July 27, 2024
Book Review on Novel Kadelut Dr Shrikant Patill Book
Home » दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट
मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

मानवी जीवनात माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली पाहिजे. सकारात्मक विधायक विचारांची कास धरली पाहिजे. याबाबतचे दिशादिग्दर्शन, मानवी मनाचे, स्वभावाचे, स्वार्थी – परमार्थी वृत्तीचे, माणूसपण हरवत चाललेल्या समाजाचे, निसर्गातील विविध घटकांच्या लुटीचे चित्रण त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. स्वार्थ अन् अति हव्यासाने निसर्गाची अपरिमित लूट करणाऱ्या मानवी वृत्ती प्रवृत्तीवर प्रहार करीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कडेलूट ही डॉ. श्रीकांत पाटील यांची कादंबरी आहे.

लॉकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या कादंबऱ्यानंतर ‘कडेलूट’ ही कादंबरी वाचकाला निर्ढावलेल्या स्वार्थी वृत्तीला, प्रस्थापित व्यवस्थेला भविष्यकालीन धोक्याचा सूचक इशारा देते. आपणच आपला मानवी जीवनाचा विनाशकाल कसे होऊ पहात आहोत. निसर्गाने दिलेले वरदान आपणाला टिकवता आले नाही तर विकासाच्या आणि हव्यासाने स्वार्थी प्रवृत्तीमुळे निसर्गाला हानी पोहोचवून आपण आपलाच कसा कपाळमोक्ष करीत आहोत याची जाणीव करून देते. डॉ. श्रीकांत पाटील आपल्या कादंबरीत नुसते प्रश्न उपस्थित करीत नाहीत तर त्यावर उपायही सुचवतात.

निसर्ग आपला गुरु आहे. निसर्ग आपला तारणहार आहे. त्याचा ऱ्हास थांबवला पाहिजे. निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे. त्याबाबत जनजागृती केली पाहिजे. उद्याच्या पिढीसाठी निसर्ग जपला पाहिजे हा संदेश देतात. कडेलूट या कादंबरीच्या आशयातून, विषयातून घटना प्रसंगातून, संवादातून निसर्गाची उपयुक्तता निदर्शनास आणून देतात.

कडेलूट ही कादंबरी वारणा काठच्या भूप्रदेशातील असली तरी ती तेवढ्या सिमीत प्रदेशापूर्ती सिमीत न राहता तिचा आवाका खूप मोठा आहे. गहन गंभीर विषय वास्तविक पाहता राज्य, देश आणि विश्व या पातळ्यावर सर्वत्र निसर्गातील गौण खनिजांची होणारी लूट, डोंगरकड्यांची होणारी कडेलूट, त्यातून निर्माण होणारे उजाडीकरण, भूस्खलन, पावसाचा अनियमितपणा कधी अवास्तव ढगफुटी होऊन होणारे नुकसान, कधी होणारे अवर्षण यामुळे पशुपक्षी, मानव यांची होणारी अपरिमित हानी होऊन दुष्काळाच्या झळा दाखवून मानवी जीवनात वित्तहानी होते. पशुपक्ष्यांची हानी होते. निसर्गातील जीवसृष्टीची साखळी खंडित होते. त्याचे दुष्परिणाम त्याची दाहकता, वास्तवता यावर प्रकर्षाने या कादंबरीत बोट ठेवले आहे. अमर्याद वृक्षतोड करून जंगल संपत्तीचा ऱ्हास होत आहे.

लेखक पाटील हे संवेदनशील वृत्तीचे असल्याने समाजात अवतीभवती जे विदारक दृश्य दिसते. त्यावर आपल्या लेखणी द्वारे भाष्य करतात. कडेलूट या कादंबरीतून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. निसर्ग, वृक्षवेली टेकड्या, डोंगर ,नद्या यांचे सर्वांनीच भान ठेवून जतन केले पाहिजे. संरक्षण केले पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग हा उपकारकर्ता आहे. त्याच्यावर स्वार्थी वृत्तीने माणसाने अपकार करू नये, हा मौलिक संदेश कादंबरीतून नक्कीच जाईल असा सार्थ विश्वास वाटतो.

डॉ. पाटील यांच्या कादंबरीतील नायक सर्वसामान्य माणूस आहे. त्यांची मित्रमंडळी, कौटुंबिक परिवार, ग्रामीण परिसर, ग्रामीण संस्कृती, सहकार्याची आणि सत्कर्माची आस असणारी सर्वसामान्य माणसे यामध्ये आपणास भेटतात. भाबडी, अविरत कष्ट करणारी माणसे प्राप्त परिस्थितीला तोंड देत आनंदाने जीवन जगतात. सकारात्मक विधायक विचार जपणारी आणि मानवी मूल्यांवर नितांत श्रद्धा ठेवून जीवनगाणे आनंदाने गाणारी, हरी भजनात रमणारी, आपुलकीचा मायेचा हात देणारी ही माणसं गुण्यागोविंदाने राहतात. या कादंबरीतील पात्रे कादंबरीतील विषयाच्या अनुषंगाने आपले आगळवेगळेपण जपणारी, संकटात मदतीला धावून जाणारी, निसर्गाशी एकरूप होऊन अस्तित्व टिकवणारी, ध्येयासक्त आहेत. सर्व पात्रांचे आचार, विचार, संवाद मर्यादाशील आहेत.

वारणाकाठची बोलीभाषा, ठसठशीत संवादाने ही कादंबरी नटलेली आहे. आशयाची घनता, विषयाची गंभीरता, वाचकाच्या मनाला भिडते. हळुवारपणे मनाची पकड घेत, सहज साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करीत ही कादंबरी जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम करते. या कादंबरीची पाठराखण 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केली आहे. संस्कृती प्रकाशन पुणे यांनी ही कादंबरी प्रकाशित केली आहे.

पुस्तकाचे नाव – कडेलूट
लेखक – डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

माझी माय मराठी..

प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचा सुरतचा उपक्रम आदर्शवत – नरेंद्र मोदी

विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading