November 7, 2024
lakhansingh-katre Long Poetry Book Itihas Adhalat Nahee
Home » गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”
मुक्त संवाद

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे समजण्यासाठी या दीर्घ कवितेवर परिसंवाद व्हायला हवेत. आणि भारतभर सर्वत्र नक्षलवादावर वांझोटी चर्चा होत असताना एका मराठी कवीने भोगलेला हा नक्षलवाद इतर भारतीय भाषांत पण पोचला पाहिजे.
दत्तप्रसाद दाभोळकर

दत्तप्रसाद दाभोळकर,
“या” हाॅटेल ग्रीन फिल्ड लेन, सदर बाजार, 
सातारा-415001 (चलभाष:- 9822503656)

काही कवी लक्षवेधी असतात, लक्षणीयही असतात. आपण नकळत त्यांच्या कवितेत आणि त्यामुळे त्यांच्या नावातही गुंततो. अर्थात ख-या कवीला नावाचे काही नसते. “लोक माझे नाव विसरतील, पण माझ्या ओळी विसरणार नाहीत” हा त्याचा सहजभाव असतो. पण त्याच्या नव्या ओळी ओळखायच्या तर तो जिवंत असताना त्याच्या नावाचा आधी आधार घ्यावा लागतो. पण “तो जिवंत असताना” या शब्दांचे कविला कधीच अप्रुप नसते. तो सदाकाळ असतो आणि नसतोही. “इदम् न मम” असे सहजप्रवृतीतून सांगणारा कवी या सर्वाच्या परे असतो. पण आपण मात्र त्या कवीत, त्याच्या कवितांच्या ओळीत अडकून पडलेलो असतो. त्याला शोधतही असतो. पण तो मात्र आपले नाव स्मृतीआड होणार याची काहीच पर्वा करत नसतो. त्याचे त्याला काही पडलेलेच नसते. आमच्या काळातील असा एक लक्षणीय कवी म्हणजे लखनसिंह कटरे.

कटरेंनी कथा आणि लेखही लिहिलेत. पण त्यांनी लिहिल्यात विपुल कविता आपण ज्यात अडकून पडतो अशा विपुल कविता. अनेक कविता संग्रह. “प्रमेय”, “जाणिवेतले कर्कदंश”, “शाश्वत मौनाचे स्वगत”, “आदिम प्रकाशचित्रे”, “शब्दार्थांचे आधार निष्फळ” हे स्वतंत्र कविता संग्रह. शिवाय “उन्मेष”, “वैनाकाठ”, कविता झाडीची”, आदि प्रातिनिधिक कविता संग्रह. यातला “शब्दार्थांचे आधार निष्फळ” हा शेवटचा कविता संग्रह, म्हणजे तो प्रसिद्ध होऊन 13 वर्षे उलटली होती. कारण तो कविता संग्रह प्रसिध्द झाला होता एप्रिल 2005 मध्ये.

कवी फारशा किंवा अजिबात कविता लिहित नव्हता. मग कविता संग्रह बाहेर येणे या दूरच्या गोष्टी. कवीचा यापूर्वी 2002 साली प्रसिद्ध झालेल्या कविता संग्रहाचे नाव होते “शाश्वत मौनाचे स्वगत”, म्हणजे कवी शाश्वत मौनात अडकला होता का? मला पाठविलेल्या एका पत्रात विजय तेंडुलकर म्हणाले होते “कोंबडी खुडुक होते तशी आपली लेखणी होते का?” त्यानंतर या वाक्यावर भंकस करताना आम्ही दोघे म्हणालो होतो “वेदनेचे मौन नेहमीच गर्भार असते. पण जातीवंत वेदना नेहमीच वांझोटी असते.” किंवा मधुकर केचे म्हणालेत तसे “जेंव्हा कळले संतांच्या / वेदनेचा वेद झाला / माझा जात्यातला जीव / पिठ होतांना हसला /” — हे पण खरे असते. असे काही लखनसिंह यांच्या बद्दल व्हावे असे वाटणारे आणि तसे काही होईल असा विश्वास बाळगणारे माझ्यासारखे अनेकजण होते. त्यालाही एक कारण होते. सर्व लेखन प्रकारातच नव्हे तर सर्व विचारधारातही सहजपणे असणारा हा माणूस तसा वेगळा होता. यांचे पाय केवळ जमीनीवर नाहीत तर मुळे मातीत कुठेतरी खोलवर रुतलीत, हे माहीत होते.

झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते एकदा स्वागताध्यक्ष होते आणि एकदा संमेलनाध्यक्ष होते. झाडीबोली आणि झाडीबोलीत गुंतलेली माणसे हा त्यांच्या जीवनाचा श्वास आहे हे सर्वदूर माहीत होते. तेरा वर्षानंतर “शाश्वत मौनाचे स्वगत” लिहिणा-या या कवीचे मौन संपले, किंवा तो आपल्या ‘स्वयंरचित’ किंवा ‘परिस्थितीरचित’ कोशातून बाहेर आला ! “इतिहास आढळत नाही” हा त्यांचा एकच 150 कडव्यांची दीर्घ कविता असलेला कविता संग्रह 17 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध झाला.

प्रत्येक कवीच्या प्रेमात पडलेला असा त्याचा एक खास वाचक वर्ग असतो. तो वर्ग कविता वाचताना अस्वस्थ, सुन्न होत होता. अस्वस्थ करणारे, गोंधळात टाकणारे, पुढे प्रकाशकिरण नसलेल्या बोगद्यातून किंवा पोकळीतून प्रवास, आपले गुरुत्वाकर्षण हरवून आपण हवेत कोलांट्या उड्या घेतोय असा भास. मज्जातंतूंचा भूगा पण दिसत नाहीच नाही…. कविता समजणे, समजावून घेणे हा एकाचवेळी आनंददायी आणि यातनादायी प्रकार असतो. कविता? खरी कविता कुणालाच कळत नाही. कवी सुद्धा त्याच्या कवितेचा अर्थ सांगू शकत नाही. कविता लिहितो त्यावेळी तो एका समाधी अवस्थेत असतो. तो स्वतः नसतोच. “इदम् न मम” म्हणून तो बाहेर पडलेला असतो. किंवा कविता हे कवीला पडलेले स्वप्न असते. आपल्याच स्वप्नाचा अर्थ आपण सांगू शकत नाही. आपले जवळचे मित्रही सांगू शकत नाहीत. असा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू शकतात मानसोपचार तज्ज्ञ. पण याबाबत दोन मानसोपचार तज्ज्ञांच्या मध्ये एकवाक्यता असण्याची शक्यता नसते.

अगदी नेमके हेच कवितेबद्दल आहे. मर्ढेकर आपल्या कोणत्याच कवितांचा अर्थ सांगू शकले नसते. हे केवळ एवढ्यावरच थांबत नाही. म.वा.धोंड, विजया राजाध्यक्ष, गोव्याचे नाईक त्यांच्या कवितांचे पूर्णपणे वेगळेच नव्हे तर पूर्णपणे विरोधी आकृतीबंध आणि आशयघनता सांगत उभे आहेत. त्यातही अधूनमधून विनोदी प्रकार सुद्धा घडतात. “आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले” या मर्ढेकरांच्या ओळीचे म.वा.धोंडांच्या पासून अनेक समीक्षकांनी परस्परविरोधी अनुमान दिलंय. मात्र या सर्वातील निरर्थकता दाखवताना एकजण म्हणाला होता

“वालांना” म्हणजे “वा.ल.”यांना. म्हणजे “आज येतील का मोड / माझ्या वालांना चांगले” म्हणजे आजतरी वा.ल.कुलकर्णी यातील नव्या वाटा नवे मोड समजावून घेतील का ?” नशीब, त्यावेळी स्मार्ट फोन नव्हते नाहीतर “मोड” शब्दाचा वेगळाच आणखी एक अर्थ लावला गेला असता ! ते असो. शेवटी कविता ही फक्त प्रत्येक रसिकासाठी असते. ती त्याची जहागीर असते. हे पण खरे नव्हे. प्रत्येक शब्दाबरोबर, प्रतिमेबरोबर प्रत्येक वाचक वेगवेगळ्या लहरींवर तडफडतो, तळमळतो किंवा पुलकित होतो. मात्र लखनसिंह कटरे यांच्या सारख्या काही कवींचे शब्द, प्रतिमा, ओळी ‘शोभादर्शका’सारख्या म्हणजे ‘कॅलिडिओस्कोप’ सारख्या असतात. शोभादर्शकात आपणाला एक अप्रतिम नक्षी दिसते. आपण तन्मय होऊन ती पहात असतो.

एक छोटासा धक्का लागतो. ती रचना, ती नक्षी पुन्हा न दिसण्यासाठी नाहीशी होते. पुन्हा नवी नक्षी मनमोहक, मनभेदक. पण एक छोटा धक्का. ती नक्षी कायमची नाहीशी. थोडावेळ आपण मग्न होतो. नंतर जाणवते आपण छीन्न भीन्न होतोय. आपण वैतागतो किंवा गुदमरतो. या शोभायंत्रात नक्की काय आहे? हा शोध तसा अशक्य. किमान अवघड. तेरा वर्षानंतर प्रसिद्ध झालेली कटरे यांची दीर्घ कविता. एकूण 150 कडवी 50 पानात सामावलेली. कविता संग्रहाचे रंगीबेरंगी मुखपृष्ठ विध्वंस आणि नवनिर्मिती यांच्या सीमारेषेवर तडफडणारे; कविता कोड्यात टाकतात.

आपण चकव्यात शिरतो. चक्रव्यूहात सापडतो. आपली घुसमट होते. कविता सोडवत नाही. आपण त्यात गुंतत जातो. पण कळत काहीच नाही. हा कसला खटाटोप. हा कसला जीवघेणा खेळ. हा उन सावल्यांचा, उन पावसाचा खेळ नाही. धुवांधार पाऊस. सावल्या गडद गडद होत जातात. उरतो तो सर्व सावल्यांना कवेत घेऊन उरलेला एक अति तीव्र काळा ठिपका. अंधार फोडून अधिक अंधार निर्माण करणारा ! या अंधारात प्रतिमांचा धुवांधार पाऊस. ‘अंधभक्त विभक्ती’, ‘अश्राप गंतव्याची समष्टी ‘, ‘पासंगाला कावड लाभते’, ‘घुबडाची ढोली मंत्रावते’, ‘तृष्णादग्ध मनातील स्वप्ने’, ‘प्रकाशपुंज मर्यादामुक्त’, ‘स्तब्ध झालेल्या मौनाच्या ठायीं’, ‘तरंग लांबीने युक्त पथ’, ‘तुरियावस्थेतील स्वप्नात ‘, ‘झोपलेला पाषाण तहहयात’, ‘झेलून पिकलेले विचार’, ‘नियतीच्या अतृप्त कवेत’, ‘संपृक्त झालेल्या आसवांना’, ‘निराकार अस्तित्वाच्या पोटी’, ‘मौनाचे तुटक भाषाभान’, ‘अनैतिहासिक कष्टपर्व’, …… वाचताना आपण अस्वस्थ होतो. सोडावेसे वाटते पण सोडवत नाही. आपण त्यात गुंतत जातो. पण ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा हा प्रकार नसतो.आनंद, गोंधळ, चीड, अस्वस्थता, अंधूक प्रकाशकिरण, गडद अंधार जाणवते. प्रकाश किरणांची एक बाजू कापून, नाहीशी करून, कायमची संपवून प्रकाशकिरणांचे केलेले ध्रुवीकरण (Polarization of Light) जाणवते. हे तसेही नाही.

ध्रुवीकरण केलेले प्रकाशकिरण पण आधार देतात खरा, खोटा, आवडणारा, न आवडणारा, असलेला आणि नसलेलाही प्रकाश दाखवतात. पण हे प्रकाशाचे ध्रुवीकरण नाही. संवादी समलहरीत, समाघात झाल्यावर….. interfere of coherent light …. एकापाठोपाठ एक निर्माण होणारे, एकमेकांत मिसळणारे आणि नाहीसे होणारे. प्रकाश अंधार यांचे ठिपके गुंगवून टाकणारे ….. पण भोवळ आणणारे.. जाणवते. आपणच नाही तर कवीही भांबावलाय. त्याने कवितेला, कविता संग्रहाला, दीर्घ कवितेला या त्याने निर्माण केलेल्या कशालातरी, म्हणजे या दीर्घ कवितेला, पूर्वपक्ष : काही टिपा व काही उद्घृते दिलीत.

प्रस्तावना पुस्तकाच्या सुरुवातीला असते, पण कुणी प्रथम प्रस्तावना लिहून मग पुस्तक लिहित नाही. ती पुस्तक तयार झाल्यावर, पुस्तकाची किंवा त्याच्या निर्मात्याची गरज म्हणून निर्माण होते. या संग्रहाला मात्र प्रस्तावना नाही; म्हणजे हा पूर्वपक्ष आहे पण हा दीर्घ कविता लिहिल्यावर लिहिलाय. ‘सखाराम बाईंडर’ लिहिल्यावर तेंडुलकरांनी लिहिले होते ‘माझ्या मनावरचा ताण सुटत होता. ताणलेली स्प्रिंग ताणातून मुक्त होत होती. हे लिहिल्याशिवाय माझा ताण संपणार नव्हता. मला मुक्ती मिळणार नव्हती.’ या पूर्वरंगात कवी लखनसिंह स्वतःला असाच आधार शोधतोय. स्वतःची आणि इतरांची वाक्ये त्याने काय, कसे, कशासाठी आपण या भिंगरीत अडकलो, काय शिकलो, त्यातून कसे सुटलो हे सांगण्यासाठी वापरलीत.

