बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानी जि. बेळगाव
20 वे ग्रामीण साहित्य संमेलन दि. 28 डिसेंबर, 2025
संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे भाषण…
कुद्रेमानी (बेळगाव) गावातल्या विसाव्या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेले माननीय उद्घाटक, विविध मान्यवर, प्रतिष्ठित साहित्यिक, हितचिंतक आणि कुद्रेमानीच्या मातीवर, एकूणच साहित्यावर प्रेम करणारे उपस्थित सर्व श्रोतेहो, सर्वांना नमस्कार.
हा परिसर माझ्या परिचयाचा. निसर्गसंपन्न आणि प्रतिभासंपन्न बेळगाव, माझी कर्मभूमी असलेले यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी आणि चंदगड तालुका, ज्या भूमीला मी स्पर्श केला ती इथली भूमी माझ्यातील कवीला आणि माझ्यातल्या माणूसपणाला आणि संवेदनशीलतेला जिवंत ठेवणारा निसर्गसंपन्न परिसर.
22 वर्षांपूर्वी एका व्याख्यानाच्या निमित्ताने कुद्रेमानी या गावात आलो आणि इथल्या तरुणाईने मला स्वीकारलं. मी कुद्रेमानीचा कधी झालो ते मला कळालं नाही. माझा आजवरचा अनुभव आहे, मी ज्या गावात जातो ते गाव माझं होतं. कुद्रेमानीच्या मातीत 22 वर्षांपूर्वी एक कवितेचा शब्द पेरला होता, आज त्या शब्दाचे रूपांतर या साहित्य संमेलनाच्या रूपाने वाढलेल्या वनराईत मी पाहतो आहे. या साहित्यदिंडीचा मी केवळ वारकरी होतो, आजही आहे आणि यापुढेही राहीन; पण गेली अनेक वर्षे या संमेलनाचा मी अध्यक्ष म्हणून यावं असा आग्रह या मंडळींचा होता. मी एकच म्हणायचो की, मी दिंडीतला वारकरी आहे. बाबांनो, पालखी माझ्या खांद्यावर देऊ नका. पण यावर्षी मात्र त्यांनी मला संमेलनाध्यक्ष करून एक महत्त्वाची साहित्याची पालखीच मला दिली आहे. मी ती पेलणार आहे.
मित्रहो, संमेलनाचा अध्यक्ष होणे ही जितकी सन्मानाची बाब तितकीच ती कार्यरत राहण्याचीही एक जोखीम असते. केवळ संमेलनाध्यक्ष म्हणून बोलून जावं, एवढ्यावर मला थांबायचं नाही. माझ्या डोळ्यांसमोर मला काही सिद्ध करायचं आहे. बोलणारा वाचत जावा, वाचणारा लिहीत जावा म्हणजे बोलणे व लिहिण्यातून संवाद वाढेल. चर्चा होईल. सकारात्मक आणि नकारात्मक चर्चेतून काही नवनिर्माण होईल. इतकंच काय, नवनिर्मितीची बीजे त्या चर्चेतून जन्माला येतील. सकाळच्या सूर्योदयाच्या किरणांबरोबर मनाच्या आणि काळजाच्या कागदावर उमटणाऱ्या शब्दप्रतिभेचे फुलणारे अंगण नव्या दिशेचे असेल. दुपारच्या विश्रांतीच्या गप्पा, संध्याकाळच्या शिळोप्याच्या गप्पा या सगळ्यातून ही शब्दप्रतिभा फुलावी, ती विस्तारावी आणि साहित्याच्या असंख्य वाटांमधून प्रत्येकाची प्रतिभा फुलावी, हीच तर खरी शब्दसेवा! अशा शब्दसेवेचा घटक होण्याचा मान आपण दिलात, याबद्दल मी धन्यवाद देतो.
मी कवितेवर मनस्वी प्रेम करता करता कवी झालो आणि भवताल संवेदनशील मनानं काही टिपू लागलो. मात्र ते टिपण्यासाठी म्हणून एक स्वतःची भाषा असली पाहिजे. ती मी शोधू लागलो. माझ्या मनोगतात याच काही गोष्टी केंद्रीभूत ठेवून व्यक्त होणार आहे.
