September 8, 2024
vinaya-nimbalkar-work-for children article by Shailaja Molak
Home » उपेक्षित, वंचित, गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी विनया
मुक्त संवाद

उपेक्षित, वंचित, गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी विनया

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज विनया निंबाळकर यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

बार्शी तालुक्यांतील कोरफळे या छोट्याश्या गावात स्थलांतरित, भटक्या जमातीतील कागद – काच – पत्रा गोळा करणारी, नुसती वनवन भटकणारी मुले अशांसाठी काहीतरी करावं या विचारांनी विनया व महेश या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या जोडप्याने २० सप्टेंबर २००७ रोजी ‘भटक्यांची शाळा’ सुरू केली. ‘काही वर्षे अशी शाळा चालवल्यावर १५ जून २०१५ ला २२ मुलांसह निवासी शाळा सुरू केली. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनीही नोकरीचा राजीनामा दिला. जवळचं सारं विकून कोरफळे येथे माळरानावरील ३ एकर जागा खरेदी केली. शिक्षक सोसायटीचे कर्ज केले. नोकरी गेली. जवळचे दुरावले. आणि आम्ही पुन्हा शून्य झालो.’ असे विनया सांगत होती.

चांगल्या कामाला मदत मिळते पण त्यासाठी वाट पहावी लागते किंवा संघर्ष करावा लागतो. अशातच आनंदवनाचे कौस्तुभ आमटे यांनी स्नेहग्राम उभारण्यासाठी मदतीचा शब्द दिला व विनया पतीसह नव्या उमेदीने कामाला लागली. स्वतःच्या ३ एकर जागेत स्नेहग्रामची निर्मिती सुरु झाली. कार्यकर्ते मदतीला नसल्याने दोघांनी कामाची विभागणी केली. ४० मुलांचा स्वयंपाक, शिकवणे, काळजी घेणे ही कामे विनया करत होती तर स्नेहग्रामसाठी मदत मिळवणे, कार्यालयीन काम महेश करत असे. आता हे सारं काम अजित फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे.

मुलं ही भारताच भविष्य आहे हे लक्षात घेऊन सर्वांगीण विकासावर भर हा विचार ठेवून लोकशाही शाळा हा उपक्रम येथे विनयाने सुरू केला. मुलांना शालेय अभ्यासाबरोबरच व्यावहारिक शिक्षण देणे गरजेचे आहे या भावनेतून मुलांना प्रत्येक गोष्टींची जाण व भान येण्यासाठी त्यांचे महिन्याचे अंदाजपत्रक, बालसभा, निधी कमिटी, वाचनालय कमिटी, कचरामुक्त, प्लॅस्टिकमुक्त, तंबाखूमुक्त, शिक्षामुक्त शाळा, स्वतःचा अभ्यासक्रम, परसबाग, सेंद्रियखत प्रकल्प, बचतबॅंक, कमवा-शिका, क्षेत्रभेटी, कुकिंग टूगेदर, एक तास वाचनाचा, शिवणकाम इ. माध्यमातून मुलं सक्षम करायचे काम विनयाताई करत आहेत. पाठ्यपुस्तकाबाहेरील शाळा हा धाडसी निर्णय उभयतांनी घेतला. ‘अवांतर वाचन’ यावर विनयाताई भर देतात.

आम्ही आमच्यासाठी, स्नेहग्राम पंचायत, निवडणुकीचे धडे, स्नेहग्रामचे बजेट, मुलांची अभ्यासातील प्रगती इ. सारं प्रशिक्षण मुलांना दिले जाते. यातूनच मुलं घडण्याची प्रक्रिया होणार आहे यावर विनयाचा विश्वास आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्नेहग्राम उभे केले आहे पण ते उत्तम पध्दतीने चालवण्याची धडपड विनया करत आहे.

वास्तविक विनयाच्या माहेरची परिस्थिती चांगली होती पण वडिलांच्या व्यवसायातील अपयशामुळे व काही चुकीच्या निर्णयामुळे तिच्या दोन बहिणी व आई असे सारे रस्त्यावर आले. आजोबा गेले आणि त्यांनी जेवढे कमावले ते त्यांच्या मुलांनी घालवले. राहाते घरसुध्दा वडीलांनी विकले तेव्हा तो विनयाच्या आईसाठी मोठा धक्का होता पण तिने स्वतः ला सावरले आणि शिवणकाम स्वतः शिकून मुलींना शिक्षण दिले. तिच्या आईने जिद्द ठेवली होती की जे माझ्या वाट्याला आले आहे ते माझ्या मुलींच्या वाट्याला येऊ देणार नाही त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सरकारी नोकरी असणार्‍या मुलाशीच लग्न लावून देणार. उद्योग करणारा जावई नको असे ती सांगत होती कारण तिच्या वाट्याला ते आले होते.

कालांतराने तिचे वडील १० वर्ष पॅरालाईजच्या ॲटॅकमुळे बेडवर होते. त्यातच ते गेले. विनयाच्या दोघी बहिणीही शिक्षिका आहेत. आणि विनया व महेशनेही सरकारी नोकरी सोडून स्नेहग्राम सुरु करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा हा धक्का आईला सहन झाला नाही. ती अनेक दिवस विनयाशी बोलत नव्हती पण आज दोघांची धडपड व मिळणारे यश पाहून ती आता विनयाजवळ तिच्या दोन मुलांना सांभाळण्यासाठी आनंदाने रहाते. विनयाच्या धावपळीत ती तिचे घर सांभाळते. आता आईला विनयाचा अभिमान वाटतो.

महात्मा फुले व सावित्रीबाईंचा शैक्षणिक वारसा जपताना, वाढवताना विनया व महेशनेही घर सोडले. नोकरी सोडली. आपली सारी पुंजी स्नेहग्रामला लावली. उपेक्षित, वंचित, गरजू, चुकीच्या मार्गाने गेलेल्या मुलांना एकत्र करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विनया आज धडपडते आहे. अतिशय कमी वयात तिने घेतलेला हा धाडसी निर्णय कौतुकास्पद आहे.

गेल्या वर्षी दुसरा निवासी प्रकल्प सृजनालय हा तळेगाव दाभाडे येथे सुरू केला आहे. दोन्ही ठिकाणी निवासी ४० मुले आहेत. आणि इतर ठिकाणी जाऊन १८० मुलांना अशा एकूण २२० मुलांना या संस्थेमार्फत शिकवले जाते. याचे पूर्ण नियोजन विनया करते. अगदी अल्पावधीत स्नेहग्राम या संस्थेला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोलापूर, झी २४ तास नवोन्मेष सन्मान पुरस्कार मुंबई, कन्यारत्न पुरस्कार सोलापूर, वसंतदादा काळे समाजभूषण पुरस्कार पंढरपूर, राज्यस्तरीय नवशक्ती सन्मान अहमदनगर, साने गुरूजी समाजशिक्षक पुरस्कार पुणे असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा स्नेहग्रामची व सृजनालयची संचालक विनया निंबाळकर या कर्तृत्ववान जिजाऊ- सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Saloni Arts : असे रेखाटा खरेखूरे ओठ…

नारळ अन् सुपारी उत्पादन तंत्रज्ञान…

कृष्णाकाठची कविता घेऊन कवी सुरेश मोहिते निघाले दिल्लीला….

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading