या, संस्थाही स्थापन झाल्या. याच काळात ठाणे, रायगड, नाशिक, धुळे या जिल्ह्यात आदिवासींच्या हक्कानिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या जन-संघटनांना एकत्र बांधणारा ‘शोषित जन आंदोलन’ हा मंच देखील निर्माण झाला.

डॉ. विजय साठे हे त्या युवा फळीतील बिनीचे कार्यकर्ते होते. मुंबईतील निर्मला निकेतन या समाजकार्य विद्यापीठातून डिग्री घेत असताना फिल्ड वर्कसाठी त्यांना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरात पाठविण्यात आले आणि शहरात माघारी न फिरता तेथेच रुजले. सहअध्यायी कार्यकर्त्या एड. इंदवी तुळपुळे यांच्या तसेच इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत कार्यरत राहून त्यांनी ‘श्रमिक मुक्ती आंदोलन’ या संघटनेची आणि जोडूनच ‘वन निकेतन’ या संस्थेची उभारणी केली. दरम्यान विजय आणि इंदवी या दोघांचा विवाह देखील झाला. समाजकार्य करीत असताना विजय साठेनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवीत समाजकार्यातील एम.एस.डब्ल्यू.सह कायद्याची पदवी आणि ‘आदिवासी व त्यांचे जमिन विषयक प्रश्न’ या विषयावरील पी.एच.डी. देखील मिळविली.

या साऱ्या पदव्या केवळ दागदागिने म्हणून मिरविण्यासाठी नव्हेच, वैयक्तिक समृद्धीसाठीसुद्धा नव्हे, तर आपण हाती घेतलेले सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे या हेतूने मिळविल्या आणि वापरल्या. विजय साठे यांचे आणि त्यांच्या संघटनेचे कार्य अत्यंत झंजावाती आणि प्रभावी होते. आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांची फसवणूक थांबावी यासाठी सत्याग्रह, धरणे, मोर्चे, आंदोलने, न्यायालयीन लढाया, धोरणात्मक बदल इ. विविध पातळीवरचे हे काम होते. अर्थात हे काम एका मजबूत अशा सरंजामी, भांडवली व्यवस्थेविरुद्ध असल्याने संघर्ष तर नित्याचाच होता. त्यांच्यावर चोरी, दरोडा, ऐट्रोसीटी इतकेच काय खुनाच्या देखील खोट्या केसीस टाकण्यात आल्या होत्या. अर्थात खोट्या असल्याने या साऱ्या केसीसमधून त्यांची सहीसलामत सुटका होत गेली.

विजयची माझी पहिली भेट झाली ती सन १९९० च्या दशकात मुंबईतील एका आदिवासी पाड्यात झालेल्या शोषित जन आंदोलनाच्या बैठकीच्या निमित्ताने. त्यावेळी मला तो काहीसा शिष्ट वाटला. मुळात त्याचे व्यक्तिमत्वच प्रभावी, आकर्षक, देखणे होते. शिवाय तो टापटीप देखील होता. पुढे अशाच बैठकातून भेटी होत गेल्या. याच काळात त्याच्या डोळ्यांना रेटीनायटीस पिगमेंटोसा हा डोळ्यांचा विकार झाला. या विकारामुळे हळूहळू डोळ्यांच्या आतील प्रकाश ग्रहण करणाऱ्या पडद्यावर बदल होत जातात आणि दृष्टी कमी होत जाते. त्याच्या या आजाराच्या बातमीमुळे चिंता वाटली. तरीही तो काम करीत आहे हे ऐकून कौतुकही वाटत होते. दरम्यान त्याने आदिवासींच्या समस्यांवर विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यातून लिखाण केले होते. ज्याचे संकलन ‘जीवन संघर्ष’ या पुस्तकात करण्यात आले. त्यासोबत गावचा कायदा, लढेंगे जितेंगे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा इ. पुस्तकांचेही लेखन केले.

