पुरस्काराचे मानकरी:
सुचिता घोरपडे, नितीन दीक्षित, डॉ. रवींद्र श्रावस्ती, मिलिंद चव्हाण, संतोष जगताप आणि ममता बोल्ली.
सातारा : येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने 2024 या वर्षीचे साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये सुचिता घोरपडे ( पुणे ), नितीन दीक्षित ( सातारा ), डॉ. रवींद्र श्रावस्ती ( सांगली ), मिलिंद चव्हाण ( पुणे ), संतोष जगताप ( सांगोला – सोलापूर ), ममता बोल्ली ( सोलापूर ) आदी मान्यवर साहित्यिक, कलावंतांचा समावेश आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.
प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हे पुरस्कार दिले जातात. पंचवीस तीस वर्षे सातत्याने आपल्या क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींची यासाठी निवड करण्यात येत असून त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. वीस हजार रुपयांचे चार व दहा हजार रुपयांचे दोन असे हे एकूण सहा पुरस्कार आहेत. या आधी चार वर्षे पस्तीस हजार रुपयांचे दोन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासह पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे.
यावर्षीचे जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –
वीस हजारांचा धनादेश, मानचिन्ह, शाल,फुल,सातारी कंदी पेढे या स्वरूपाच्या पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध कथाकार, ललित गद्य लेखक सुचिता घोरपडे यांना कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार, प्रसिद्ध नाट्य सिने लेखक, दिग्दर्शक नितीन दीक्षित सातारा यांना प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कार, संत साहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक, भाष्यकार डॉ. रवींद्र श्रावस्ती, सांगली.यांना डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक मिलिंद चव्हाण, पुणे. यांना हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवोदितांसाठी दहा हजारांचा धनादेश, मानचिन्ह, शाल, फुल, सातारी कंदी पेढे या स्वरुपाचे पुरस्कार यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कवी, कादंबरी लेखक संतोष जगताप, सांगोला- सोलापूर यांना राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार आणि प्रख्यात एकांकिका, नाट्य लेखक, कलावंत आणि दिग्दर्शक ममता बोल्ली, सोलापूर. यांना पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संबोधी प्रतिष्ठान – साताराचे उपाध्यक्ष रमेश इंजे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी (गुरूवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी ) संध्याकाळी साडे सहा वाजता पाठक हाॅल, नगर वाचनालय, सातारा येथे आयोजित केलेल्या विशेष समारंभात होणार आहे. पुरस्कार निवडीचे काम प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रख्यात समीक्षक डॉ. गजानन अपिने ( पुणे ), प्रख्यात समीक्षक डॉ. दत्ता घोलप ( वाई ) आणि कवी, साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे, सातारा यांच्या समितीने पाहिले.
प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये प्रख्यात कवी, अनुवादक डॉ. विजय चोरमारे, ॲड. श्रेयस कोळेकर, कराड, ज्योत्स्ना पाटील-शिंदे,मुंबई आणि सातारचे कवी,गझ़लकार वसंत शिंदे यांचा समावेश आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.