राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते.
– डॉ. द. ता. भोसले
संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला प्रतिभावंताचं गाव’ हा ग्रंथ लेखकाच्या साहित्याची प्रेरणा, त्याने केलेली साहित्यनिर्मिती, त्या निर्मितीतून आपणाला भेटणारं जग आणि त्यातील भेटणारी सदाचारी – दुराचारी, सजन – दुर्जन, प्रेमळ आणि प्रेरणादायी माणसं या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. मराठीतील मान्यवर लेखकांनी आपलं गाव आणि आपलं बालपण यावर भरभरून लिहिलेला हा एकमेव लेखक प्रयोग असावा.
गावाच्या अंगाखांद्यावर खेळणारा बालपणीचा लेखक आणि लेखकाच्या अंत:करणाच्या तळाशी नांदणारं गाव यांचा सुरेख आणि सुरस आविष्कार या ग्रंथात झालेला आहे. कोवळ्या आणि निरागस अशा बालपणीच्या आठवणींमध्ये आयुष्याला दिशा देणारी, आयुष्याला श्रीमंत करणारी खूप मोठी सर्जक शक्ती सामावलेली असते. त्यातून आपल्या व्यक्तित्वाची जडण-घडण होत असते. त्यातून आपल्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. लेखकाच्या व्यक्तित्वाचा झालेला विकास त्यातून पाहावयास मिळतो.
लेखकाच्या साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा समजतात आणि ‘वर्तमान’ समजण्यासाठीही तेरा-चौदा वर्षापर्यंतचा कोवळा ‘भूतकाळ’ उपयोगी पडतो. म्हणून या प्रकारचे आत्मकथनपर लेखन फार महत्त्वाचे असते. त्यात स्वप्नरंजन नसते. आत्मगौरव नसतो; पण आत्मप्रत्ययाची ओळख मात्र त्यातूनच होत असते. राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते.
पुस्तकाचे नाव – प्रतिभावंताचं गाव
लेखिका – सुनिताराजे पवार
किंमत – ₹ ५००
प्रकाशन – संस्कृती प्रकाशन । sanskrutiprakashan@yahoo.com
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.