श्रमिक मुक्ती आंदोलनाच्या कार्यक्षेत्रात म्हणजे मुरबाड, शहापूर, कर्जत तालुक्यात कातकरी आदिवासींची मोठी संख्या आहे. या समाजासोबत विजयची नाळ जुळली. कातकरी या आदिम आदिवासी समाजाच्या अत्यंत विदारक स्थितीचा अभ्यास करून बन्सी घेवडे यांच्यासह अकादमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स, कर्जत प्रकाशित, ‘कातकरी’ या पुस्तकाचे लिखाण केले. नजरेचा आजार झाल्याने विजयचा संघटनेच्या दैनंदिन कामातील सहभाग कमी होत गेला. मग बाहेरील कार्यकर्त्यांना कायद्याबाबत मदत करणे, प्रशिक्षण करणे अशा स्वरूपाच्या कामात त्याने लक्ष घातले. सन २००४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातही कातकरी आदिवासींचे वास्तव्य असल्याने एका संघटनेसोबत तो आमच्याकडे आला. त्यावेळी अधिक जवळची भेट झाली आणि सख्य जुळले.

दरम्यान आमच्या ‘श्रमिक सहयोग’ संस्थेच्या वंचित समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी चाललेल्या प्रयोगशील कामाचा पुढील टप्पा म्हणून चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे ‘प्रयोगभूमी’ शिक्षण केंद्र उभे राहत होते. विजयने येथे मुलांसोबत येऊन राहावे अशी कल्पना आमच्या चर्चेतून पुढे आली. यात आमची दुहेरी भूमिका होती. एक तर विजयला एका जागी स्थिरपणे मुलांसोबत राहता यावे आणि त्याचे लिखाण ही व्हावे. मुलांनी त्याची नजर व्हावे, त्याने मुलांना ज्ञानार्जनासाठी मदत करावी. सन २००६ मध्ये तो प्रयोगभूमीत राहायला आला. प्रयोगभूमीच्या कामात त्याचे नियमित मार्गदर्शन व सहभाग मिळत गेला. शिवाय आमच्यासोबत कार्यरत असलेल्या आदिवासी संघटनेच्या कामातही त्याचे योगदान मिळत गेले.

विजय अत्यंत शिस्तबद्ध होता. पहाटे पाच वाजता त्याचा व्यायाम सुरु व्हायचा. वार्मिंग अप, योगासने, प्राणायाम, डोळ्याचे व्यायाम हे सारे काही त्याने स्वतः करीत करीत मुलांना शिकविले. आहारात त्याचा भर विविध रंगांवर, हिरव्या कच्च्या पालेभाज्यावर, फळांवर असायचा. मांसाहाराची त्याला सवय नव्हती. मुले चिकन खायची त्यावेळी मात्र त्यातील रस्सा तो आवडीने घ्यायचा. मुलांना इंग्लिश, गणित हे अभ्यास विषय तो शिकवायचा. मुलांच्या वाढीवर, वागणुकीवर, घडामोडींवर त्याचे बारीक लक्ष असायचे. हे लक्ष अर्थात तो सततच्या संवादाद्वारे ठेवायचा. आम्ही सारे जण त्याला प्रेमाने, आदराने ‘काका’ म्हणू लागलो.

मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शरीराबरोबरच मानसिक, बौद्धिक तयारी महत्वाची असते. हे लक्षात घेऊन आम्ही ‘जीवन शिक्षण माला’ आखली आणि अंमलात आणली. सुमारे वर्षभर हे काम चालले होते. विषयांची यादी काढली होती. हे विषय मुलांनीच सुचविले होते. रोज एक विषय घेऊन मुलांनी गटा-गटात बसून त्यावर चर्चा करायची आणि ती झाल्यावर एकत्रित चर्चा करून त्यातून सूत्र निश्चित करायचे, निर्णय घ्यायचे असे त्याचे स्वरूप होते. एक विषय शिव्यांचा होता. कारण अर्थात मुलांच्या तोंडात खूप शिव्या असत. आम्ही मुलांना शिव्यांची यादी करा असे सांगितले. मुलांनी बिचकत बिचकत काही साध्या शिव्यांची यादी केली.

