संजय तांबे लिखित ‘समाजभान’ ग्रंथाचे प्रा.सीमा हडकर, मधुकर मातोंडकर, सचिन माने यांच्या उपस्थितीत प्रकाशन
कणकवली – समाज जागृत होत नाही म्हणूनच संजय तांबे यांच्यासारख्या विचारी लेखकाला ‘समाजभान’ यासारखा ग्रंथ लिहावा लागतो. समाज भानावर येत नाही ही समाजाची अधोगतीच असते. अशा आजच्या पडझडीच्या काळात तांबे यांनी ज्या धाडसाने वर्तमानाचा धांडोळा या ग्रंथात घेतला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कोकणच्या ग्रंथसंपदेमध्ये ‘समाजभान’ या ग्रंथाची दीर्घकाळ दखल घेण्यात येईल असे प्रतिपादन कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी फोंडाघाट येथे केले.
लेखक – कवी संजय तांबे यांनी लिहिलेल्या आणि प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘समाजभान’ ग्रंथाचे प्रकाशन फोंडाघाट येथे कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्रा सीमा हडकर, कवी तथा सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर, खरभूमी विभागीय भांडारपाल सचिन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात बोलताना कवी कांडर यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण काय गमावलं आहे याची चर्चा ‘समाजभान’ या ग्रंथात तांबे यांनी केली आहे.
कोकणच्या विद्रोही लेखन परंपरेला एक चांगला लेखक तांबे यांच्या रूपाने मिळाला आहे. ही सांस्कृतिक चळवळीची महत्त्वाची घटना आहे असेही सांगितले. यावेळी सम्यक संबोधी साहित्य संस्थचे अध्यक्ष किशोर कदम, जिल्हा स्काऊट गाईडचे अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रा. हडकर म्हणाल्या, ज्ञानसंवर्धन आणि विचार जागृती हा सामाजिक जीवनाचा एक भाग असल्याने समाजातील ब-यावाईट प्रवृत्तीचे व शक्ती संघर्षाचे पडसाद समाजात उमटल्या शिवाय राहत नाहीत. संजय तांबे लिखित ‘समाजभान’ हे लेखसंग्रह पुस्तक त्यांचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्या ना कोणत्या दिनाचे औचित्य साधून हे लेखन केले आहे. लेखक संजय तांबे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व आंबेडकर चळवळीचा फार मोठा प्रभाव असल्याने त्यांच्या लेखनात समाज परिवर्तनशील विचार, स्त्रीपुरूष समानता, देशाभिमान, आधुनिक विचारसरणी आदीची प्रगल्भतेने त्यांनी समाजभान मध्ये मांडणी केली आहे.
श्री मातोंडकर म्हणाले, लोकशाहीत मतांचे मूल्य अनन्यसाधारण आहे. पण आता राजकीय व्यवस्थाच लोकांना विकत घेत आहे. याची चिरफाड तांबे यानी समाजभान लेखनातून केली आहे. अशोक पळवेकर अशा चांगल्या अभ्यासकाने या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली. यातूनच या ग्रंथाचे मोल लक्षात येते. तब्बल बारा पानाची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली असून ती मुळातूनच वाचायला हवी.
लेखक संजय तांबे यांनी यावेळी आपली लेखन प्रक्रिया उलघडून दाखविली तर मिलिंद जाधव यांनी संजय तांबे यांची लेखक म्हणून कशी वाढ झाली याबद्दल विवेचन केले. सचिन माने, किशोर कदम, श्री गायकवाड यांनीही विचार व्यक्त केले. प्रा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
आई कविता