भाषा-माणूस आणि समाज :
साहित्य जगण्याचं बळ देतं, अशा साहित्याची भाषा स्वतःचा एक विचार देत असते. मुळात भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम आहे. लेखक बोलतो सर्वांशी. माणसांबरोबर-निसर्गाबरोबर-आनंदाबरोबर-दुःखाबरोबर-अश्रूंबरोबर समाजाबरोबर; पण सगळ्यात जास्त बोलतो ते स्वतःबरोबर. इतरांशी बोलण्यापेक्षा स्वतःशी तो अधिक प्रामाणिकपणे बोलत असतो. कारण ती लेखकाची स्वतःची भाषा असते. त्या बोलण्यामागे एक विचार असतो. मातीशी आणि मातेशी बोलतो तेव्हा त्या भाषेत एक वेगळी जाणीव असते आणि स्वतःशी बोलताना तो सुखदुःखाबरोबर स्वतःला चिमटीत पकडून बोलत असतो. स्वतः आनंद शोधत असतो. ते लेखन त्याचं आत्मभान जागं करणारं असतं. साहित्य स्वाभिमानानं जगायला शिकवतं. भाषा व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून येते तेव्हा आपल्या दैनंदिन जगण्यातल्या श्वासनिःश्वासांचीही एक भाषा असते. ती कळायला हवी. डोळे भरून बघणं आणि भरल्या डोळ्यांनी बघणं, यातही संवादापलीकडची एक भाषा असते. अशी भाषा एकमेकांशी सुसंवाद साधते. मनामनांची, भावनांची, संस्कृतीची, विचारांची देवाण-घेवाण करणारी भाषाच असते.
जग झोपले की मी जगासाठी रडतो असं म्हणणारे कबीर आणि लेखनाशिवाय मी वेडा होईन असं लिहिणारे जी. ए. कुलकर्णी आपल्या लेखनातून किती मोठे लेखनसामर्थ्य मांडतात. वात्सल्यप्रेमाने ओथंबलेली आई बाळाच्या गालावरून मायेचा हात फिरवते तेव्हा तीही एक माऊलीची भाषाच असते. अशा सर्वच पातळीवर भाषेचे सौंदर्य व्यापक असते. भाषा माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकणारी असते. काळाची आव्हानं पेलणारा लेखक, काळाबरोबर चालणारा सामान्य माणूस आणि काळाची बदलती रूपं बघणारा समाज या तिघांचीही भाषा एकच, फक्त व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे आहे. म्हणून लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकानं व्यक्त व्हायला हवं. कारण त्यातली भाषा त्याची स्वतःची असते. चांगल्या-वाईट गोष्टीवर समाज एक प्रतिक्रिया देतो ती त्याची भाषाच असते. भाषेला मात्र व्यक्त होण्यातून आपलं अस्तित्व मांडायचं असतं. मनाच्या वर्मी बसलेला खोलवरचा घाव काळजाचा तळ ढवळून काढतो, तेव्हा येणारे शब्द प्रामाणिक त्रासाला व्यक्त करतात. ते शब्द कधी कवितेचे, कधी कथेचे, कधी कादंबरीचे, कधी नाटकातल्या संवादाचे रूप घेऊन येतात आणि त्यातही अवतीभोवतीचा अवकाश लेखकाने पकडलेला असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळाची डोळसता व्यक्त होते ती लेखकाची समृद्ध भाषा असते. याअर्थाने भाषा चिंतन मांडत असते. जन्मानंतर श्वास येतो, मृत्यूनंतर श्वास जातो; मग साहित्याचं काय? प्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या कवितेच्या दोन ओळी या क्षणी मला महत्त्वाच्या वाटतात-
‘जन्मानंतर श्वास येईल, श्वासांसोबत कविता
मृत्यूनंतर श्वास जाईल, कुठे जाईल कविता?’
हा प्रश्न आणि त्यातल्या संवेदनशील ओळींनी आपण अस्वस्थ होतो. लेखकाच्या लेखणीने अस्वस्थ होणं म्हणजे लेखकाचं यश असतं. आपल्या अवतीभोवती लिहिणारे लेखक खूप आहेत. वाचणारे वाचकही आहेत. लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन देणारेही आहेत. सगळे भाषेवर प्रेम करणारे आहेत. भाषेला जिवंत ठेवणारे आपण सगळेच आहोत; पण प्रत्येकाने आपल्या मातृभाषेला जतन करायला हवं. माता, माती आणि मातृभाषा टिकवणं ही काळाची गरज आहे. कारण यात एक समाज बांधलेला असतो. समाजाचं प्रतिबिंब साहित्यात असतं. बघणारा, वाचणारा, लिहिणारा याच समाजात घडत असतो. आपली भाषा आपण पोहोचवतो कशी हे महत्त्वाचं असतं. यासाठी माध्यमांची भाषा महत्त्वाची असते. संवादमाध्यमातून येणारी भाषा, प्रसारमाध्यमांमधून येणारी भाषा, वाचनाच्या आनंदातून व्यक्त होणारी भाषा, ज्ञानसाधनेतून व्यक्त होणाèया आनंदाची भाषा, मूल्यांच्या रुजवणीतून येणारी भाषा, विचारांचं सौंदर्य मांडणारी भाषा, आयुष्याकडे कुतुहलाने बघणाèया माणसांची भाषा, पक्ष्यांशी बोलतानाची भाषा, मुलांना खांदा देण्याची वेळ आल्यानंतरची भाषा, प्रत्येक ठिकाणी भाषा बदलत जाते. दुःख सोसायला शिकवते तीही भाषाच असते. उदाहरणार्थ, कवी ग्रेस यांचा ‘फादर सर्जियस’ नावाचा एक लेख आहे. एकांतप्रिय फादर आणि त्यांना वश करण्यासाठी पैज लावणारी माकोव्हकिना. क्षणार्धात अंगठा तोडणारे फादर दुःख स्वीकारतात. दुःखाचंही एक दीर्घस्तोत्र असावं, असं ग्रेस लिहितात.
भाषा जिवंत तर समाज जिवंत – सामान्य माणूस जिवंत. माणूस कोणाला म्हणायचं? दीड दमडीचे आयुष्य जगतो तोही माणूसच. चिंध्या पांघरून आयुष्य काढतो तोही माणूसच आणि नोकरांच्या गर्दीत सुखासिन जगतो तोही माणूसच. तरीही प्रत्येकाचे आयुष्य वेगळेच असते. वितीएवढ्याशा पोटासाठी जीवाचा आटापिटा करणाराही माणूसच. काळाची पावलं ओळखून जगणाराही माणूसच. बेधुंद आणि मस्तीत जगणाराही माणूसच. गुलाबाच्या देठात काळजाची ओल शोधत प्रियसखीला बोलण्यासाठी आळवणारा प्रेमिक तोही माणूसच. क्रांतीचा आवाज बुलंद करणारी गांधीटोपी एका अबलेचा आवाज बंद करण्यासाठी वापरणारा पुरुष तोही माणूसच. सगळी माणसंच आहेत. माणसांची गर्दी आहे; पण ‘माणूस’ मात्र हरवलाय, ही खंत आहे. कारण संस्कारांची मूल्यं हरवली आहेत. संगणकीय भाषा आली आणि माणूस लांब गेला, जग जवळ आलं. पण ती आजची गरज बनली आहे. जगभरात सर्वाधिक संपर्क संगणकाच्या माध्यमातून होतो. त्यामुळे संगणक माध्यम लोकप्रिय आणि गरजेचे बनले आहे. जगभर पसरलेले इंटरनेटचे जाळे, लाखोंच्या संख्येत असलेल्या वेबसाईट्स, त्यातले विविध पर्याय, गुगलसारखे सर्च इंजिन, विकिपीडियासारखा मुक्त ज्ञानकोश हे सखोल ज्ञान देतात. आधुनिक जगाचे संवाद माध्यम ‘इंटरनेट’ बनले आहे. माणूस यंत्राच्या जाळ्यात अडकला आहे. आता माणसं जोडण्यासाठी संगणकाचा मोठा वापर केला जातो. इंटरनेटच्या माध्यमातून होणारा संवाद तुम्हाला खेचून घेतो, बांधून ठेवतो; पण एक गोष्ट मात्र गरजेची असते, ती म्हणजे या माध्यमातून बाहेर पडण्याचे भान असले पाहिजे. त्यासाठी स्वतःवरच आपण बंधने लादून घ्यायला आहेत. आत्मविकास असला तरी अशा माध्यमांचे कौशल्यपूर्ण विकासतंत्र महत्त्वाचे असते. कारण माणूस समाजशील प्राणी आहे आणि तो सामाजिक संबंधांच्या जाळ्यात जगतो म्हणूनच भाषा-माणूस आणि समाज हे तिन्ही घटक मला महत्त्वाचे वाटतात.
कला-साहित्य आणि लिहिता लेखक :
कला ही जगण्यातला आनंद शिकवते. मनाच्या अंगणातले तुळशी वृंदावन ऑक्सिजन देत राहते तेव्हा आजूबाजूला एक स्वच्छ आणि आनंददायी हवा वाहत असते. तो क्षण म्हणजे आपल्या जगण्यातला आनंद असतो. अशा सुंदर क्षणांसाठी आपल्याकडे एक कला असावी लागते. कला प्रत्येकाची वेगळी! रंग-रेषा-चित्र-सूर-लय-संगीत-ध्वनी-ताल-नृत्य या सगळ्यांत एक कलेचा पोत असतो. मात्र याबरोबरच साहित्याच्या प्रदेशात अचूक शब्दमांडणी खूप महत्त्वाची असते. मूळ भाव अर्थपूर्णतेने साहित्यात येतो. मनातली कल्पना अंतःकरणातून चित्रकाराच्या हातून कागदावर उतरते आणि संगीताच्या नाजूक लयीवर सूर येतात तेव्हा काळजापर्यंत पोहोचणारा ध्वनी ऐकून आपण अंतर्धान पावतो, ही सगळी कलेची साधना असते. कलेसाठी जशी साधना महत्त्वाची असते, तशी साहित्यासाठीसुद्धा साधना आणि तपस्या महत्त्वाची असते. आपण जोपर्यंत अंतरिकतेने स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला सापडत नाही. आत्मिक भान येणे ही साहित्याची गरज असते. समाजभान येणे ही तुमच्या जिवंतपणाची साक्ष असते. या व्यापक विचारातून आपण आपली निष्ठा सिद्ध करायची असते.
आपल्या सभोवतालाचे-आधुनिक जगाचे-एकूण समग्रतेचे भान यावे लागते. काळ काहीतरी शिकवत असतो. अंतरिक चेतना, सामाजिक जाणीव, सामाजिक विद्रोह, दुःखाची वेदना आणि संवेदना, मी-तू पणाच्या पलीकडचा मानवभाव, अहंकाराची जळमटं, सगळी विषमतेची जाणीव दूर झटकून ‘मानवतेची’ हाक मारणं खूप महत्त्वाचं असतं. आपली कलेवरची, साहित्यावरची, मानवतेवरची निष्ठासुद्धा प्रामाणिक असावी लागते. कारण प्रामाणिकतेतही एक सौंदर्य दडलेलं असतं. निरागस मुलाच्या चेहऱ्यावरची प्रामाणिकता आपल्यातली मानवता जागी करते. सकाळच्या कोवळ्या किरणांची सोबत दिवसभरासाठी एक ऊर्जा निर्माण करते. संध्याकाळची गार झुळूक आपल्याला अंतर्बाह्य आनंद देते. साहित्य व्यापक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असूनही व्यक्त होणाèया आशयाशी प्रामाणिक राहून भाषिक अविष्कार करणारी ती कलाकृती असते. दर बारा कोसांवर भाषा बदलते. तशीच ती दर पिढीगणिक बदलते. समाज या व्यापक संकल्पनेत अनेक मानवी समूह असतात. समाजात अनेक वयोगटाची माणसं असतात. म्हणजेच बदलत्या पिढ्या असतात. प्रत्येक पिढीचं एक चिंतन असतं, या सगळ्यात एक समाज दडलेला असतो. समाजमनात सभोवताल असतो. प्रत्येकाचा एक काळ असतो. काळाच्या नोंदी होतात. लिहिता लेखक त्या त्या काळाचा साक्षीदार असतो. तो आपल्या भावनांना चिंतनातून मांडतो. साहित्यिक आणि लेखक अनुभवलेल्या समाजमनाचे चित्र आपल्या लेखनातून मांडतो. साहित्याचे समाजशास्त्र सुरू होते. साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांचा शोध लेखक घेऊ पाहतो.