त्यावर चर्चा करतांना अधिक भयंकर शिव्या समोर येत गेल्या, ज्या फळ्यावर लिहिल्या. त्याचे वर्गीकरण करतांना लक्षात आले कि, बहुतांश शिव्या आईच्या उल्लेखाने असतात. मग आई आपल्या सर्वांनाच प्रिय असताना आपण असे का करतो? अशा अंगाने चर्चा झाली. मुलांनी शिव्या कमी करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलात देखील आणला. हे एक उदाहरण आहे, असे बरेच बारीक बारीक काम काकाने इथे राहून केले. या जीवन शिक्षण मालेतून पुढे आलेल्या सूत्रातून पुढे प्रयोगभूमीचे घोषणापत्र तयार झाले. आनंदाच्या परिपाठाच्या स्वरुपात ते रोज सकाळी म्हटले जाते.

काकाचे इथले दिवस आनंददायी होते. हळूहळू तो स्वतःचा उल्लेख ‘विजय आनंदी-आनंद’ असा करू लागला. तो स्वस्थ बसणारा नव्हता. रोज नवनवीन कल्पना त्याच्या डोक्यात घोळत असायच्या. हे करूया, हे लिहूया असे सतत काही ना काही चालू असायचे. मोठ्या मुलांपैकी एकजण त्याचा लेखनिक असायचा. तो बोलायचा आणि मुल लिहायचे. अशा रीतीने ‘कार्यकर्त्यांचा सोबती’ ही एक छान पुस्तिका त्याने लिहिली. ज्यात कार्यकर्त्याला काम करतांना आवश्यक अशी बरीच माहिती, मार्गदर्शन आहे. आणखीही बरेच लेखन त्याने केले. त्याची स्मरणशक्ती विराट होती.

आधी केलेला अभ्यास, अनुभव आकडेवारीसह त्याच्या स्मरणात होते. जे शब्दबद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला. आपण हासील केलेले ज्ञान, अनुभव लोकांसाठी उपयोगी यावेत असा त्याचा सतत अट्टाहास असायचा. या अट्टाहासाने जणू त्याला झपाटले होते. ‘चिपळूण तालुक्यातील कातकरी समाजाच्या परिस्थितीचा पायाभूत अभ्यास’ आम्ही ११ तरुण मुलांच्या सहभागाने सहा महिने झटून केला आणि त्याचा अहवालही तयार केला. कातकरी समाजाबद्धल त्याला विलक्षण प्रेम होते. या समाजाची नैसर्गिकता त्याला आकर्षित करायची. तो स्वतःला गंमतीत ‘पांढरा कातकरी’ म्हणवून घ्यायचा. मुलांच्या घरी, झोपडीत जाऊन राहायचा. त्याचे दिवाळी, दसरा हे सण कातकरी वाडीतच असायचे. अर्थात् कातकरी मन इतके अथांग आहे कि, एवढ्या वर्षात मलाही त्याचा पुरेसा ठाव लागलेला नाही असेही तो म्हणत असे.

मी प्रयोगभूमीत मुक्कामास असलो कि दिवसभर आमचे काम चालायचे. रात्री निजेपर्यंत विविध विषयांवर गप्पा चालू असायच्या. त्याच्याकडे एक रेडिओ असायचा, जो फावल्या वेळेत कानाला लावून, बीबीसीच्या बातम्या ऐकत तो स्वतःला अपडेट करायचा. मी बाहेरुन आणलेल्या बातम्या त्याला आधीच माहित असायच्या. माझ्यासोबत, चंद्रकांत जाधव या संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत त्याने बाहेरील अनेक दौरे केले, अभ्यासवर्गाना हजेरी लावली. आमचा हात धरून चालताना कोणतीही तक्रार न करता अगदी आमच्या गतीने चालायचा. त्याच्या असंख्य आठवणी आज डोळ्यासमोर तरळत आहेत. जवळ जवळ दहा वर्षे आम्ही एकत्र होतो, एका कुटुंबासारखे. आमच्याकडून त्याला नजरेची, त्याच्याकडून आम्हाला ज्ञानाची, अनुभवांची अशी ही उर्जेची देवाणघेवाण होती. पुढे त्याला पार्किन्सनने वेढले आणि कुटुंबाकडे परत जावे लागले. अधून मधून त्याचा फोन येत असायचा. पुढे तोही बंद झाला. आयुष्यभर संघर्ष करीत तो जगला. तरीही ‘विजय: आनंदी-आनंद’ म्हणून त्याचे स्मरण मागे ठेवून गेला, माझ्यासारख्या हजारो साथींच्या मनात कायमचे घर करून.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading