January 26, 2025
reading movement article by ramesh salunkhe
Home » निगा न करी ग्रंथांची । तो एक मूर्ख
विशेष संपादकीय

निगा न करी ग्रंथांची । तो एक मूर्ख

वाचनसंस्कृती वृद्धींगत होण्यासाठी लेखमाला – भाग ४

जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींना आर्थिकबाजूचा स्पर्श झाला आहे. केवळ स्पर्शच नव्हे तर पैशासाठी कोणतीही गोष्ट माणसाकडून कोणत्याही थराला जाऊन खेचून घ्या, नाही दिले तर हिसकावून, ओरबाडून, दमदाटी करून प्रसंगी ग्राहकाचा जीव घेऊन मिळवा; ही वृत्ती चांगलीच तग धरू लागली आहे. वाचन संस्कृतीवर या अशा जागतिकीकरणाचा खूपच अनिष्ठ परिणाम होऊ लागला आहे. जागतिकीकरण हे मुळात आर्थिक असेल तर त्याचं आक्रमण सांस्कृतिक स्वरूपाचं आहे. ते आपल्या भाषा, साहित्य, इतिहास या साऱ्यांनाच सुरूंग लावू लागले आहे.

रमेश साळुंखे.
प्रमुख, मराठी विभाग, देवचंद कॉलेज, अर्जुननगर
जि. कोल्हापूर. मोबा. 9403572527

आपले वाचन दुदैवाने केवळ वर्तमानपत्रापुरते मर्यादित राहिले आहे. अशा प्रकारचे वाचन तरी आपल्या समाजात कितपत गांभिर्याने केले जाते याबाबत शंकाच आहे. ‘‘केवळ वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे शुष्क पांडित्य चोहोकडे माजून खऱ्या विद्वत्तेचा लोप होतो.’’ असे एक महत्त्वाचे निरिक्षण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पूर्वीच नोंदवून ठेवले आहे. आपल्या घरात किती वर्तमानपत्रं येतात ? कोणती वर्तमानपत्रे आपल्या घरात आपण घेतो ? त्यातले काय आणि कितपत वाचले जाते ? चांगली मासिकं, साप्ताहिकं यांचे किती वर्गणीदार आहोत आपण ? अशाप्रकारच्या वाचनाकरिता दिवसभरातला कितीसा वेळ देतो आपण ? यासंदर्भातलाही कमालीचा निरूत्साह आपल्या आसपास प्रखरपणानं दिसू लागला आहे. उत्साहानं सुरू केलेली कितीतरी चांगली मासिकं-साप्ताहिकं बंद करावी लागली आहेत. हे असले अक्षर शत्रूत्व आपल्याला परवडणारे नाही. अशांची गणना रामदासांनी ‘अक्षरे गाळून वाची। कां ते घाली पदरीची। निगा न करी ग्रंथांची । तो एक मूर्ख।। ’ अशा शब्दांत केली आहे.वाचनाचे संस्कार घडविण्याच्या, नवे वाचक तयार करण्याच्या सुंदर जागा म्हणून शाळा महाविद्यालयांकडे पाहिले जाते. इथेही अपवाद वगळता चांगल्या साहित्यकृती, संदर्भग्रंथ न वाचणारे, नवी पुस्तके विकत न घेणारे, घरातल्या वर्तमानपत्रांना सोयीस्कर काट मारून कंजूसपणाने शाळा महाविद्यालयातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या उभ्याउभ्याच वाचणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. आपल्याच वाचनाची ही दशा तर मग मुलांच्या वाचनाची तर बातच सोडा. याचे किती गंभीर परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने भावी पिढ्यांवर होणार आहेत, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ अजूनही येऊन ठेपलेली नाही का ? तर ‘शाळा महाविद्यालयातही वाचनाच्या संदर्भातील परिस्थिती आशादायक नाही. ‘शाळा महाविद्यालयातही ज्ञानविन्मुखता, अव्यवहार व असंस्कृतता’ हे गुण वाढू लागल्याचे निरिक्षण ग्रंथ प्रकाशक अरूण जाखडे यांनी नोंदविलेले आहेत. संदर्भग्रंथांकडे तर आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे; हे मान्यच करावे लागेल. बाजारात तयार मिळणारी गाईड्स अथवा तत्सम नोट्सवर गुजराण करणाऱ्या शिक्षकांची पिढी वाढू लागली आहे. हे जर असेच सुरू राहिले तर, ती आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ज्ञान व्यवहाराकरिता धोक्याची घंटा ठरणार यात शंकाच नाही.आपल्या वाचन संस्कृतीचा विचार करता प्रकाशक, वितरक, जाहिरातदार यांचाही विचार करणे आवश्यक आहे. पुस्तकांची खरेदी विक्री हा एक उद्योग-व्यवसाय आहे. आणि ते मान्यच करावं लागेल. तथापि इतर अनेक उद्योगांपेक्षा या उद्योग-व्यवहाराचे स्वरूप निराळे आहे; हे आपण घ्यानात घेतले पाहिजे. इथे केवळ आर्थिक लाभालाभाचा विचार नसावा. आर्थिकतेसोबतच सामाजिक जाणिवांची अभिव्यक्ती, इतिहास-साहित्य-समाज आणि संस्कृतीच्या मूल्यांची रूजवणूक चांगल्या साहित्याच्या आदानप्रदानाने समाजात होत असते. ग्रंथ व्यवहारासोबत नितिमत्ता, पुस्तकांविषयीची आत्मियता, लेखकाचा उचित सन्मान या बाबीही महत्त्वाच्या आहेत. जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींना आर्थिकबाजूचा स्पर्श झाला आहे. केवळ स्पर्शच नव्हे तर पैशासाठी कोणतीही गोष्ट माणसाकडून कोणत्याही थराला जाऊन खेचून घ्या, नाही दिले तर हिसकावून, ओरबाडून, दमदाटी करून प्रसंगी ग्राहकाचा जीव घेऊन मिळवा; ही वृत्ती चांगलीच तग धरू लागली आहे. वाचन संस्कृतीवर या अशा जागतिकीकरणाचा खूपच अनिष्ठ परिणाम होऊ लागला आहे. जागतिकीकरण हे मुळात आर्थिक असेल तर त्याचं आक्रमण सांस्कृतिक स्वरूपाचं आहे. ते आपल्या भाषा, साहित्य, इतिहास या साऱ्यांनाच सुरूंग लावू लागले आहे. परात्मता, मनोविकृती, संवादहीनता, व्यसनीपणा, आभासी वास्तवात जगणे, नातेसंबंधांमधील दुरावा, प्रबोधनाच्या चळवळींचा ऱ्हास, पर्यावरणाचे प्रश्न… प्रत्येकजण जागतिकीकरणाचाबळी ठरतो आहे. आणि हे सगळे नेमके काय चालले आहे, असा प्रश्नही आपणास आजकाल पडेनासा झाला आहे. हे सारे नीट समजून घ्यायचे असेल; तर वाचनाला पर्याय नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित केले पाहिजे.

सुदैवाने आजही मोजक्याच वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये, दररोज प्रकाशित होत असलेल्या अनेकविध पुस्तकांमध्ये खूप सारं आजच्या तथाकथित भवतालाबद्दल लिहिलं जातं आहे. ते समजून घेतलं पाहिजे. हे सारं वाचून समजून घेतलं तर जागतिकीकरण म्हणजे काय ? आणि ते आपली काय दशा करून ठेवतं आहे; हे समजण्यास मदत होऊ शकेल. त्यातूनच शांत, सुंदर आणि समाजाभिमूख जगण्याची दिशा मिळू शकेल. कारण प्रत्येकजण जागतिकीकरणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बळी ठरू लागला आहे. आपलं जगणं इतकच काय सर्वसामान्य माणसांचं मरणंही आपल्या हातात राहिलेलं नाही.

वेळच नाही मिळत वाचायला, स्वत:कडे पहायला; असं म्हणत राहणं हे अर्धसत्य आहे. पळवाट आहे ही स्वच्छ. ठरवून निश्चयपूर्वक काढला तर ग्रंथ वाचनाला वेळ मिळतोच मिळतो. त्यामुळं आपल्या अल्याड पल्याडचं प्रकाशित झालेलं चांगलं साहित्य वाचलं पाहिजे. इतरांना वाचण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतीचित्रं, वाचू आनंदे यासारखी माधुरी पुरंदरे यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं, शिवाय शामची आई अशी पुस्तक ग्रेटच आहेत. पण समाज, भाषा, भवतालातलं वास्तव सतत बदलत असतं, त्याचं प्रतिबिंबही इतर अनेक पुस्तकांमध्ये पडलं आहे, तेही वाचलं पाहिजे.

उत्तम वाचकांची शेकडो उदाहरणं अगदी सहजपणानं देता येतात. यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, गोविंदराव तळवळकर, अरुण कोल्हटकर, सतीश काळसेकर यांचं वाचन सर्वश्रृत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ एका पत्र्याच्या खोलीत मित्रांसमवेत बसून सलग तीन दिवस वाचून करून पूर्ण केला होता. सतीश काळसेकर दिवसाचे 14-14 तास वाचन करीत असत, असेही अनेक जाणकारांकडून सांगितले जाते. अशा कितीतरी चांगल्या वाचकांचा आदर्श आपण नाही का घेऊ शकत ? कारण ‘आपल्या मर्यादित वर्तुळाच्या बाहेर जाण्यात मित्रांचा आणि वाचनाचा फार मोठा वाटा असतो.’ असे प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अरूण खोपकर म्हणतात, ते खरंच खूप खरं आहे.



वाचनमूल्यांची थोरवी सांगणारा ‘ग्रंथाला दिली ओसरी’ हा एक सुंदर लेख आहे गो. पु. देशपांडे यांचा. त्यात त्यांनी म्हणून ठेवले आहे, ‘‘पुस्तके वाढावीत आणि त्यांच्यापुढे आपण लहान व्हावे; हे मला मनापासून आवडते.’’ शिवाय त्यांनीच असेही लिहून ठेवले आहे, ‘‘सूरकाम्प म्हणून जर्मनमधील एक अग्रेसर प्रकाशन संस्था. त्यांची पुस्तकं चांगली असतात. एवढेच नव्हे तर एखाद्या पुरंध्रीसारखी दुसऱ्याला विद्ध करणाऱ्या आपल्या देखणेपणाची जाणीव असलेली असतात. पुस्तकांवरचे प्रेम आणि स्त्रीवरचे प्रेम दोन्ही फार छळणारी असतात, हा त्याचा अर्थ.’’ असे सुंदर विधान ते ग्रंथ व्यवहारासंदर्भात करतात. या आणि अशा अनेक सुंदर विधानांचा प्रत्यय घेण्यासाठी आपण वाचनाकरिता सवड नको का काढायला ?

कुठून कुठपर्यंत आलो आहोत आपण ! असो, एव्हाना आपले राजाभाऊ शिंदे हे आयुष्यभर ग्रंथालयाचे काम इमाने इतबारे करून सेवानिवृत्त झाले असतील. काय करत असतील ते ? त्यानं घरी बोलवलं आहे आपल्याला. चहाच्या निमित्तानं गेलं पाहिजे एकदा त्याच्या घरी. बोललं पाहिजे त्याच्याशी भरभरून.

कधी वेळ मिळेल ? कधी सवड मिळेल ?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading