January 15, 2025
Importance of Cassia Tora and preparation of vegetable
Home » तरोट्याचे उपयोग अन् पाककृती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तरोट्याचे उपयोग अन् पाककृती

तरोटा अर्थात टाकळा ही वनस्पती पडीक जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळते. शेताच्या बांधावर, पाण्याच्या निचऱ्यासाठी खणलेल्या चरीच्या परिसरातही आढळते. ही वनस्पती औषधीही आहे. कफदोष, त्वचारोग, दंतरोगावर ही वनस्पती उपयुक्त आहे. गाजर गवताच्या नियंत्रणासाठीही या वनस्पतीची लागवड केली जाते.

शास्त्रीय नाव : Cassia tora
स्थानिक नाव : तरोटा, टाकळा
उपयोगी भाग : पान
औषधी उपयोग : कफदोष, त्वचारोग, दांतरोग यात उपयोगी

तरोटा अर्थात टाकळा ही वनस्पती गाजर गवताच्या उगवणक्षमतेवर परिणाम करते. केशिया तोरा आणि केशिया सेरिसिया या दोन्हीही प्रजाती गाजर गवताच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. ज्या ठिकाणी टाकळा किंवा तरोटा ही वनस्पती आढळते, तेथे गाजर गवताचा प्रसार कमी आढळतो.

तरोटा वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या एक विशिष्ट प्रकारच्या रसायनामुळे गाजर गवताच्या बियांची अंकुरणक्षमता कमी होते, त्यामुळे गाजर गवताच्या प्रसाराला नैसर्गिकरीत्या आळा बसतो. तरोटा मेल्यावर रोपे जेव्हा जमिनीवर सडतात तेव्हा त्यातून कोलाइन नावाचे रसायन मातीत मिसळते. त्यामुळे गाजर गवताच्या बियांच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

तरोट्याचे फायदे –

तरोट्यामुळे जमिनीतील अन्नघटक किंवा जमिनीच्या प्रतीवर काही विपरीत परिणाम होत नाही. त्याचबरोबर त्याचा उपयोग हिरवा चारा, भाजी, वाळलेल्या झाडांचा इंधन म्हणून व त्यांच्या बियांपासून मेण तयार करण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर तरोट्यामुळे मनुष्य व जनावरांच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम दिसून येत नाही आणि तरोटा जर फार पसरला तर त्याचे नियंत्रण हे सोपे आहे. त्या बिया वजनाने जड असल्यामुळे त्या गाजर गवताप्रमाणे दूरदूर उडून जात नाहीत, त्यामुळे त्याचा प्रसार लगेच थांबविता येतो. शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यात तरोट्याची बी जमा करून पाऊस पडण्याआधी ज्या ठिकाणी गाजर गवत उगवते अशा ठिकाणी जर हे बी टाकले तर एक-दोन वर्षांत तिथे गाजर गवताचे प्रमाण कमी होते. या प्रतिस्पर्धी वनस्पतींचा व सूक्ष्म जिवांचा वापर जर केला तर गाजर गवताचे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करता येईल.

तरोट्याची अर्थात टाकाळ्याची भाजी करण्याची कृती –

  • प्रथम भाजीची लहान पाने आणि नाजूक देठ बघून खुडून घावीत.
  • निवडलेल्या भाजीला पाण्यात स्वच्छ धुवून घावे.
  • तरोट्याची पाने शिजायला वेळ लागतो म्हणून ते आधी पाण्यात 10 मिनिटे उकडून घ्यावे.
  • उकडून झाले कि भाजी थंडी होऊ द्यावी आणि नंतर बारीक कापून घ्यावी.
  • कढईत तेल घ्यावे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी घालावी.. मोहरी तडतडली कि त्यात बारीक कापलेला लसूण घालावा.
  • बारीक कापलेला कांदा घालावा. कांदा शिजला कि लाल मिरची पूड, हळद आणि धने पूड घालावी.
  • यात नंतर कापलेले तरोटा भाजी घालावी आणि वरून झाकून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवावी.
  • यात भिजवलेले मूग डाळ घालावी आणि चवी प्रमाणे मीठ घालून एक करावे.
  • भाजीला झाकून 5 ते 10 मिनिटं शिजवावे. गरज पडल्यास पाणी शिंपडावे.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading