July 19, 2024
Gangalwadi Gavali bandhu from Chandrapur District article by Bandopant Bodekar
Home » चंद्रपूर जिल्ह्यातील गवळी बंधुची – गांगलवाडी
मुक्त संवाद

चंद्रपूर जिल्ह्यातील गवळी बंधुची – गांगलवाडी

गवळी बंधुची – गांगलवाडी

“तिच्या शेणाने पिके शेती !
शेती देई सुख , संपत्ती!
म्हणोनीच शेणामाजी लक्ष्मीची वसती ! वर्णिली असे !! “
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधारणेचा आग्रही पुरस्कार केलेला आहे. ज्यांचे घरी शेती आहे त्यांना गोसेवेचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे. आपल्या कृषी प्रधान देशातील शेतीसाठी उत्तम गोवंश टिकवला गेला पाहिजे. सर्वच काही यंत्रांनीच शेती संपन्न होणार नाही, हेही ध्यानात घेतले पाहिजे.

✍️…. बंडोपंत बोढेकर गडचिरोली
९९७५३२१६८२

चंद्रपूर जिल्ह्यात गांगलवाडी नावाची दोन गावे आहे. त्या पैकी ब्रम्हपुरी जवळचे मोठे गाव बरेचसे प्रसिद्ध आहे. दुसरे छोटेसे गांगलवाडी (डोंगरगाव) हे गाव मुल तालुक्यात आहे. खूप दिवसांपासून या गावाचे नांव मी ऐकून होतो. माझे सन्मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ चांभारे यांचे ते जन्म गाव. त्यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी तेथे गेलो असता त्या भागात भ्रमंती करण्याचा योग आला. एखाद्या गावाचे नाव ऐकताच किंवा त्या गावांविषयी जुजबी माहिती मिळताच माझ्या डोळ्यांसमोर जे काल्पनिक चित्र उभे राहते, त्या चित्रांच्या अनुरूपच मला तो परिसर भासला जणू.

मुल पासून केवळ १४ किमी अंतरावर असलेले हे गाव सिंदेवाही मार्गावरील चिखली गावाच्या जरा पुढे उजव्या हाताला वसलेले आहे. तहसिल मार्ग ते गावापर्यंत असलेल्या रस्त्यास सहा ठिकाणी सुंदर नागमोडी वळणे आलेली आहेत. अशा वळण मार्गावरून जात असताना सभोवतालची हिरवीगार झाडं पाहत रंगून जाणाऱ्या लहान मुलांप्रमाणे माझी काही वेळापूरती अवस्था झालेली होती.

गावापर्यंत सिमेंट रोड आणि रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लोकांना आरामदायी बसण्यासाठी सिमेंटी आसने पाहून जरा बरे वाटले. पायदळ चालतांना थकवा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली ही सोय निश्चितच कौतुकास्पद आहे. गावसभोवताल सर्वदूर धानशेती पसरलेली. दंडावर आंबा, चिंच आणि मोहाची झाडे जागोजागी दिसून आली. तर गावालगतच्या पाळीवर २०० वर्ष वय असलेला ज्येष्ठ वटवृक्ष उभा जणू गावाचा इतिहासाच सांगतो आहे. गावात आदिवासी, माना, मराळ, गवळी, बौद्ध, मुस्लिम, ढीवर या समाजाचे लोक वास्तव्य करतात. सुमारे ८०० लोक वस्तीच्या या गावात बहुसंख्येने असलेल्या गवळी समाजाचे ८७ घरे आहेत. गांगल वाडी ते चिखली या दोन्ही गावाच्या मध्यभागी प्रसिद्ध ‘भसबोडन’ तलाव आहे. झाडीबोलीत भस म्हणजे म्हैस आणि बोडन म्हणजे चिखल. या तलावात उन्हाळ्याच्या उष्ण घातीत म्हशींना जरा शीतलता मिळते.

सभोवतालच्या परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करणारे चिखली, डोंगरगाव, बेलगाटा यांसारखे अनेक गावे असूनही गांगलवाडी गाव श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या आदर्शगाव नवनिर्माण कार्यापासून कशी काय दूर राहिले, हे मात्र मला कळू शकले नाही. गावात सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून दोन भजनी मंडळे अस्तित्वात आहेत.

पुरुष भजनी मंडळाचे नाव श्रीकृष्ण भजन मंडळ तर महिलांच्या भजनी मंडळाचे नाव राधाकृष्ण महिला भजन मंडळ असे आहे. त्यांचे संयोजकपद सौ. केवे यांचेकडे आहे. मुळात गवळी समाजाची असलेली ही वस्ती गवळ्यांचे श्रध्दास्थान असलेले भगवान श्रीकृष्णांची आराधना करतात. गोकुळ अष्टमीचा मोठा उत्सव येथे दरवर्षी होतो. अनेक धार्मिक कार्यक्रमांना भगवान श्रीकृष्णांची दिलेली नांवे पाहता गवळी बंधुच्या या गावास “गांगल वाडी” हे नाव पडले असावे, असे वाटते.

गांगल वाडी प्रमाणेच गवळी समाज चंद्रपूर जिल्ह्यांतील सामदा (ता. सिंदेवाही ) आणि उसरपार चक (ता . सावली ) या दोन्ही गावात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. झाडीपट्टीतला तत्कालीन घनदाट अरण्याचा हा भाग होता. याच प्रदेशात गाईच्या संगोपनासाठी योग्य प्रदेश लक्षात घेऊन गवळी समाज या तिन्ही ठिकाणी वास्तव्यास राहिला असावा. गाईचे संगोपन करणे, दुध दह्याचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणे हे ह्या समाजाचा कार्यभाग होता. मात्र कालांतराने गाईंची संख्या घटताच गवळी समाजानी शेती व्यवसायाची कास धरली. एकेकाळी सिताराम पाटील चांभारे आणि त्यांचे बंधू आत्माराम पाटील चांभारे हे या भागातील सुप्रसिद्ध जमीनदार होते. गांगल वाडी, चिखली, डोंगरगाव इत्यादी गावाची जमीनदारी त्यांचे कडे होती. दानवृत्तीच्या सिताराम पाटलांनी अनेकांना त्या काळात गरीबांना उपजिवीकेसाठी जमीनी दान दिल्यात . सन १९५६ च्या सुमारास सुरू झालेल्या गट ग्रामपंचायतीत सिताराम पाटलांचे सुपुत्र बळीराम पाटील चांभारे यांनी पहिले सरपंच म्हणून ‌ सेवा दिली तर पहिले पोलिस पाटील म्हणून शिवराम सिताराम चांभारे यांनीही उत्तम रित्या गावाचा कारभार पाहिला. झाडीपट्टी म्हटली की, मंडई -दंडार- नाटके आलीच. ही येथील भूमीची सांस्कृतिक ओळखच जणू. दिवाळी सणाच्या निमित्ताने दंडार मात्र दरवर्षी येथे होत असते. गवळी समाजातील कलाप्रेमी लोकांनीही झाडी नाटकात भूमिका करणे , मंडई च्या निमित्ताने नाटकांचे प्रयोग घडवून आणणे , याकरिता विशेष योगदान दिलेले आहे.

गवळी बंधुनी शेती व्यवसायासोबत आपल्या पारंपरिक गोवंश सुधारणेकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, असे मला वाटते. कारण गाय ही आजच्या काळातील जीवंत आरोग्यधाम आहे. कामधेनू आहे.
“तिच्या शेणाने पिके शेती !
शेती देई सुख , संपत्ती!
म्हणोनीच शेणामाजी लक्ष्मीची वसती ! वर्णिली असे !! “
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधारणेचा आग्रही पुरस्कार केलेला आहे. ज्यांचे घरी शेती आहे त्यांना गोसेवेचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे. आपल्या कृषी प्रधान देशातील शेतीसाठी उत्तम गोवंश टिकवला गेला पाहिजे. सर्वच काही यंत्रांनीच शेती संपन्न होणार नाही, हेही ध्यानात घेतले पाहिजे.
गांगल वाडी येथे केवळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय सोडता हायस्कूल, बॅंक, आरोग्य केंद्र, पोस्ट आफिस या प्रकारची सुविधा अजून पर्यंत तरी झालेली नाही, त्या दृष्टीनेही समाजातील जागृत मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील इतर जाती धर्माच्या लोकांसोबत गावात प्रसन्न चित्ताने राहणारा, समन्वय- सहयोग वृत्तीने वाटचाल करणारा शांतता प्रिय समाज म्हणून गवळी समाजाची जुनी ओळख आहे. हेच या समाजबांधवांचे मानवतावादी दर्शन कायम टिकून राहिले पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोन्याच्या तस्करी करणारी साखळी डीआरआयकडून उध्वस्त

इस्रायलकडून मराठवाड्याला जल व्यवस्थापन सहकार्य

कागदी फुल…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading