स्त्रियांना एक सहावा सेन्स असतो असं म्हणतात, त्याद्वारे तिला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीची नुसती नजरसुद्धा तिचा हेतू सांगून जाते. त्यामुळे आपोआपच स्त्रीला त्याची जाणीव होते, हे काहीतरी वावगं आहे.
यशवंती शिंदे, कोल्हापूर
आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. हाती मोबाइल आल्यापासून सोशल मीडियावर माणसं कशी वागतात, याचे आलेले अनुभव मैत्रिणी शेअर करत होत्या.
सुनीता म्हणाली, “मी एका संघटनेसाठी काम करते. अनेक तरुण, ज्येष्ठ, समवयस्क आणि समविचारी लोक आमच्या संघटनेत काम करतात. असंच एकदा मी एका कार्यक्रमानंतर घरी आले. जेवणखाणं आटोपल्यानंतर फोन हाती घेतला. एरव्ही आपल्याबरोबर काम करताना आदरयुक्त वागणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याने मेसेज केला, “मी आताच घरी पोहोचलो. तुम्ही पोचलात का?” मी हो म्हटलं. त्यानंतर बोलता बोलता ‘अहो जाहो’ करणारा आमचा सहकारी म्हणाला, “जेवलीस का?” मला वाटले, चुकून एकेरी टाइप झाले असेल. पण पुढचा प्रश्न आला, “उद्या काय करतेस? भेटायचे का?”
हे वाचून मात्र मी चक्रावले आणि मनातल्या मनात चिडलेही. हे चुकून झाले नाही असे समजायला मला वेळ लागला नाही. मी उलट त्याला विचारले, “अहो जाहो बोलता बोलता अचानक एकेरी कसे काय? चुकून झाले असेल तर ठीक; पण हे चुकून नसेल तर मात्र मला खपणार नाही. आपण समविचारी आहोत, समान ध्येयाने संघटनेसाठी काम करतो, एकत्र येतो. या एकाच भावनेने मी आपला आदर करते. ही संघटना, तिचे विचार हाच आपला दुवा आहे. या पलीकडे आपण सुजाण आहात.”
हे वाचून तो वरमला आणि म्हणाला, “अहो मॅडम, गैरसमज नका करून घेऊ. खरंच टाइपिंग मिस्टेक झाली. माझा तसा काही विचार नव्हता.”
तिचं बोलणं ऐकत असणारी शीला म्हणाली, अगं माझाही अनुभव बऱ्यापैकी असाच आहे. “साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी माझं बीएडचं शिक्षण पूर्ण झालं. त्या वेळी कॉलेजला कडक शिस्त असायची. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भावी शिक्षक म्हणून एकमेकांना अत्यंत आदरपूर्वक ‘सर/मॅडम’ म्हणावे अशी शिस्त होती. त्यामुळे आम्ही कधी कुणाचा पाठीमागेही एकेरी उल्लेख करत नसायचो. गेल्या पाच-सात वर्षांत सगळ्यांकडे मोबाइल आले. एकमेकांचे संपर्क नंबर अॅड करत कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप बनला.
मला आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला. सगळ्यांनी ग्रुपवर अभिनंदन केले. काहींनी व्यक्तिगत शुभेच्छा दिल्या. तशातच एकाने मेसेज पाठविला, “तू कॉलेजलाही हुशारच होतीस. तुला हा पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता; पण उशिरा का होईना मिळाला. तुझं खूप खूप अभिनंदन!”
शीला सांगत होती, हे ऐकताना जरा विचित्रच वाटलं. कारण आम्ही कधीच पूर्वीही अरेतुरे केलं नव्हतं, आताही करत नाही आणि असा मेसेज? मी त्याला म्हटलं, “सर, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी खूप आभारी आहे; परंतु मी कॉलेजला असतानाही आपल्याला कधी एकेरी बोलले नाही. अशा पद्धतीने एकेरी बोलण्यापूर्वी आपण माझी परवानगी घ्यायला हवी होती. मला असे ऐकण्याची सवय नाही. त्यामुळे कृपया मला असे एकेरी बोलत जाऊ नका. एक शिक्षक म्हणून मला आपणाबद्दल नितांत आदर आहे. आपल्या पेशाचा आपण आदर ठेवू या.”
यावर ‘ठीक आहे’ असे म्हणून त्याने त्यानंतर कधीही संपर्क करण्याचे टाळले. यावरून मला अशांच्या हेतूबद्दलच शंका वाटते.
गृहिणी असलेली मेघना म्हणाली, “अगं, तुम्ही काही ना काही कामाने बाहेर पडता, कामे करता. त्या वेळी परक्या माणसांकडून असे अनुभव येणे मी समजू शकते. परंतु आपल्या सासरी राहात असताना सासरच्या नातेवाइकांपैकीच कुणाकडून असे अनुभव आले तर काय करायचे?”
“माझ्या नवऱ्याच्या नात्यातली एक व्यक्ती. आम्ही सगळे समवयस्क. बऱ्याचदा “साहेबांना फोन लागत नाही, म्हणून तुम्हाला फोन केला. साहेब आहेत का?” असे म्हणत फोन करायचा. मला वाटायचे, खरंच फोन लागत नसेल, म्हणून फोन येतोय. असंच एकदा नेहमीप्रमाणे ‘साहेबांचा फोन लागत नाही, साहेबांना फोन द्या’ म्हणत फोन आला. मी म्हटलं, “साहेब घरी नाहीत, साहेबांना फोन करा.” यावर बोलत बोलत म्हणाला, “अगं, तुला फोन लागतो अन् त्यांना लागत नाही. असंच होतं बघ नेहमी.”
