आत्मचरित्र लिहिण्याची हिम्मत बाळगली पाहिजे : मंगला गोडबोले
अंत:स्वर जपणारी आत्मकथने समाजाला प्रेरक : प्रा. मिलिंद जोशी
- संस्कृती प्रकाशनातर्फे डॉ. उज्ज्वला गोखले लिखित ‘स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप व चिकित्सक विवेचन’ ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : “थोरामोठ्यांनीच आत्मचरित्र लिहावीत, हा परंपरेचा पगडा झुगारून आपल्या जगण्याचे अनुभव मांडणारे आत्मचरित्र लिहिण्याची हिंमत बाळगली पाहिजे. भूतकाळाची पुनर्मांडणी, सत्याकडे तटस्थपणे पाहत सुट्यासुट्या तुकड्यांची कलात्मक गुंफण करत त्याला ललितलेखनाचा धागा जोडला, तर आत्मचरित्र वाचनीय होते. त्यात विशेषणांचा योग्य वापरही गरजेचा असतो,” असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
बदलत्या काळात बायकांनी स्वत्व कसे सांभाळले, हे दाखवणारा हा ग्रंथ आहे. महिलांची आत्मचरित्रे ही महिला शक्तीचे प्रखर दर्शन घडवणारी आहेत.
मंगला गोडबोले
संस्कृती प्रकाशनातर्फे डॉ. उज्ज्वला गोखले लिखित ‘स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप व चिकित्सक विवेचन’ ग्रंथाच्या प्रकाशनावेळी गोडबोले बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. समीक्षक डॉ. रेखा साने-इनामदार, प्रकाशिका सुनिताराजे पवार आदी उपस्थित होत्या.
डॉ. रेखा-इनामदार म्हणाल्या, “गोखले यांनी या ग्रंथात स्त्रियांची आत्मचरित्रे, त्यांची प्रेरणा, भावविश्व, विवेचन अत्यंत चिकित्सकपणे मांडले आहे. भाषा, आशय वाचकाला धरून ठेवणारी असावी. स्त्रियांचे आत्मचरित्र पतीच्या निधनानंतर का लिहिले जाते, याचा विचार व्हावा. गोखले यांनी आत्मव्याधीग्रस्त लोकांच्या लेखनावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या लेखनात आक्रमकता, अट्टाहास, अभिनिवेश नाही.”
मंगला गोडबोले म्हणाल्या, “सीमारेषेवरील वाङ्मय प्रकार असलेल्या आत्मचरित्रात लवचिक, मुक्त, कबुलीजबाबाची भावना, संघर्ष, हळहळ मांडता येते. कोरोनाचा काळ आणि हाताशी असलेली माध्यमे यामुळे आत्मचरित्रांसाठीचा कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तरीही लिहायला कोणी धजावत नाही.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “तत्व आणि भावनांच्या संघर्षात स्वत्व न हरवता अंत:स्वर जपत लिहिलेली आत्मचरित्रे समाजाला प्रेरक असतात. आज भूगर्भापासून अंतरिक्षापर्यंत स्त्रिया गगनभरारी घेत आहेत. परंतु शोषण पाठ सोडत नाही. त्याचे स्वरूप, व्यवस्था बदलत राहते. मानवमुक्ती, वेदना, विद्रोह आणि नकारात्मकता यातून आत्मकथन लिखाणाचा प्रवास होतो. ज्यांनी आत्मसन्मान जपला, त्यांची आत्मचरित्रे काळाच्या कसोटीवर टिकली.”
राजकीय लोकांची, त्यातही महिलांची आत्मचरित्रे का येत नाही, याचा विचार व्हावा. स्त्रियांना सत्तेवर बसवले जात असले, तरी अजूनही पुरुषांचा त्यात होणार हस्तक्षेप, वर्चस्व दिसून येते. दुसऱ्यांच्या आयुष्याचे मूल्यमापन करताना स्वतःच्या आयुष्याचे मूल्यमापन करणे मात्र कठीण वाटते.
प्रा. मिलिंद जोशी
“आत्मचरित्र हा स्वमूल्यांकनाचा भाग आहे. मराठी साहित्यात आत्मचरित्राला १५० वर्षांची परंपरा असून, अंत:स्वर जपणारी आत्मचरित्रे लिहिली जावीत,” असे प्रा. मिलिंद जोशी यांनी नमूद केले.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उज्ज्वला गोखले यांनी ग्रंथाविषयी विवेचन केले. शलाका माटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशय गोखले यांनी आभार मानले.