ते आधार असे आहेत.
1) The task of the writer is to deepen the mystery rather than to resolve it.
2) तर्क आणि बुद्धी या संकल्पना जेंव्हा पूर्णतः तर्कशून्यच नव्हे तर तर्कदुष्ट असल्याची प्रचिती जीवन जगताना कधीनाकधी येतेच, तेव्हा तो ‘स्वानुभव’ (होय स्वानुभवच! एकाच चौकटीतील अनुभव व्यक्तीपरत्वे भिन्नत्वाने अभिव्यक्त होतात, म्हणून अशा अनुभवांना मी ‘स्वानुभव’ असेच संबोधतो.) अभिव्यक्त ‘करण्या’साठी प्रचलित साहित्यिक प्रक्रिया/व्यवस्था/संकल्पना सुद्धा अपु-याच नव्हे तर अर्थहीन/अर्थदुष्ट ठरण्याची अटळता भोगावी लागते.
3) काव्य/कविता ही संकल्पना सेंद्रिय व्यवस्थेचा भाग असल्याने, काव्य/कवितेचा विचार हा एकात्म विचार प्रणालीचा भाग ठरतो व पर्यायाने एकदिक् विचार, एकरेखीय विचार ही विखंडित विचारप्रणाली (देकार्तीय विचारप्रणाली) काव्य/कवितेच्या आकलन व रसास्वादाकरिता अपूरीच नव्हे तर मार्गातील अडसर ठरू शकते/ठरते.
4) माझ्या जाणिवेच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत जाव्यात, अतिशय विविधांगांनी समृद्ध असे जे जीवन माझ्यासमोर आहे, त्याचे स्वरूप मला जास्तीत जास्त उलगडत जावे, म्हणजेच मी “मी” चे स्वरूप उलगडत जावे.
5) सगळ्याच चौकटी मौलिकता (Originality) आणि सृजनशीलता यांना मारक असतात. प्रतिभावंतांची सुप्त शक्ती सहसा समकालीनांना समजत नाही. मग त्यात सगळेच आले.
6) शंभरातील एकाच्या विचारांची दिशा बाकीच्या नव्याण्णवांना वेगळीच वाटते……हे logically योग्य नाही तरी सतत होत राहते.
7) Writing is an act of violence against myself.  या शेवटच्या उद्घृतातून लख्ख प्रकाश दिसतो. 150 कडवी उलगडत जातात. गोंदिया-गडचिरोली परिसरातील हा कवी. तेथील खेड्यात राहणारा. तिथल्या मातीत मुळे रुतलेला. झाडीबोलीचा अभिमान बाळगणारा. हा नक्षलवादाच्या अगदी छायेत होता. दहा-बारा वर्षे सुन्न होऊन स्तब्ध होता. शेवटचा कविता संग्रह एप्रिल 2005 चा आणि त्या संग्रहाचे नाव सुद्धा “शब्दार्थांचे आधार निष्फळ”. म्हणजे कवीचा शब्दांवरचा विश्वास उडावा असा भवताल.

त्यानंतर स्वतःलाच आधार शोधत बारा वर्षांनी 26 मार्च 2016 ते 24 एप्रिल 2016 या एका महिन्यात बोरकन्हार या एका खेड्यात बसून, भवतालाची सुन्न, खिन्न, भिन्न मुर्ती फोडून नवी मुर्ती घडवण्याचा प्रयत्न समजावून घेत पुन्हा पुन्हा काळविवरात नाहीसा होण्यासाठी त्यात झेप घेणा-या आकाशगंगा समजावून घेणेसाठीच त्याचा हा प्रपंच, म्हणजेच ही दीर्घ कविता ! “इतिहास आढळत नाही” मला आठवतंय, नक्षलवादाच्या सावलीत स्वतःचे काय होते हे मी पण अनुभवलंय. मला आठवतंय 1960 च्या दशकात नक्षलबाडीत नक्षलवाद जन्म घेत होता. मी त्यावेळी “माणूस” साप्ताहिकासाठी शोधपत्रकारिता करायचो. वेगवेगळ्या ठिकाणच्या ओळखी काढून, मी “खब-या” नाही याची खात्री करून दिल्यावर, चक्राकार फिरवून, डोळे बांधून मला कनू सन्यालच्या गुहेत नेले होते. फक्त एक दिवस मी तेथे होतो. पण तो सुन्न, बधीर करणारा अनुभव होता. मला मनातून मोडून टाकणारा. समोर अफाट कर्तृत्वाची विलक्षण प्रतिभावान माणसे होती. पतंगाने दिव्यावर झेप घेण्यासाठी आतूर आणि अस्वस्थ असावे अशा मनोवृत्तीने भारावलेली.

