October 4, 2023
Teach childerens with love article by Sadashiv Panchal
Home » मुलांना प्रेमाने जिंकता आले तर…
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मुलांना प्रेमाने जिंकता आले तर…

मुलांना बोलताना कधीही चार चौघात बोलू नये. तो अपमान वाटतो. आपल्या बरोबर एखादी घटना घडली, आणि चार चौघात आपल्याला कोणी काही म्हणाले, तर आपल्याला कसे वाटते, तसेच मुलांनाही वाटते. येथे प्रामुख्याने मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार व्हावा, असे माझे स्पष्ट मत आहे.

सदाशिव पांचाळ

मोबाईल – 9923590942
लेखक एज्युकेशनल अॅडव्हायजर, समुपदेशक म्हणून गेली २० वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

अरे गाढवा, तुला काही अक्कल आहे की नाही? हे वाक्य आपण आपल्या मुलाला चारचौघात बोलतो, तेव्हा त्या बाल मनावर होणारा परिणाम कसा असेल याचा विचार आपण करतो का?

मित्रहो, मुलं आहेत, खेळणार, मस्ती करणार, तुम्ही आणि आम्ही आता इच्छा असली तरी खेळू- कुदू शकतो का? नाही ना? मग खेळू द्या की मुलांना. पडू दे, आपटू दे, ढोपर फुटू दे, जरा लागु दे तांबडं हाता-पायाला. तेव्हाच मुलांना कळेल. अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे. थोडं फ्रिडम मुलांना ही दिली पाहीजे. पण या फ्रिडमला सुध्दा मर्यादा असतात, हे ही विसरून चालणार नाही, बरं का.

मुलं खेळताना पडणार, आपटणार. मस्ती करताना काही तरी चुकले, तर डायरेक्ट ‘गाढव’ या पदवीची गरज नसते. आपण ज्यावेळी त्यांना ‘गाढव’ म्हणतो, त्यांना काय वाटत असेल, एक क्षणभर आपण याचा विचार करायला हरकत नाही. मुलं गाढव नसतं, पण आपल्या बोलण्यातून तो गाढव असल्याची जाणिव त्याला करून देत असतो. इथेच ठिणगी पडते. बाप आणि मुलांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची. या घटनेला नकळतपणे आपण जबाबदार असतो. पण दोष मात्र निष्पाप मुलांवर.पालकांनी मुलांसोबत बोलताना असे शब्द टाळावेत, यातुन संवाद होऊच शकत नाही. वाद मात्र नक्कीच वाढू शकतो. मुलांमध्ये संवादाची आज अधिक गरज आहे.

परीक्षेत नापास झाला, कमी गुण मिळाले तर आपण पालक केवढं आकांड तांडव करतो. पण आपल्या मुलांच्या क्षमतांचा, पात्रतेचा विचार आपणच करायला हवा, तो विचार जग कधीच करणार नाही. समजावणीचा स्वर आपलं सर्व काम सुरळीत करील. त्यासाठी मुलांनी एखादी चुक पहिल्यांदाच केली असल्यास स्वतः वर नियंत्रण ठेवून अलिखित सामंजस्य करार केला जावा. काय बरोबर, काय चुक हे लहान वयात मुलांना कळत नाही, ते आपण पालक या नात्याने आपण समजून घ्यायला हवे. आपल्या बोलण्यात नाजूकपणा हवा. चुकीची जाणीव होईल, एवढेच बोलावे. मी एवढी चुक केली तरी पालक पालक आपल्या पाठिशी आहेत, हे मुलाला जाणवले पाहीजे. त्या चुकीची परत कधीही आठवण मुलांसमोर काढू नये. मुलाने परत अशी चुक करू नये, यासाठी आपला प्रयत्न असावा.

मुलांना बोलताना कधीही चार चौघात बोलू नये. तो अपमान वाटतो. आपल्या बरोबर एखादी घटना घडली, आणि चार चौघात आपल्याला कोणी काही म्हणाले, तर आपल्याला कसे वाटते, तसेच मुलांनाही वाटते. येथे प्रामुख्याने मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार व्हावा, असे माझे स्पष्ट मत आहे. मुलांच्या मनावर चांगला परिणाम व्हावा असे वाटत असल्यास ‘सुसंवाद’ हा पर्याय आहे. मुलांचा मनावर वाईट परिणाम करणारे शब्द, वाक्यरचना शक्य तितक्या टाळून मुलांना प्रेमाने जिंकता आले तर….

Related posts

मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा…

चैतन्याचा झरा… साळुंखे सर !

Leave a Comment