त्याचे हे एकेरी बोलणे ऐकून कसेसेच वाटले. म्हणून मी फोन बंद केला. पुन्हा फोन आला, “अगं, फोन कसा काय बंद झाला? तुझ्या फोनची बॅटरी संपली का?”
मग मात्र माझा संयम सुटला. मी सुनावले, “माझ्या फोनची बॅटरी संपली नाही. मी फोन बंद केला! माझ्या नवऱ्याचे नातेवाईक आहात, म्हणून मी तुमचा आदर करते. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मला एकेरी बोलावे. मला असले खपणार नाही. इथून पुढे मला कसल्याही कारणासाठी फोन करत जाऊ नका.” असं म्हणून मी त्याचा नंबरच ब्लॉक करून टाकला. अशा मनस्ताप देणाऱ्या लोकांना लिस्टमध्ये ठेवून तरी काय उपयोग?
नीता सांगू लागली, “अगं, तुम्ही नुसतं रात्रीच्या वेळी फेसबुक, इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया वापरत असाल, विशेषतः रात्री अकरा-बाराच्या दरम्यान; तरीही लोक संशय घेतात. काही जण इनबॉक्समध्ये विचारतात, ‘तुम्ही इतक्या रात्री कशा काय ऑनलाइन ?’ पण असे लोक आपणही रात्री सोशल मीडियावर ‘ऑनलाइन’च आहोत हे विसरतात. रात्रीच्या वेळी सोशल मीडिया वापरण्याची मक्तेदारी फक्त पुरुषांनाच कुणी दिली? रात्री रस्त्यावरून चालताना स्त्रियांना भीती वाटते तसं आता सोशल मीडिया वापरतानाही आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे, या दहशतीखाली जगावे का?” नीता उद्वेगाने बोलत होती.
या स्त्रियांचे अनुभव प्रातिनिधिक म्हणता येतील असे आहेत. काही जणींना वाटेल की, हा आपलाच अनुभव आहे, इतकी मोबाइलवरील सोशल मीडिया वापरताना स्त्रियांच्या अनुभवांची सार्वत्रिकता झाली आहे.
स्त्रीला अशा प्रकारे गृहीत धरून आपल्याला हवा तसा अर्थ काढून वर्तन करणारे लोक काय स्वतःला काय समजतात आणि स्त्रीला काय समजतात देव जाणे ! स्त्री ‘अशा’ गोष्टी घरातल्या कुणालाही सांगणार नाही, हे या मानसिकतेच्या लोकांना ठाऊक असते. आपला पारंपरिक पुरुषी (आणि काही प्रमाणात स्त्रियांचाही) दृष्टिकोन ‘स्त्रीने सोशल मीडियाचा/मोबाइलचा वापरच कशाला करावा?’ असं म्हणत स्त्रीलाच दोषी ठरवतो हे आपण अनेक घटनांवरून पाहात असतो. त्यामुळे याचा फायदा अशा मनोवृत्तीचे पुरुष घेतात.
अशा मनोवृत्ती ओळखून जागीच चाप बसवायला स्त्रीने शिकले पाहिजे. मित्र आहे, नातेवाईक आहे, त्याला काय वाटेल, घरचे काय म्हणतील अशा प्रश्नांना फेकून देऊन ज्यांनी आपल्या मनाविरुद्ध बोललेले आवडत नाही, त्यांना त्याची स्पष्टपणे जाणीव करून द्यायला शिकले पाहिजे. नाहीतर एकदा स्त्री गप्प बसली की, पुढे काहीही बोलायला, सांगायला, विचारायला अशा मनोवृत्ती मागेपुढे पाहात नाहीत.
स्त्रियांना एक सहावा सेन्स असतो असं म्हणतात, त्याद्वारे तिला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीची नुसती नजरसुद्धा तिचा हेतू सांगून जाते. त्यामुळे आपोआपच स्त्रीला त्याची जाणीव होते, हे काहीतरी वावगं आहे. एखादी स्त्री पुरुषाशी मनमोकळेपणाने बोलत असेल तर त्या पुरुषाची स्त्रीला भीती वाटत नाही, त्याच्याकडून तिच्या मनाविरुद्ध काहीही वावगं बोलणं अथवा कृत्य तिला सहन करावं लागणार नाही, असा तिला विश्वास वाटत असतो. पण स्त्री एखाद्याशी बोलते म्हणजे तिला ‘तसं’ काहीतरी वाटतं, ‘हँसी तो फँसी’ वगैरे वाटत असेल ते सगळं झूठ आहे. एक सामान्य व्यक्ती म्हणून सहजपणे स्त्री बोलत असते, वागत असते. ज्या स्त्रीने आपल्यावर सहकारी म्हणून, मित्र म्हणून विश्वास ठेवला आहे, तिचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी सदर व्यक्तीची असते.
याबरोबरच आपल्या हाती असलेल्या मोबाइलमधील संपर्क आपण ठेवायचे, काढून टाकायचे की ब्लॉक करायचे ? याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्या हाती असते हे स्त्रियांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या आत्मसन्मानाला दुखावणाऱ्याला तसे करू न देण्यासाठी संपर्क यादीतून हटविणे किंवा ब्लॉक करणे हा सोपा पर्याय आहे. त्यामुळे आपण नको असलेल्या मानसिक ताणापासून स्वतःचा बचाव तर करू शकतोच; शिवाय आपल्या आत्मसन्मानाचेही रक्षण होते. याबरोबरच अशा प्रवृत्तींना आळा बसतो हा भाग आलाच !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.