संवेदना बोथट झालेल्या गरगरत्या वर्तमानकाळात एकूणच अस्वस्थतेचे वातावरण अधिक गढूळ बनले आहे. पुढच्या श्वासांवरही हमी नसलेला हा काळ आहे. सभोवताली एक अस्वस्थ गुदमर आहे. मोकळा श्वास हरवल्याने प्रत्येक जण चिंतेत आहे. खून-मारामारी-घातपात-लुटालूट-नात्यांची ताटातूट अशा असंख्य घटनांच्या विषारी आणि विखारी वायूने सगळी भूमीच सारवली आहे. जीव मुठीत घेऊन जगताना सगळे स्वातंत्र्य हरवले असल्याची जाणीव होते आहे. समाजातल्या हजारो प्रश्नांचा ढीग आपल्यापुढे दिसतो आहे. भुकेची आणि भाकरीची ज्याला त्याला भ्रांत आहे. तशी प्रश्नांची यादीही खूप मोठी होईल. अशावेळी आपल्यातल्या संवेदनेला जागृत ठेवून लिहिता लेखक समकाळाच्या प्रश्नांना भिडतो आहे. ज्या समाजात आपण वाढतो, त्या समाजाचे प्रश्न आपण समजावून घ्यायला हवेत. सामाजिक प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत. अशा सगळ्या भीषण परिस्थितीत मला संतांची वचने महत्त्वाची वाटतात. संतसाहित्याने समाजाला तारले आहे म्हणून तर टाळ-मृदुंगाच्या नादातली बेहोषता आणि अभंगातली आर्तता आपल्याला जागी करते.
लोकांच्यासाठीच्या प्रबोधनातून परिवर्तनाचा ध्यास मांडणारी संतांची विचारधारा लोकशिक्षक म्हणून महत्त्वाची वाटते. जगासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानाचे मुकुट होते आणि संत तुकारामांनी तर आपल्या अभंगातून कळस चढविला. सामान्य माणसांची रूपे असामान्य व्यक्तिमत्त्वे बनली. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. यासाठीच त्या त्या काळाचे भान असणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. लेखकाच्या लेखणीची मुळं समाजव्यवस्थेतच रुजलेली असतात. कारण साहित्याचा मुख्य विषय मानवी जीवनच असतो. मानवी जीवनासाठीच्या मूळ प्रेरणा, त्याच्या पूर्ततेसाठीची धडपड, जगण्याचा आटापिटा, विशिष्ट परिस्थितीमुळे होणारा मनाचा कोंडमारा, कधी मायेची ओल, तर कधी नात्यांमधला-सामाजिक जीवनातला तणाव, संघर्ष आणि यश-अपयश पचवण्याची कुवत, या सगळ्यातून मानवी जीवनाभोवतीच साहित्याचे केंद्र असते. ते व्यक्त करण्यासाठी शब्द माध्यम बनून येतात. शब्द हेच साहित्याचे माध्यम आहे. शब्दांनी माणसं जोडली जातात. शब्दांनी साहित्य प्रभावी ठरतं. शब्दही साहित्याची गंगोत्री आहे. साहित्य ही एक चळवळ आहे. साहित्याच्या चर्चा साहित्यलेखनासाठी, वाचकांसाठी प्रेरणास्थाने असतात. साहित्य संमेलनांच्या छोटी-मोठी संस्था म्हणजे त्या परिसरातील साहित्याचे बेट असते. परिसरातल्या वाचत्या-लिहित्या माणसांची ती एक चळवळ असते. इथे वाचक रुजतो, लेखक घडतो, माणूस माणुसकी संपन्न बनतो, या चळवळीतच लेखक लिहीत राहतो. सर्वसामान्य माणसाला साधुसंतांच्या विचारांचा एक नैतिक आधार होता, तो आजही आहे. वाचू पाहणाèया प्रत्येकाला तसा लिहित्या लेखकाचा एक आधार असतो.
साहित्य संमेलने ही ऊर्जाकेंद्रे :
लेखक हाही एक माणूसच असतो. साहित्यकृतीबद्दलचे भाष्य करणारा समीक्षक आणि आपल्या साहित्यकृतीला न्याय मिळवू पाहणारा लेखक दोघांनाही एक साहित्याविषयीची आस्था आणि भूक असते, असे समीक्षक रा. ग. जाधव म्हणतात ते महत्त्वाचे आहे. हीच समाजपरिवर्तनाची भूक अशा साहित्य संमेलनांमधून शोधली जाते. कारण विचारपरिवर्तनाचे माध्यम म्हणजे अशी साहित्य संमेलने होत. भाषेच्या विकासाची आणि उत्कर्षाची ही चळवळ आहे. तरुणाईसाठी अशी संमेलने म्हणजे वैचारिक ऊर्जेची केंद्रे आहेत. या ऊर्जेसाठी प्रत्येकाने आपल्या मातीची जाणीव ठेवावी. मोडून पडलेल्या माणसाला आधार द्यावा, कुणाच्यातरी आयुष्यात उजेड पेरण्याचं काम करावं, शब्दांचा सन्मान व्हावा, अवतीभोवतीचं जग आणि वास्तव अचूकतेनं मांडावं यासाठी अशा संमेलनांमधून विचार परिवर्तन होणे गरजेचे आहे.
प्रसिद्ध कवी अशोक कोतवाल लिहितात,
‘मुलं गृहपाठ लिहीत नाहीत,
हा माझा दोष नाही.
या शतकाचा कोरा कागद
त्यांच्या लेखणीला झिरपू देत नाही’
इतकं प्रखर वास्तव अचूकतेने पकडता यायला हवे किंवा माणसाच्या एकाकीपणाबद्दलचे प्रसिद्ध हिंदीतील एक भाष्य आहे-
‘दुनिया में दो तरह के लोग होते है
एक वो, जो काफी अकेले होते है
दुसरे वो, जो अकेलेही काफी होते है’
या लेखनातील गांभीर्य समजून घ्यायला पाहिजे. कारण या दोन्ही उदाहरणांमध्ये समाजाचे चित्र आहे आणि लेखकाची घुसमट आहे. काळालाही लाजवणारी सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आजूबाजूला पसरली आहे. कृषिजन परंपरेचे बदलते चित्र बघून मन कासावीस होते आहे. रांगेने मरावं अशी शेतकèयांची अवस्था आहे. ज्याच्याकडे पैसा त्याचेच शिक्षण, ही शिक्षणाची अवस्था आहे. सरकारी शाळा ओस पडतायेत आणि खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. हे बदलते वास्तव लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. अशावेळी एकूणच साहित्य, शिक्षण, शेती, समाज अशा गोष्टींची गांभीर्याने चिकित्सा होणे गरजेचे आहे. लेखक म्हणून या घडणाऱ्या गोष्टींकडे आपण अधिक व्यापकतेने बघायला हवे. भाषा-भाषांचे प्रेम, भाषाभगिनींच्या इतकेच महत्त्वाचे आहे. शिवराम कारंथ, गिरीश कर्नाड यांची नाटके, एस. एल. भैरप्पा यांसारख्या प्रतिभावंतांची लेखणी वाचल्यावर कळते. खूप विस्तारत निघालेल्या या मनोगतात मी समारोपाला एवढेच सांगेन,
- साहित्याच्या चर्चा आणि बैठका साहित्यिक विचार प्रवाहाला मदत करतात.
- साहित्य संमेलनांमधून अशा विचारधारांना व्यक्त करण्याची संधी मिळते.
- साहित्य संमेलने ही चर्चात्मक पातळीवरची केंद्रस्थाने आहेत.
- लिहित्या लेखकांना वाचत्या वाचकाला अशा छोट्या-मोठ्या संस्था साहित्यिक बळ पुरवण्याचे काम करत असतात.
- वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी घर तिथे पुस्तक, अशी संकल्पना रुजायला हवी.
- ज्यांना अनेक भाषा येतात त्यांनी अनुवादासाठी पुढाकार घ्यावा. अनुवादातील चिंतनशैली समजून घ्यावी.
अशा अनेक अपेक्षांसह मी थांबतो. आपण मला संमेलनाध्यक्ष म्हणून शब्दपूजेचा मान दिलात, याबद्दल बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह या साहित्यमंडपात उपस्थित असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो व माझ्याच दोन ओळींनी मी थांबतो.
‘दूर आभाळी घरात, एक प्रकाशावा दिवा
व्हावे काळजाचे गाणे, अर्थ जगण्याला यावा’
धन्यवाद!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
