Friends of Animals Society चा, 1992 सालातला, ‘निसर्ग सृष्टी’ या अंकात जयंत देशपांडे यांचं, ‘हंगाम विणीचा’ नावाचा लेख प्रसिद्ध झाला होता. अनेक जणांना पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाविषयी माहिती नसते. ती थोडक्यात सांगण्याच्या उद्देशाने हा लेख प्रपंच…
नेत्रा पालकर-आपटे
निसर्गाच्या मजबूत साखळीत नाजूक अशी कडी म्हणजे विणीचा हंगाम. प्रजोत्पादनाबरोबर निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य याच वेळेस अचूक साधले जाते. सर्व पक्ष्यांनी आपापला विणीचा हंगाम ठरवताना प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार केलेला दिसतो. एक म्हणजे पिल्लांसाठी भरपूर चाऱ्याचा पुरवठा करता येईल असा ऋतू निवडणे आणि दुसरे म्हणजे शत्रूंपासून पिल्लांचे सहजरित्या संरक्षण करता येईल अशी जागा निवडणे.
प्रत्येक पक्ष्याचा विणीचा हंगाम हा त्याच्या त्याच्या खाद्यानुसार ठरलेला असतो. वर्षभर वेगवेगळे पक्षी आपापले संसार थाटत असतात. पावसाळ्यात घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांचे भक्ष्य वेगवेगळे कीटक असतात. पावसाळ्यात हवा दमट असते. कीटकांना आपल्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण उपलब्ध असते. अंड्यातून बाहेर पडलेल्या या अळ्या, पिलांना खाद्य म्हणून सहज उपलब्ध होतात. त्यामुळे पावसाळ्याची चाहूल लागताच, पक्ष्यांची विणीची धांदल सुरू होते. नर विविध रंगांनी नटून, मधुर स्वरात माद्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मग घरटी बांधण्याची लगबग सुरू होते.
शिकारी पक्षी हिवाळ्यात वीण करतात. या पक्ष्यांचे भक्ष्य असलेल्या पक्ष्यांची वीण पावसाळ्यात झालेली असल्याने, त्यांची पिल्ले, लहान पक्षी हे या शिकारी पक्ष्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून उपलब्ध असतात. त्यामुळे शिकारी पक्ष्यांना हिवाळा हा विणीसाठी सोयीचा वाटतो. सदाहरित जंगले सोडली, तर इतर सर्व वृक्षांची पाने हिवाळ्यात झडतात. त्यामुळे या शिकारी पक्ष्यांना त्यांच्या जमिनीवरील भक्ष्यांची (साप, ससे, उंदीर, इतर छोटे प्राणी) शिकार करणे सोपे जाते. आणि पिल्लांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध होऊ शकते.
पाणथळी वरचे पक्षी उन्हाळ्यात वीण करतात. पाणथळ जागेतील पाणी उष्णतेने कमी झाल्याने या पक्ष्यांना त्यांच्या पिल्लांसाठी मासे, खेकडे, शिंपल्या व इतर पाण कीटक सहज उपलब्ध होतात. प्रत्येक पक्ष्याची प्रजोत्पादनाची क्षमता त्या पक्ष्याच्या नैसर्गिक शत्रूंच्या संख्येवर अवलंबून असते. बुलबुल, मैना, टिटवी, लावरी यासारख्या पक्ष्यांवर शिकारी पक्षी आपले उदरभरण करतात. त्यामुळे त्यांची वीण जास्त वेळा असते. अंड्यांची संख्या पण जास्त असते. याउलट शिकारी पक्षी हे अजातशत्रू (माणसाचा विचार न केल्यास) असल्याने, त्यांची वीण कमी असते. शिकारी पक्षी साधारणपणे एक किंवा दोनच अंडी घालतात.
प्रत्येक पक्षी आपल्या गरजेनुसार घरटे बांधतो. घरटे बांधत असताना प्रामुख्याने सुरक्षिततेचा विचार केला जातो. शत्रूचे सहज लक्ष जाणार नाही अशा झाडाझुडुपात शिंपी (tailor bird), वटवट्या (warbler) यांसारखे लहान पक्षी आपली घरटी बांधतात.
शिंजिर (purple rumped sunbird) तर मिळेल ते साहित्य (गवत, काड्या, कागदाचे कपटे, पाने) कोळीष्टकाने गुंफून लोंबते घरटे तयार करतो.
सुगरण पक्षी (Baya Weaver) गवताच्या पत्यापासून पुंगीच्या आकाराचे घरटे बांधतो. पावसाळ्यात अशी दहा, बारा घरटी बाभळी किंवा शिंदीच्या झाडाला लटकलेली आढळतात.
शत्रूचे सहज लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी पक्ष्यांना घरटे बांधणे सोयीचे वाटते. या उलट आपले घरटे लपवण्याच्या भानगडीत न पडणारा पक्षी म्हणजे कोतवाल (Drongo). तो निडरपणे झाडाच्या कुठल्याही फाट्यामध्ये वाटीच्या आकाराचे गवताने घरटे बांधतो.
शिकारी पक्षी उंच झाडांवर घरटे बांधतात. या घरट्यांना फारसा आकार नसतो. वेगवेगळ्या कटक्यांचा ढिगारा म्हणजे यांचे घरटे, जे वर्षानुवर्षे वापरले जाते. फक्त अंडी घालण्याआधी जुन्या घरट्याची डागडुजी केली जाते.
पाणथळीवरचे पक्षी, उदा. करकोचे (storks), बगळे (egrets, herons) हे वड, बाभळी या सारख्या उंच झाडांवर कटक्यांची घरटी बांधतात. एकाच झाडावर या पक्ष्यांची अनेक घरटी बघायला मिळतात. अशा जागांना ‘हेरोनरी’ असे म्हटले जाते.
एकदा पिल्लं झाली की, त्यांना खाद्य पुरवण्याची जबाबदारी पूर्णतः आईवडिलांची असते. हे काम युद्धपातळीवर सुरू असते. शिंपी, वटवट्या, बुलबुल सारखे लहान पक्षी तर तासाला सुमारे 16 ते 20 खेपा घालतात.
अन्नाच्या या धावपळीमुळे निसर्गाचे चक्र संतुलित रहात आहे. जीवसृष्टीस हानी न होण्याइतपत कीटकांची संख्या मर्यादित राखण्याचे काम, हे पक्षी आपली वीण, कीटकांच्या विणीबरोबरच राखून करतात. असे हे पक्षी आपापली वीण वर्षभरात वेगवेगळ्या वेळी करून निसर्गाचा तोल सांभाळतात. निसर्गाने जन्म आणि मृत्यूची योग्य सांगड घालून जीवसृष्टी संतुलित ठेवली आहे.
नेत्रा पालकर-आपटे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
तुमचा लेख मला प्रचंड आवडला. कमी शब्दात जास्त माहिती दिलीत. अचूकपणे लेखण केले आहे. सुंदर. फारच छान.