आत्मबोध होतो तरी कसा ?
ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे अस्तित्व प्रकट करत राहाते. फक्त आपण जागरूक असायला हवे तरच त्याचा बोध आपणास होतो. या बोधाने सर्व अज्ञान निघून जाते. अन् केवळ बोधच शिल्लक राहातो. ज्ञानच शिल्लक राहाते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ९०११०८७४०६
जो आत्मबोध युक्त । होऊनि असे सततु ।
जो माते हृदया आंतु । विसंबेना ।। ३१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो, त्याचप्रमाणे मला अंतःकरणात कधी विसरत नाही.
मी कोण आहे ? याचा बोध म्हणजे आत्मबोध. माणूस स्वतःलाच विसरला आहे. त्यामुळे त्याचे जीवन हे अस्थिर झाले आहे. निरंतर त्याची भटकंती सुरू आहे. स्वःची ओळखच विसरल्याने कितीही भौतिक विकास झाला तरी त्यात त्याला समाधान वाटत नाही. विज्ञानाने तो जगाचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. सृष्टीच्या निर्मितीचा तो शोध घेत आहे. यातून नवनवे शोध सातत्याने लागत आहेत आणि त्यातच तो गुंतून पडला आहे. स्व च्या शोधातच याचे उत्तर आहे यासाठी स्वतःपासून याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा, पण तसे होत नसल्यानेच त्याची भटकंती ही सुरूच आहे.
भौतिक विकासाने त्याचे समाधान होत नाही. कारण तो विकास शाश्वत नाही. शाश्वत विकासात सुख, शांती, समाधान आहे याची जाणिव त्याला होणे गरजेचे आहे. ही जाणिव म्हणजेच आत्मबोध आहे. आत्मबोधातच सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य दडलेले आहे. त्याच्यामध्ये जो आत्मा आहे. तो या सृष्टीत सर्वत्र सामावलेला आहे. सर्वत्र त्याचेच अस्तित्व आहे. या बोधापासून तो वंचित राहीला आहे. स्वःचा शोध जेंव्हा सुरू होईल तेंव्हाच त्याला या सृष्टीचा बोध होईल. यासाठीच आत्मबोध हा महत्त्वाचा आहे.
हा बोध कशामुळे होतो ? अन् केंव्हा होतो ? आत्मा ही एक उर्जा आहे. उर्जेचा नियम आहे. उर्जा कधीही नष्ट होत नाही. ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत होते. ही उर्जा अदृश्य आहे. ती डोळ्यांना दिसत नाही. आत्मा हा सुद्धा अदृश्य आहे. केवळ त्याचा बोधच होतो. देहात आलेला आत्मा हा देह नष्ट झाल्यानंतर नष्ट होत नाही. तो अन्य प्रकारात रुपांतरीत होतो. पूर्णजन्म, अवतार हे यातूनच होत आहेत. एखाद्या स्थूल वस्तूत तो आला तर त्या वस्तूत जीवंतपणा येतो. सर्वामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. त्यामुळे आत्मा त्रास देतो या सर्व अंधश्रद्धा आहेत असे मला वाटते. आत्मबोधासाठी तो आतूर असतो त्यातून तो आपणास त्रासदायक वाटतो, पण आत्मबोधानंतर तो केवळ सुखच सुख देतो. त्याच्यातून आनंद ओसंडून वाहत राहातो. या आनंदाने तो इतरांनाही आनंदी करतो.
ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे अस्तित्व प्रकट करत राहाते. फक्त आपण जागरूक असायला हवे तरच त्याचा बोध आपणास होतो. या बोधाने सर्व अज्ञान निघून जाते. अन् केवळ बोधच शिल्लक राहातो. ज्ञानच शिल्लक राहाते. अज्ञानातून ज्ञानाकडे होणारा हा प्रवास केवळ बोधाने संपतो. यासाठी मी कोण आहे या बोध सर्वांनी घ्यायला हवा. बोधानेच ज्ञान प्राप्ती होते. बोधाने होणाऱ्या सर्व चुका दूर सारल्या जातात. स्वः चा विकास हाच खरा विकास आहे. स्वतःला जाणणे हाच आत्मबोध आहे. या आत्मबोधाने प्रत्येकाने आत्मज्ञानी व्हायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.