धनेश मित्र निसर्ग मंडळ, दातार बेहेरे जोशी महाविद्यालय चिपळूण आणि सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्यावतीने चिपळूण शहरात धनेश संवर्धन मंडळाची स्थापना
चिपळूण – डीबीजे कॉलेजमध्ये धनेश पक्षी खाद्यवृक्ष रोपवाटिकेची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती पक्षीप्रेमी प्रतिक मोरे यांनी दिली. धनेश प्रजातींचे संवर्धन यासाठी सुरु असलेल्या कार्यात अभ्यासगटाकडून प्रत्यक्षकृती म्हणून हे कार्य हाती घेण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
कोकणात धनेश पक्ष्यांच्या चार प्रजाती आढळून येतात. महा धनेश, कवड्या धनेश, मलबारी राखी धनेश आणि भारतीय राखी धनेश या प्रजाती चिपळूण तालुक्यात सुद्धा आढळून येतात. गेल्या काही वर्षात परिसरात झालेली वारेमाप वृक्ष तोड, ढोली असणाऱ्या मोठ्या पुराण वृक्षांची कमतरता, काजरा, लीम्बारा, वड, पिंपळ, उंबर, पायर, पिंपरी अश्या खाद्यवृक्षांची कमतरता आणि तापमान वाढ यामुळे धनेश प्रजाती धोकाग्रस्त बनल्या आहेत. जागतिक पातळीवर देखील धनेश प्रजातींचा अधिवास जवळ जवळ २६ टक्क्याने घटलेला आहे. कोकणात सुद्धा खाजगी मालकीच्या जंगलाची तोड, एकसुरी पद्धतीची लागवड, महामार्गांचा विस्तार अश्या अनेक कारणांनी काही दशके सातत्याने होत असलेली वृक्ष तोड अनेक प्रजातींच्या मुळावर उठली आहे.
गेल्या काही वर्षात धनेश प्रजातींवर झालेल्या अभ्यासात सहयाद्रीच्या उतारावरील जंगलांना नसलेले संरक्षण आणि तापमान वाढ यामुळे धनेश प्रजातींची संख्या वाढत नसल्याचे निदर्शनास आले आहे. देवरुख मधील सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धनेश मित्रांनी एकत्रित येऊन स्थापन केलेले धनेशमित्र निसर्ग मंडळ, एन. सी. एफ या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन उपक्रम राबवत आहे. यामध्ये धनेश प्रजातींच्या घरट्यांचे निरीक्षण, धनेश प्रजाती खाद्यवृक्ष रोपवाटिका, शाळा आणि महाविद्यालये इथे स्थापन करण्यात आलेले धनेशमित्र निसर्ग मंडळ असे उपक्रम सामील आहेत.
चिपळूण येथील निसर्ग मित्रांनी सुद्धा धनेश प्रजातींचे संवर्धन व्हावे यासाठी एकत्रित येऊन अभ्यास गटाची स्थापना केली आहे. चिपळूण तालुक्यातील दहाहून अधिक घरट्यांचे निरीक्षण आणि रक्षण हा अभ्यास गट करीत आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून डीबीजे कॉलेज इथे धनेश पक्षी खाद्यवृक्ष रोपवाटिका निर्मिती करण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यातून धनेश पक्ष्यांच्या ढोली खालून गोळा करण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बिया रोप वाटिकेमध्ये नेऊन त्यापासून खाद्य वृक्षांची रोपे तयार करण्यात येणार आहेत. रोपे तयार झाल्यानंतर त्यांची अधिवासात पुर्नस्थापना करून अधिवास पुनर्निर्मिती शक्य होणार आहे. यासाठी डीबीजे कॉलेजने पुढाकार घेतला असून नर्सरी करण्यासाठी महाविद्यालयाच्या परीसरातील जागा यासाठी देण्यात आली आहे.
डीबीजे कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेतील सदस्यांच्या माध्यमातून बीज संकलन, ढोली निरीक्षण आणि रोपांचे संगोपन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, संचालक नयनिश गुढेकर, डॉ. एच.टी बाबर यांचे सहकार्य लाभत आहे. त्याबरोबर चिपळूण शहरातील पक्षी मित्र नितीन नार्वेकर, सचिन पालकर, समीर कोवळे, शहानवाज शहा, ऋषिकेश पाळंदे, बंधू कदम, दिगंबर सुर्वे, गजानन सुर्वे, सह्याद्री निसर्ग मित्र यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभ आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.