मात्र त्यांच्या वागण्यात आणि मांडणीत इतिहास कुठेच आढळत नव्हता ! हा वेडेपणा आहे हे जाणवत होते. पण त्यांना ते सांगताना आपण त्यांच्यासमोर खुजे आहोत, ‘लिलिपुटियन्स’ असेही जाणवत होते. त्यानंतर काही वर्षे माझी लेखणी मौनात बंदिस्त होती. जवळजवळ बारा वर्षांनी भारतातले इतर पर्यायी प्रकल्प पहात मी हिंडलो, नानाजी देशमुखांचा ‘गोंडा प्रकल्प’ आणि शंभर ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा केमुर पर्वताच्या दक्षिणेकडील गोविंदपूर आश्रम येथे काही काळ राहिलो. स्वतःलाच थोडा आधार मिळावा म्हणून या प्रकल्पांच्यावर “प्रकाशवाटा” हे पुस्तक लिहिले. राजहंस प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले. त्यावर्षीचा शासनाचा सर्वोत्तम वैचारिक ग्रंथाचा पुरस्कार त्याला मिळाला.

पण मी ते पुस्तक लिहिले होते स्वतःच्या मनाला नक्षलवादाच्या काळ्या जादूतून मुक्त करण्यासाठी ! लखनसिंह कटरे सुद्धा तेच पण थोड्या वेगळ्या प्रकारे करताहेत. नक्षलवादाच्या सावलीत राहून सर्जनशील, सृजनशील कवीने नक्षलवादाचे आघात टिपण्याचा हा विलक्षण जीवघेणा प्रवास आहे. एकूण 150 कडवी असलेल्या या दीर्घ कवितेत एकूण 24 कडवी ‘इतिहास आढळत नाही’ अशी आहेत, पूर्णपणे इकडेतिकडे पसरलेली. पण या प्रत्येक कडव्यात आपण थबकतो. पायाला ठेच लागावी असे काही आढळून जाते त्यात. त्यापूर्वी येणा-या कडव्या

“निष्कारण झडलेले पान
इतिहासाला शोधत होते ”
अशा ओळी आपणासमोर येतात. मात्र कवी स्वतःलाच सावरताना सांगतो
“अनंताच्या गर्भातील आग ;
त्यालासुद्धा जुमानत नाही
क्षणभंगूर अनंत क्षणी
घडला तो इतिहास नाही.”
नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे समजण्यासाठी या दीर्घ कवितेवर परिसंवाद व्हायला हवेत. आणि भारतभर सर्वत्र नक्षलवादावर वांझोटी चर्चा होत असताना एका मराठी कवीने भोगलेला हा नक्षलवाद इतर भारतीय भाषांत पण पोचला पाहिजे.

पुस्तकाचे नावः इतिहास आढळत नाही (दीर्घ कविता)
कवी – लखनसिंह कटरे
प्रकाशक :- मध्यमा प्रकाशन, सुभाष नगर, नागपूर 
पृष्ठे – 60, किंमत – रुपये 75

बेमालूम दिशाभूल होते 
विचार तरंगतात तेव्हा, 
प्रश्नांचा दुष्काळ पसरतो 
शहाणीव गमावते जेव्हा ।। ४८।।

विरोध उठसूठ झेलता 
सक्तीचाही प्रादुर्भाव होतो,
आधारवड कोसळतात
आणि जळीस्थळी स्फोट होतो ॥४९॥

पावव्याला बाळवी लागता 
ज्ञात मार्गही भुलले काही, 
निर्णयाच्या 'खगोला'त मात्र 
इतिहास आढळत नाही ||५०॥ 

• लखनसिंह कटरे

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading