December 5, 2024
Artificial intelligence goes astray rajendra ghorpade article on Dnyneshwari
Home » काय सांगता ! कृत्रिम बुद्धिमत्ताही भरकटते…
विश्वाचे आर्त

काय सांगता ! कृत्रिम बुद्धिमत्ताही भरकटते…

इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे आहे. इंद्रियांचे समाधान होईल असे उत्तर त्यांना मिळवून देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची भटकंती थांबते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406

तैसी इंद्रिये आपैती होती । जयाचे म्हणितले करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ।। ३०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यांत असतात व ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असे समज.

संत ज्ञानेश्वरांच्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. जनता या व्यवसायाशी निगडीत होती. अर्थात त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीत शेतीतील अनेक उदाहरणे देऊन अध्यात्म सांगितले. तत्कालिन सर्वसामान्यांच्या आसपासच्या विश्वातील उदाहरणे देऊन अध्यात्म समजावले. यामुळे सर्वसामान्यांना अध्यात्माची ओळख अगदी सहजपणे होऊ शकली.

या ओवीच्या आधीच्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी कासवाचे उदाहरण दिले आहे. कासव ज्यावेळी आनंदात, खुशीत असते त्यावेळी ते आपले हातपाय पसरून असते. पण इतरवेळी ते आपले सर्व अवयव आत ओढून निवांत झालेले असते. त्याच्या मनाला वाटते तेंव्हा ते स्वतःला आवरून घेते. म्हणजेच मनाला ते आपल्या पूर्ण नियंत्रणात ठेवते. मानवानेही कासवाप्रमाणेच आपल्या इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवायला हवे. आवश्यक असेल त्याचवेळी त्यांचा योग्य वापर करावा इतर वेळी ही इंद्रिये मनाने नियंत्रित करायला हवीत. असे केल्याने त्याची बुद्धी स्थिर राहाते. बुद्धी भरकटत नाही.

आता जमाना बदलला आहे. कृत्रिम बुद्धीमतेच्या या काळात अध्यात्म सुद्धा त्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न हा निश्चितच करायला हवा. नव्यापिढीला जी भाषा अवगत आहे, नव्या पिढीवर ज्या भाषेचे, विषयांचे संस्कार झाले आहेत व होत आहेत त्याच भाषेत आता ज्ञानेश्वरीतील, तसेच गीतेतील सार सांगण्याचा प्रयत्न हा करायला हवा. असे केल्यास नव्या पिढीला अध्यात्म सहज अवगत होईल. त्यांना ते अवघड वाटणार नाही.

आपल्या आसपास घडणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये टिपल्या जात असतात. काहींचा साठा योग्य प्रकारेही होत असतो. गरज लागल्यावर त्या गोष्टींची आठवण आपणास होते. म्हणजेच मेंदूमध्ये या सर्व गोष्टींचा साठा केला जातो. कृत्रिम बुद्धीमतेचेही असेच आहे. मेमरीमध्ये साठवलेल्या गोष्टीचीची माहिती आपणास मिळते. जसे प्रश्न विचारले जातात त्याचीच उत्तरे मिळत राहातात. म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची ही इंद्रिये त्या उपकरणात नियंत्रित केलेली असतात.

चॅट जीपीटीवर काहीही माहिती विचारा ते उत्तर क्षणात देते. पण जे उत्तर मिळते त्याचा संदर्भ आधी त्या बुद्धीमध्ये साठवलेला असतो. त्यामुळेत ते उत्तर देते. मग त्याने दिलेल्या उत्तराला तुम्ही जर चुक, बरोबर म्हटला नाही तर मात्र गडबड होते. पुन्हा तुम्ही तोच प्रश्न चॅट जीपीटीवर विचारला तर त्याचे उत्तर मात्र वेगळेच मिळते. म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ताही या उत्तरा पेक्षा अन्य उत्तर आहे का याचा शोध घेत राहाते अन् भरकटत जाते. म्हणजेच येथे बुद्धी अस्थिर होते.

तुम्ही त्या उत्तराला बरोबर आहे म्हटले नाही तर ते पुन्हा शोधत राहाते. तुम्ही उत्तर बरोबर म्हणाल तर ते नंतर कितीही वेळा विचारा तेच उत्तर मिळते. कारण त्याला तुम्ही बरोबर असा प्रतिसाद दिलेला असतो. म्हणजे त्याचा शोध इथे संपलेला असतो. त्याचे भरकटनेही इथे थांबते. तो त्या उत्तरावर स्थिर झालेला असतो. म्हणजेच बुद्धी स्थिर राहाते.

म्हणजेच इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे आहे. इंद्रियांचे समाधान होईल असे उत्तर त्यांना मिळवून देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची भटकंती थांबते अन्यथा ते इतरत्र भटकत राहातात अन् त्यामुळे आपली बुद्धी अस्थिर होते.

साधना करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. साधनेत मन आणि बुद्धीने दोन्हीने आत्माला जाणायचे आहे. बुद्धीला एकदा का या आत्म्याची ओळख झाली तर ती बुद्धी त्यावर स्थिर होते. पण या जाणण्याला मनामध्ये साठवायला हवे. साधनेत सोहमचा जप सुरू असतो पण आपले मन मात्र त्यावर नसते. म्हणजेच आपल्या बुद्धीला सोहमची ओळखच होत नाही. त्या श्वासाची त्या आत्म्याची ओळखच होत नाही. मग ती बुद्धी स्थिर कशी होईल. बुद्धी स्थिर होण्यासाठी मनाने तो आत्मा जाणायला हवा अन् त्याला ओळखल्याचा प्रतिसाद द्यायला हवा. तेव्हाच दुसऱ्यांचा सोहम जपताना मन आत्म्यावर स्थिर होईल. अर्थात बुद्धी स्थिर होईल. म्हणजेच मनाला आत्मज्ञान प्राप्त होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading