कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच काय खावे अन् काय खाऊ नये याचे नियम तयार केलेले असावेत.
राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जैसा अमृताचा निर्झरू । प्रसवे जयाचा जठरू ।
तया क्षुधेतृषेचा अडदरू । काहींचि नाही ।। ३३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो, त्याला तहानभुकेची भीति कधी नसते.
पोटाची भूक माणसाला अस्वस्थ करून सोडते. असे म्हणतात की मनुष्य प्रथम झाडाची फळे अन् शिकार करून जगत होता. जोपर्यंत तो शिकार करून खात होता तोपर्यंत त्याच्यात हिंस्रपणा अधिक होता. पण जेंव्हा तो पेरून खायला शिकला अर्थात शेती करून पिकवून पोट भरू लागला तेंव्हा मात्र त्याच्यात माणूसकी आली. याचाच अर्थ पोटाची भूक प्रत्येकाला अस्वस्थ करते. आयते खायला मिळत होते तो पर्यंत त्याची मानसिकता हिंस्रपशू प्रमाणे होती. पण जेंव्हा तो कष्ट करून अर्थात शेती करून जगू लागला त्यानंतर त्याच्यात माणूसकी आली. म्हणूनच कदाचित कृषि मुलश्चः जीवनम् म्हणत असावेत. माणूसकीच्या जीवनाची सुरूवात शेतीतून अर्थात कष्टातून होते. स्वावलंबन हे सुद्धा यासाठीच असावे.
कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच काय खावे अन् काय खाऊ नये याचे नियम तयार केलेले असावेत. सुगरणीची मानसिकताही त्या जेवणात उतरते असे म्हणतात. खाल्लेल अंगाला कधी मानवते कधी मानवत नाही हे सर्व या मानसिकतेतूनच घडत असावे. यासाठीच आहाराचे नियम पाळण्याची गरज आहे. प्रसन्न भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर मनाची प्रसन्नताही उत्तम राहाते.
यातूनच साधनेचे महत्त्वही अधोरेखित होते. साधना केल्यानंतर भूक चांगली लागते. असे का होते ? शास्त्राचा विचार करता साधनेमध्ये पित्ताचे विकार कमी होतात त्यातून भूक वाढते. साधनेमध्ये सकारात्मक विचार वाढत जातात. सकारात्मक उर्जेचा उगम जठरातून होतो. ही उर्जा आपली मानसिकता उत्तम ठेवते. अर्थातच आपली तहानभुकेची चिंताच संपते.
सध्याच्या युगात साधनेला महत्त्व हे यासाठीच आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत आपण कोठेही जेवतो, कोणतेही पदार्थ खातो. भुक भागवण्यासाठी आपणाला ते खावे लागते. अशाने आपल्या शारिरीक आरोग्यावरही परिणाम होत आहे. पण कामाच्या व्यस्ततेत हे सर्व आपण विसरून जातो. इतके काम आपण का करतो याचा कधीतरी विचार आपण करायला हवा. आपण कमावतो कशासाठी ? पोटाची भूक भागविण्यासाठी जर हे सर्व असेल तर आपण प्रथम त्याचा विचार करायला नको का ?
या पोटातच जर अमृत तयार करता आले तर सर्व चिंताच मिटेल ना ? साधनेतून पोटात अमृत तयार होते. साधा विचार करा. साधनेच्या काळात पोटातील वायू बाहेर पडतो. तो नियंत्रणात येतो. वायू, अपचन, अति आम्लता आदी सर्वावर साधनेमुळे नियंत्रण मिळवता येते. साधनेने तृप्तीचे ठेकरही येतात. पण यासाठी साधना उत्तम प्रकारे व्हायला हवी. नियमित साधनेने अन् अनुभवातून पोटात अशाप्रकारे अमृत तयार करून आत्मसंपन्नता मिळवता येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.