May 19, 2024
tukaram-is-a-sighted-sensitive-saint
Home » तुकाराम हे डोळस अन् संवेदनशील संत
मुक्त संवाद

तुकाराम हे डोळस अन् संवेदनशील संत

समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे. वैदिक पंडितांना, भोंदू साधू, बैरागी, पुजारी, बडवे वगैरेंना तुकारामांचे अभंगाचे चटके अधिकच दाहक वाटले. तरीही तुकारामांनी सत्य धर्म सोडला नाही.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर

तोवरि तोवर जंबुक करि गर्जना ।
जव त्या पंचानना देखिले नाही ॥१॥
तोवरि तोवरि सिंधु करि गर्जना ।
जव त्या अगस्ति ब्राह्मणा देखिले नाही ॥२॥
तोवरि तोवरि वैराग्याचा गोष्टी ।
जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥ ३ ॥
तोवरि तोवरि माळामुद्रांची भुषणे ।
जव तुक्याचे दर्शन झाले नाही ॥४॥
(२०११)

तुकारामांच्या या अभंगाचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी त्यांना तसे सांगण्याचा अधिकार का प्राप्त झाला याचे संक्षिप्त असे विवेचन पार्श्वभूमी म्हणून सांगणे उचित ठरेल. एक तर तुकाराम हे डोळस आणि संवेदनशील संत आहेत. अवती भवतीच्या सामाजिक परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत. समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये, त्रुटी त्यांना जाणवू लागल्या. धर्माच्या नावाखाली होणारा अन्याय, शोषण आणि नीतीची विटंबना त्यांच्या ध्यानात आली. बलवंत, प्रस्थापितांचे वर्चस्व आणि दरिद्री लोकांची दुर्दशा त्यांनी हेरली.

दुसरे म्हणजे संतत्वाची कसोटी त्यांनी स्वतःला लावली. जसे बोलायचे तसे वागायचे. ज्या गोष्टी करू नयेत असा इतरांना उपदेश करायचा त्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. तुकारामांच्या व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य होय. शिवाय सर्वसामान्यांचे शोषण करू शकणारे सावकारीचे जे साधन तुकारामांच्या हाती होते म्हणजे ती कर्ज खाते त्यांनी स्वत:हून बुडवून टाकली. ही कृतीच सर्वसामान्यांशी जवळीक साधणारी ठरली.

समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे. वैदिक पंडितांना, भोंदू साधू, बैरागी, पुजारी, बडवे वगैरेंना तुकारामांचे अभंगाचे चटके अधिकच दाहक वाटले. तरीही तुकारामांनी सत्य धर्म सोडला नाही. म्हणूनच या अभंगात तुकारामांनी जे सांगितले ते उच्चारण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी जीवनातील संघर्षात उडी घेऊन प्राप्त करून घेतला आहे. त्यांची भक्ती, त्याचा उच्चार म्हणजे अनुभवाच्या अग्नीत तावून-सुलाखून कसाला लागलेले बावन्नकशी सोने आहे.

दांभिक, शाब्दिक पांडित्य असलेल्यांनी तुकारामांवर हल्ला चढविला तरी ते घाबरत नव्हते व घाबरले नाहीत व स्वत:च्या नैतिकतेवर ठाम विश्वास असणाऱ्या त्यांच्या अहंकारी टीकेला ते सामोरे गेले, एवढेच नव्हे तर त्यांच्या धार्मिक, सामाजिक आणि मानसिक भ्रष्टाचारांविरुद्ध आवाज उठविला. त्यामुळे एक प्रकारचा निर्मळ भावस्पर्शी उमदेपणा त्यांच्यामध्ये आला होता. त्यामुळेच त्यांनी या अभंगात अहंकाराने नव्हे तर प्रांजळपणे आपले विचार मांडले.

जोपर्यंत वाघ दिसत नाही तोपर्यंत कोल्ह्याची गर्जना सुरू असते. वाघाची गर्जना एकदाची ऐकली की कोल्हेकुई लागलीच थांबते. कारण कुठे वाघ आणि कुठे कोल्हा । सिंधु गर्जना ही जोपर्यंत अगस्तीला पाहिले नाही तोपर्यंत असते. मात्र अगस्ती पाहिल्यावर सिंधुची गर्जना कुठल्या कुठे विरून जाते. तुकाराम महाराज म्हणतात की, जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीस पडली नाही तोपर्यंत वैराग्याचे व्याख्यान पण ती दृष्टीसमोर आली की वैराग्य पालापाचोळा समान होते. आपणच एकमेव शूरवीर ही बढाई तोपर्यंत चालते जोपर्यंत दुसऱ्या मातेच्या पोटी जन्मलेल्या शूराशी गाठ पडत नाही. त्याचप्रमाणे गंध-माळ-टिळा धारण करणाऱ्या भोंदूची महती ही लोक मानतात ते कुठपर्यंत? जोपर्यंत तुकारामांचे दर्शन होत नाही तोपर्यंतच! एकदा तुकाराम आणि भोंदू साधू समोरासमोर येऊ द्या. त्यांची गाठ पडू द्या. मग बघा त्यांची फजिती कशी होते, असे तुकाराम आत्मविश्वास व निर्धाराने म्हणतात.

अर्थ न जाणता केलेले वेदपठण हे कसे झाकून राहणार ? पठण करणाऱ्यांचा खोटेपणा लक्षात येणारच तसेच होत गेले. तुकारामांचे भजन, कीर्तन आणि आणि अभंग यांचा जसजसा अनुभव येऊ लागला तसतसे तुकारामांचे विलक्षण व्यक्तित्व लक्षात आले. ‘वेदांचा अर्थ आम्हासी ठावा’ असे तुकारामांचे उद्गार सार्थ ठरले. शूद्रांना वेदाचा अधिकार नाकारणारी व्यवस्था निमूटपणे स्वीकारलेली नव्हती, तिच्याविरुद्ध त्यांनी विद्रोह केला. वेदांचा अर्थ आम्हाला ठाऊक आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले. तुकारामांचे हे विचार म्हणजे त्यांनी वैदिक पंडितांना दिलेले विलक्षण आव्हान होते. वेदांपलीकडे जाणारा अर्थही आपल्या अभंगातून व्यक्त होतो असे ते म्हणतात.

अभंगातील एक ओळ म्हणजे ‘तोवरि तोवरि’ शूरत्वाच्या गोष्टी जब परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही । आपणच एकमेव शूरवीर ही बढाई तोपर्यंत चालते जोपर्यंत दुसऱ्या मातेच्या शूराशी गाठ पडत नाही. तद्वतच त्या गंध-माळ-टिळा धारण करणाऱ्या भोंदू साधूची महती कोठपर्यंत? जोपर्यंत तुकारामांचे दर्शन होत नाही तो पर्यंत । एकदा त्यांची व माझी गाठ पडू द्या, मग बघा कशी शोभा होते. त्यांची अशी भूमिका तुकारामांनी घेतली. यामागे अहंकार नसून वास्तवता आहे. कारण संत तुकारामांचे ज्ञान अनुभवावर आधारित आहे. येथे अनुभव हेच एकमेव सत्य. पोकळ आचार, उथळ विचार याची अवहेलना करीत सत्य धर्म, खरी भक्ती सांगणारे तुकाराम सर्वश्रेष्ठ ठरले.

ढोंगी साधूंच्या मागे समाजाने लागू नये असे तुकाराम कळकळीने विनवतात. कोल्ह्याची कोल्हेकुई, सिंधुची गर्जना, वैराग्याचे वैराग्य, शूर वीरांच्या गोष्टी या मुखाने ब्रह्मज्ञान सांगून जनलोकांची मान कापणे, फसवणूक करणे, बुवाबाजीचे अवडंबर माजवण्यासारखे आहे. या गोष्टी तुकारामांना अत्यंत निंदनीय वाटतात. त्यास आव्हान देण्यासाठी तुकारामांनी ईश्वरविषयक भक्तीविषयी कल्पना स्पष्टपणे मांडल्या. म्हणूनच ते सिंहाची गर्जना, अगस्ती, खऱ्या वैराग्याचे वैशिष्ट्यमुक्त व्यक्तित्व आणि श्रेष्ठ शूरवीर या वर्गीकरणास मोडणारे ठरले.

‘गर्जेल तो पडेल काय !’ असे आज जे म्हटले जाते ते तुकारामांच्या अभंगाची प्रचिती देणारे आहे. गारेची शोभा नसून हिऱ्याचा प्रकाश, सूर्योदयापूर्वीच दिव्यांची शोभा असे म्हणत तुकारामांनी आपले ज्ञान, अनुभव, वेदांपुढे जाऊन सांगितलेले तत्त्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचे असून मानवी कल्याणाचा विचार सांगितला. खरोखरच तुकाराम हे युगपुरुष आणि त्यांची स्पंदने मानवता, समता आणि जात- धर्मविरहित समाज, सामाजिक प्रणाली व सामाजिक अभिसरण अशीच म्हणावी लागतील.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर

Related posts

मन वृद्ध झाले तर शरीरालाही वृद्धत्व येते

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406