January 28, 2023
Myuratai Deshmukh remarkable work in social and literary fields
Home » सामाजिक अन् साहित्यिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या मयुराताई
मुक्त संवाद विशेष संपादकीय

सामाजिक अन् साहित्यिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या मयुराताई

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज प्रा. मयुराताई देशमुख यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..७

अमरावती जिल्ह्यातील शिरखेड हे प्रा. मयुराताई देशमुख यांचे माहेर. वडील, भाऊ सारे स्वातंत्र्य सैनिक. यातूनच समाज व देशासाठी काही करण्याचे संस्कारांचे बीज बालपणीच मयुराताईंच्या मनात रोवले गेले. ताईंचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे लग्न इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख सरांचे भाऊ मोरेश्वर देशमुख यांच्याशी झाले. काहीजण लग्नानंतर शिक्षण बंद, नोकरी नको असे म्हणतात पण ताईंच्या सासऱ्यांची अट हीच होती की पुढे शिक्षण चालू ठेवावे.

ताई सांगतात, ‘प्रा. मा. म. म्हणाले, दागिने घालून मिरवायचे नाही. शिक्षणाचा दागिना मिळव.’ ‘ नव्या नवरीचे कौतुक करण्यापेक्षा हे वेगळं काहीतरी मी ऐकले होते, हे शब्द त्यावेळी माझ्या निरागस मनाला लागले आणि मनोमन गाठ मारली की,आपल्याला पुढे शिकायचेच आहे.’

ताईंचे पती नक्षलवादी भागातील गडचिरोलीला होते. स्वभाव एकदम कडक असल्याने दर दोन वर्षांनी बदली ठरलेली. अशात ताईंनी बी ए पूर्ण केले. देशमुख साहेबांनी एकदा नक्षलवाद्याला कंठस्नानही घातले आहे आणि एकदा ते वाचलेले पण आहेत. ताई सतत टांगती तलवार घेऊन अमरावतीला मुलांसह राहात होत्या. अर्ध्याहून अधिक संसार ताईंनी प्रेमपत्र लिहून केला.. एकदा साहेबांनी पत्रात,’जर उद्या माझे ऑन ड्युटी काही कमी जास्त झाले तर तू काय करणार ? मुलांना मोठे कसे करणार? मी शहीद झालो तर , मला अडीच लाख मिळतील…’असे काही लिहिले..हे वाचून ताईंनी मनावर दगड ठेवून अश्रू थांबवले.

पण असे खरेच काही झाले तर… शिक्षण घेणे गरजेचे आहे असे ठरवून शिवण क्लास केला, एम. ए. पूर्ण केले. अमरावतीला प्राद्यापक म्हणून एक दोन वर्षे नोकरी केली. परंतु पतीच्या बदल्या आणि मुलांच्या उच्च शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे नोकरी सोडली. याच दरम्यान आवड म्हणून नॅचरोपॅथी डॉक्टर एन .डी . केले. पण त्याचीही पुढे प्रॅक्टिस केली नाही. मुले थोडी मोठी झाल्यावर सामाजिक कार्याची आवड असल्याने बडनेरा येथे पोलीस स्टेशनमध्ये महिलांचे पहिले रक्तदान शिबिराचे आयोजन केले. मग ताईंनी मागे वळून पाहिलेच नाही. पोलीस स्टेशनला किंवा घरी कोणी आले तर चहापाणी ,नाश्ता, स्वयंपाक करत राहणे हे काम ताई करत होत्या. पण त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल तेथील एका साहेबांना घेतली. ‘तुम्ही किती दिवस चहापाणी करत राहणार आपण आयुक्तस्तरीय महिला समुपदेशन कार्य करावे’ असा सल्ला त्यांनी ताईंना दिला.

सध्या ताई दहा पोलीस स्टेशनवर समुपदेशन करतात. तसेच विभागीय आयुक्तालय विशाखा समितीवर समुपदेशक, दूरसंचार समिती विभागीय आयुक्तालय, भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर कार्यरत आहेत. सन १९९२ दरम्यान ताई जिजाऊ ब्रिगेडच्या अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष झाल्या. जिजाऊंच्या कार्याचे व्रत घेऊन ताईंचा झंझावात सुरु झाला. मोर्चा, आंदोलने, निषेध सभा, निवेदने व समाजहिताचे कार्यक्रम असे सारे सुरू झाले.

दोन मुस्लीम गटात मारामारी, खूनसत्र अमरावतीत झाले तेव्हा ताईंनी जिजाऊ ब्रिगेडतर्फे काढलेला सलोखा मार्च हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरला. ताईंच्या सामाजिक कार्यामुळे साहेबांच्या एकूण तीन वेळेस बदल्या झाल्या. पण बदल्या होऊनही न हरतां मुलांच्या साथीने ताई सतत कार्यरत राहिल्या. सामाजिक व राजकीय क्षेत्र दणाणून गेले, राजकीय संधीपण आल्या पण राजकीयदृष्ट्या ताईंना कधीच त्यामध्ये रस दाखवला नाही.

आज सामाजिक क्षेत्रामध्ये मयुराताई देशमुख हे नाव अतिशय आदराने सन्मानाने घेतले जाते. ताईंनी सर्व जाती, धर्म, गट, तट , याच्यापलीकडे सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. ताईंनी आज आंतरराष्ट्रीय संघटक म्हणून भारत देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वतः जाऊन जिजाऊ ब्रिगेडची उभारणी केली आहे. तसेच अमेरिका, कॅनडा, सिंगापूर ,थायलंड ,मॉरिशस, लंडन इथे स्वतः आंतरराष्ट्रीय संघटक म्हणून जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केलेली आहे .

‘हे सर्व करीत असताना अनंत अडचणी येतात पण याच अडचणी आपल्याला यशाचा मार्ग दाखवत असतात. जिजाऊ-सावित्रीला किती अडचणी आल्या किती त्रास सहन करावा लागला.. हे चित्र डोळ्यासमोर येतं आणि अधिक जोमाने कार्य करण्याची शक्ती मिळते.’ असे ताई अगदी हसत हसत सांगतात.

पोलीस कुटुंबियांसाठी मॉं जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, कॅाम्प्युटर क्लासेस मोफत सेवा म्हणून चालवतात. यातून अनेक महिला उद्योजक बनत आहेत. सोबतच बचत गट, योगा, कुकिंग, कल्चरल, महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी गॅदरिंग, पोलिस बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन, पोलिसांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन इ. उपक्रम सुरु आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना अमरावती जिल्ह्यात आसेगाव पूर्णा येथील वेलकी मठातील अश्लील चाळे करणाऱ्या मुरली महाराज यांचा भांडाफोड तसेच त्यांच्या गुप्त खोल्याचा शोध घेऊन गजाआड करण्यात आले आणि आश्रमाला कायमचे टाळे लावण्यात आले यात ताई अग्रेसर होत्या. यवतमाळ येथे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत होते. या विरोधीत अनेक आंदोलने ताईंच्या नेतृत्वाखाली झाली.

पुण्यातील सावित्रीबाई फुले यांच्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारक होण्यासाठी ताईंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून उपोषण केले. अशा अनेक आंदोलन प्रसंगी ताईंवर अनेक गुन्हे दाखल झाले. एका प्रसंगात तर जवळपास अडीच वर्षे खटला चालला.

‘परंतु हे सर्व करत असताना, सामाजिक घटकांना न्याय देत असताना एक प्रचंड आत्मिक समाधान मिळतं कारण आपली बाजू जेव्हा सत्याची असते तेव्हा हीच सत्याची बाजू नेहमीच ऊर्जावान ठरते हा माझा अनुभव आहे.’ असे ताई शांतपणे सांगतात. ‘आयुष्याच्या या सर्व धावपळीत मात्र एकत्र कुटुंबाचा आम्हाला कधीच आनंद घेता आला नाही.’ असेही म्हणतात. पोलीस फोर्स मध्ये घेतलेली शपथ ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या वचनाला ताईंचे पती निग्रहाने निभावत होते. त्यात ताईंनी व मुलांनी कधीच व्यत्यय आणला नाही.

अनेकदा अटीतटीचे प्रसंग आले पण ताईंनी अगदी नीडरपणे साहेबांची पत्नी शोभेल असे निर्णय घेतले. मुलांचे शिक्षण ,नोकरी , लग्न, लहान मोठे आजारपण, नातेवाईक असे संसारिक व सामाजिक घडामोडींचे वेळप्रसंगी, परिस्थितीनुसार हे सारं पाहिलं. सध्या ताईंचे पती डीवायएसपी म्हणून पोलीस विभागातून निवृत्त झालेले आहेत. ताईंना दोन मुली व एक मुलगा, तिघेही उच्चशिक्षित आहेत. मुली आपापल्या संसारात रममाण आहेत. ताईंनी दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह केले आहेत. वैचारिक क्रांतीमुळे त्या समाजाच्या दोन पावले पुढचा विचार करतात.

मयुराताई सामाजिक व साहित्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे तरंग(काव्य), स्मृतिगंध, राजाचा न्याय, जन्म तेजस्विनीचा, फुलोर(काव्य), जिजाऊंची बखर(काव्य) असे साहित्य प्रकाशित आहे. त्यांनी अनेक साहित्य व कवी संमेलनात सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानासाठी मॅा अहिल्याबाई होळकर स्त्रीरत्न पुरस्कार (इंदुर), राज्यस्तरीय समाजभूषण, जागतिक महिला दिन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा २००४-०५ मधे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. नोकरी नाही केली तर आयुष्यात आपण खूप काही करू शकतो हा विश्वास ताई अनेक महिलांना देतात. अशा या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!!

Related posts

Neettu Talks : तरुण दिसण्यासाठी हे करा बदल…

शुन्यातून स्वतः चे विश्व निर्माण करणारा नवनाथ

गोंधळ

Leave a Comment