June 18, 2024
Pratibhavantach Gaon A book that tells the story behind the creation of literature
Home » गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव
काय चाललयं अवतीभवती

गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव

Ramdas Kedar
प्रा. रामदास केदार उदगीर

प्रा. रामदास विठ्ठलराव केदार

साहित्यिक, कवी
प्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूर
केंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, वाढवणा.
बैल दौलतीचा धनी कवितेचा अभ्यासक्रमात समावेश

मोबाईल – ९८५०३६७१८५
ई मेल – ramdaskedar111@gmail.com

लेखकांच्या गावमातीतून रुजलेल्या बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देत सुनिताराजे पवार यांनी प्रतिभावंतांचं गाव साकारण्यांचा सुंदर असा दखलपात्र प्रयत्न केलेला आहे. सुनिताराजे पवार ह्या सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्ष आहेत. संस्कृती प्रकाशनची स्थापना करून आजवर सुमारे ४५० पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. त्यांच्या साहित्यकृतीस मानाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या कलाकृती, न पाठवलेलं पत्र, संगमरवरी स्वप्नांचा शिलेदार ग्रेस, बदलती ग्रामसंस्कृती, कविता महाराष्ट्राची, प्रतिभावंतांचं गाव, मी कसा घडलो ,आणि कांडा इत्यादी त्यांच्या ग्रंथसंपदा प्रकाशित झालेल्या आहेत.

‘माती असो वा नाती नाळ तुटू द्यायची नसते ‘

या पुस्तकाच्या लेखिका सुनिताराजे पवार यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखकांचा गाव आणि त्यांची गावमातींशी जुळलेली घट्ट नाळ उभा केलेला आहे. लेखक ज्या गावमातीतून वाढला आहे, त्या मातीतील आठवणी, बालपण, नातीगोती, सुख – दुःख, कुटूंब, परिसर यातून लेखक कसा घडत गेला ? या सगळ्या आठवणींचा खजिना या पुस्तकातून वाचावयास मिळतो. सुनिताराजे पवार यांनी आपल्या आई वडीलांना हे पुस्तक अर्पण करताना एक सुंदर अशी ओळ लिहिलेली आहे. हाच या पुस्तकाचा खरा आत्मा आहे असे वाटू लागते. ते लिहितात, ‘माती असो वा नाती नाळ तुटू द्यायची नसते ‘

गावकुसातील व गावकुसाबाहेरील आठवणी

या पुस्तकातील लेखकांची, प्रतिभावंतांची नाळ त्यांच्या जन्ममातीशी कधीही तुटली नाही हे पुस्तक वाचल्यानंतर सिद्ध होते.
नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे, प्रा. व. बा. बोधे, रामचंद्र देखणे, यशवंतराव गडाख, डॉ. द. ता. भोसले, रा. रं. बोराडे, श्रीपाल सबनीस,लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. न. म. जोशी, उल्हासदादा पवार, भारत सासणे, डॉ. विनायक तुमराम, महावीर जोंधळे, इंद्रजित भालेराव, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. चंद्रशेखर चिंगरे, डॉ. राजेंद्र माने, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, श्रीकांत देशमुख, डॉ. महेंद्र कदम, डॉ. रणधीर शिंदे, सुनिताराजे पवार, कल्पना दुधाळ, अशोक कोळी, उद्धव कानडे, वि. दा. पिंगळे, सचिन ईटकर, आणि घनश्याम पाटील या लेखकांनी आपल्या बालपणातील गावकुसातील व गावकुसाबाहेरील आठवणी उभ्या केलेल्या आहेत.

कोत्तापल्ले यांची जन्मकथा

देगलूर जवळच्या मदनूर गावी आपले बालपण घालवलेले नागनाथ कोत्तापल्ले सांगतात की, निजामाविरुद्ध झालेल्या आंदोलनात माझा आजोबा सहभागी झालेला होता. त्यामुळे आमच्या घरापुढून रझाकार मंडळी नंग्या तलवारी घेऊन फिरत. मी जन्मलो तेंव्हा दिवसभर माझे आई वडील मला घेऊन पिवळ्या ज्वारीच्या पिकात लपून बसले होते. माझ्या जन्माच्या सहा महिन्यातच निजामांचा पराभव झाला. अशी जन्माची कथा कोत्तापल्ले सर सांगतात. तर वडील मुख्याध्यापक असल्याने पुन्हा बारहाळी गावी काही दिवस घालवले. मुखेडला असताना आजीच्या गाण्यांनी भरलेले ते दिवस आधिकच रुचकर झाले ते तिथल्या रानमेव्यांने आणि रानवाऱ्याने. एवढ्या आयुष्यात खूप घरं झाली. प्रत्येक घरांच्या कडू गोड आठवणी काळजावर शिलालेखासारख्या कोरल्या आहेत.

उत्तम कांबळे यांचे भाकरीची शिकार करण्यात बालपण

भाकरीची शिकार करण्यात बालपण कसं उडून गेलं हे उत्तम कांबळे सांगतात. मेलेली जनावरं ओढून आणलं की तक्क्यामाग ते कापलं जायचं. जनावरांचे पाय ओढून मी उभा राहायचो. कधी कधी चामडं सोलून माझ्या डोक्यावर द्यायचे. चामड्यात अडकलेलं मेलेल्या जनावरांच रक्त अंगभर गळायचं, गोचड्या, तांबड्या अंगभर चिटकायच्या. चांभारांकडं चामडं दिलं की काम संपलं. बालपणात स्वताच्या वाट्याला आलेला अनुभव उत्तम कांबळे सांगतात.

बोधेंनी जागवल्यात दुधी गावच्या आठवणी

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुधी गावचे व. बा. बोधे गाव आठवणी जागवतांना सांगतात की, माझ्या जगण्याला आतून कलेचे अस्तर जोडले जात होते. नैसर्गिक जडणघडण सुंदर असलेलं गाव आणि अनुभवांची प्रचंड शिदोरी गावानेच माझ्या गाठीशी बांधली. या मातीत उभा राहिलेला प्रत्येक माणूस मी वाचलेला आहे असे बोधे सांगतात.

देखणेंचा जन्म जनाईच्या ओव्या गात !

रामचंद्र देखणे सांगतात की, ज्या गावच्या संस्कृतीशी आजही मी बांधला गेलो. असं गाव मला लाभलं आहे. शिरुर तालुक्यातील कारेगावी जन्म झालेल्या रामचंद्र देखणे यांच्या घराण्यातच वारकरी संप्रदायांची परंपरा. पुर्वीच्या काळी माझ्या गावात एखादी गरोदर बाई बाळांतपणासाठी अडली की तीला जात्यावर दळण दळायला बसवायचे. पोटात हालचाल सुरू झाली की बाई नैसर्गिकच बाळांतीण व्हायची. बाई दळतांना ओव्या अभंग म्हणायच्या. असच माझी आई जात्यावर ओव्या म्हणत दळता दळता माजघरात गेली आणि मी पटकन आईच्या पोटातून बाहेर आलो. ज्यांचा जन्म मुळी आईच्या पोटातून जनाईच्या ओव्या गाता गाता झाला आहे तो आयुष्यभर संत साहित्याची सेवा करणार नाही तर काय करणार ? संत साहित्याचा आणि माझा स्पर्श असा जन्मापासूनच आहे असे रामचंद्र देखणे सांगतात. माझ्या गावाने जीवन जगण्याची आगळीवेगळी दृष्टी मला दिली आहे. असे रामचंद्र देखणे सांगतात. तर सोनई गाव ते साखरकारखाना हा प्रवास कसा झाला ते यशवंतराव गडाख सांगतात.

गावयात्रेने द. ता. भोसलेंचे बालपण समृद्ध

प्रा. डॉ. द. ता. भोसले सांगतात की, मरणाच्या उंबरवठ्यावर उभा असलेल्या माणसांलाही जन्माच्या उंबरवठ्यावरच्या आठवणी आठवत असतात. शेता -शिवाराच्या आणि ऊन ,वारा, पाऊस, धुके आणि गारठा यामध्ये मुरलेलं बालपण चराचर सृष्टीशी माणसांच नातं कसं असतं नि असावं याचे नकळत संस्कार करीत असते. निसर्गाकडे पाहण्याचा एक रसवेल्हाळ दृष्टिकोनही ते तयार करते माझे बालपण याला अपवाद नाही असे द. ता. भोसले सांगतात. तर भैरोबा ग्रामदैवत आणि गावची यात्रा यामुळे माझे बालपण अनुभवांनी समृद्ध झालेले आहे. असे द. ता. भोसले लिहितात.

बोराडेंच्या काटगावच्या आठवणी

रा. रं. बोराडे लातूर जिल्ह्यातील काटगाव येथील आठवणी सांगतात. ते म्हणतात, रानोमाळ भटकणं मला खूप आवडायचं, सोबत दोस्त असायचे, काटवनात शिरायचो, डिंक गोळा करायचो, मोहोळ झाडायचो, आंबराईत भटकायचो, पाडाचे आंबे मनसोक्त खायायचो. सगळी खेळ खेळायचो, विहिरीत पोहायचो, कधी कधी माझ्या मनात विचार येतो. माझ्या सृजनशील लेखनाची बीजं माझ्या बालपणात शोधता येतील का ? मातीच्या स्तराखाली बीजं असतं खरं, पण त्याला ओलावा मिळताच बीज अंकुरतं, शिक्षणाच्या ओलीमुळं मला सृजनशील लेखनाचा अंकुर फुटला, विस्तारत गेला. इतका विस्तारला की माझं अवघं जीवन त्यानं व्यापलं.

बहुजनांत रमले सबनीस

निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील मोहनराव पाटील सबनीस त्यांच्या निजाम सरकारशी केलेल्या सशस्त्र लढ्यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यांचाच मुलगा डॉ. श्रीपाल सबनीस याचे बालपण या गावी गेले आहे. ते सांगतात की, अठरापगड जातीचे सर्व समुह वडिलांच्या कैवारात व निष्ठेत राहत. त्यामुळे माझ्या लहानपणीच मी जातीच्या चौकटी ओलांडून बहूजनात रमलो. माझ्या गावाने मला भरपूर दिले असून अर्धा एकरचा लांबीरुंदीच्या भव्य वाडा आणि शिवकालीन ऐतिहासिक बुरुज किल्ला याच्या मालकिचा वारसा भोगताना आज मी जातधर्मातील भूमिका मांडतोय याचे समाधान आहे.

शालेय जीवनातील आठवणी

लक्ष्मीकांत देशमुख यांनी बिदर, उस्मानाबाद, नांदेड आणि औरंगाबाद ही बालपण घडायला गावे मिळाली. माझे बालपण तिसरीपर्यंत जिथं झालं ते गाव म्हणजे बिदर कर्नाटक उस्मानाबाद च्या सीमेवरचं किता हे गावं होय. तर डॉ. न. म. जोशी हे मुळ गाव गारवडे (ता .पाटण) सोलापूर याबरोबरच सांगली जळगाव, मिरज, पुणे अशा सात गावामध्ये प्रत्यक्ष निवास केला आहे असे सांगतात. नियतीनं नशिबाला भिंगरी लावल्यामुळे मी अनेक गावी, अनेक शाळांत शिकलो आणि पुढं अनेक शांळामधून शिकवलं. तरी आठवणीतील शाळा म्हणाल तर माझ्या गारवडे गावची माळावरची शाळाच ! भविष्यातील माझ्या साहित्याची बरीच बीजं मला माळेवरच्या शाळेच्या परिसरात भेटली.

उल्हासदादांनी जागवल्या सभांच्या आठवणी

उल्हासदादा पवारही आपले बालपण सांगतात. अगदी युवक असल्यापासून कार्यरत असलेले दादा सत्तरी ओलांडली तरी आजही पुर्वीच्या जोमाने कार्यरत आहेत. ते सांगतात की, आमचं मसळ गाव सातारा जिल्ह्यातील कुडाळ पण आता आम्ही कुलाचार करण्यासाठी जातो. आमची चौथी पाचवी पिढी पुण्यातच वाढली आणि रुजली. माझं बालपण नाना पेठेत गंजीच्या मारुती मंदिरामागे जगतापच्या वाड्यात गेलं. वडील भल्यापहाटे हडपसरला जायचे .दोन दोन मन सायकलवर कांदे बटाटे आनायचे आणि दिवसभर विकायचे. अपार आईवडील यांच्या कष्टातून मी आज मोठा झालो आहे. मी सात वर्षाचा असल्यापासून अनेक नेत्यांना ऐकता आले. नेहरूंची सभा आम्ही सायकलवर जाऊन ऐकलेली आहे. मला कविता खूप आवडतात. मी शालेय जीवनापासून खादी वापरतो. यशवंतराव चव्हाण यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. पुण्यात कुठलीही सभा असली की, मला वंदेमातरम गीत म्हणायला लावायचे. लहानपणापासून महात्मा गांधी आणि वारकरी संप्रदायाचा माझ्यावर प्रभाव आहे. बालपणापासूनच माझ्यावर कला, नाट्य, भजन, किर्तनाचा मोठा प्रभाव आहे. असे दादा सांगतात.

सासणेंचे बालपणीचे घर

भारत सासणे सांगतात की, मी किती घरे पाहिली असतील आणि किती गावे हिंडलो असेन सांगता येत नाही. प्रत्येक घरांच्या आठवणी माझ्या वेगवेगळ्या आहेत. बालपणाचा काळ जिथे गेला ते घर कदाचीत बोलावतं. तर आपल्या बालपणातील आठवणी सांगताना डॉ. विनायक तुमराम गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या जन्मगावची आठवण सांगतात. आदिवासी भागातील राहनीमानात कसा वाढलो आणि आदिवासी जीवन कसा जगलो ? हे साक्षीदार म्हणून माझा गाव उभा आहे. अनेकवेळा जातीमुळे वाट्याला आलेली अपेक्षा व घनघायाळ एकाकीपण साहत गेलो. मनाच्या निर्धाराने चालत गेलो. लंगोटीतली आदिवासी माणसे, सर्वांग गोंदून लज्जाखोर वस्त्र गुंडाळणाऱ्या आदिवासी माय माऊल्या मी पाहिल्या, गवतांच्या त्यांच्या झोपड्या, त्यात मिणमिण जळणारे कडू तेलांचे दिवे, त्यातच आनंद मानणारी त्यांची समाधानी वृत्ती, त्यांचे शिकारी लोकजीवन, रानोमाळ त्यांची भटकंती, सण उत्सव देव देवता व पारंपारिक लोकाचार त्यांच्यातील मांत्रीक भगत हे सर्व काही माझ्या बालपणाने अनुभवलेले आहे. काट्यागोठ्यांची चढण म्हणजे आदिवासी विश्व. या विश्वात मी अनुभावाची शिदोरी चाखत लिहिता झालो, घडत गेलो असे विनायक तुमराम सांगतात.

गावानेच जोंधळेना दिले लेखनीसाठी

महावीर जोंधळे सांगतात की, कळत नकळत आमच्या नागवेपणातील सुखद बोचऱ्या आठवणी अस्वस्थ करतात, बोचत राहतात. उरतात फक्त शब्द. पोहायचं, आमराईत शिरुन कैऱ्या तोडायच्या, गल्लोरीचा खेळ मांडायचं, कोया खेळायच्या जिकडे कोय उडे त्याची बायको तिकडे तेंव्हा सोबतचा पांड्या चिडायचा. एकदा अप्पाने पाय दाबायला सांगितले तेंव्हा पुन्हा काम सांगू नये म्हणून डब्बीत विंचू घेऊन अप्पाच्या पायात सोडलो. अप्पा रात्रभर झोपी गेले नाहीत. अशा अनेक आठवणी गावाने आणि गावमातीने दिल्याचे महावीर जोंधळे सांगतात. काळ्या शिवारातून येणाऱ्या पावलांचे ठसे रस्त्यावर उमटलेले. गाई बैलांच्या गळ्यातील घुंगरनाद पोरांना मोहरुन टाकायचा. गुराख्यांची पोरं छान उठून दिसायची. शेतावरुन येणारी माणसं देव वाटायची. अशा गावानेच मला व माझ्या लेखनीसाठी बळ दिले असे महावीर जोंधळे सांगतात.

भालेराव यांच्या लेखणात बालपणीचा संस्कार

इंद्रजित भालेराव यांनी तर सर्व बालपणातील आठवणी व गाव कवितेतून उभा केलेला आहे. त्यांची काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ही कविता, गायी आल्या घरा, आम्ही काबाडाचे धनी ह्या कविता वाचल्यानंतर भालेराव सरांचे संपूर्ण बालपण त्यात उतरलेले दिसते आणि आपलं बालपण आठवू लागते. ते सांगतात की, माझ्या बालपणी माझ्या घरात आरती, सिनेमातली गाणी, तमाशातील गाणी, एक बहीण जात्यावयची, भुलोबाची गाणी म्हणायची, एक बहीण चिऊकाऊंच्या गोष्टी सांगायची. माझ्या लेखनावर हाच संस्कार झाला आहे असे सांगतात. मी लहानपणापासून समृद्ध झालो ते माझ्या आईमुळे आणि गावातील माय माऊलीमुळे. मी लिहिता झालो .महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कवितेचा झेंडा रोवला पण गावकऱ्यांकडून कौतूक केले नाही. कारण ह्या बाबी गावकऱ्यांना काय असते ते माहीत नाहीत. ही खंतही सर सांगतात. आईवडील जीवंत असताना जर माझा सत्कार केला असता तर त्यांच आयुष्य आणखी वाढलं असतं. ज्यांच्या सोबत गुरं राखली, पाखरं राखली, गोवऱ्या वेचल्या, धस्कट वेचली वळणं खंदली ते सगळे आज माझ्यासमोर म्हतारी वाटत आहेत. माझ्या कवितेने मला चिरतरुण ठेवलं होतं आणि माझा गाव मी माझ्या कवितेत चिरतरुण ठेवला होता. माझ्या गावचा देखना फोटो काढून तो मी साहित्याच्या चोकटीत मढवला होता. अशा अनेक आठवणी मी कवितेच्या माध्यमातून सांगत आलो आहे. असे इंद्रजित भालेराव सांगतात.

गावच्या आठवणी

डॉ. यशवंत पाटणे वाई गावच्या आठवणी सांगतात. बालपणी माझ्या मावश्या मुलांबाळासकट मुक्कामाला यायच्या आणि घरांच्या भिंतीही बोलक्या व्हायच्या. डॉ. चंद्रशेखर चिंगरे सांगतात की, उंच खडकावर बसून नदीच्या वाहत्या पाण्याचा प्रवाह, त्यातील इवल्या इवल्या माशांचे सुळकन सरकणारे थवे निरखत राहणं मला भारी आवडे. माझ्या गावची संस्कृती, तिथला निसर्ग, तिथली लोकदैवत, ग्रामजीवन यांनी मला संपन्न केलं.

बार्शीच्या ब्राह्मण गल्लीतील आठवणी प्रा. मिलिंद जोशी सांगतात की, अनेकदा शाळेत जाण्याऐवजी भगवंत मंदिरातच खेळायचो, आईला वाटायच मी शाळेत गेलोय. तीन मला पाहिलं. दोन फटके दिले तेंव्हापासून शाळा कधी बुडवीली नाही. तसेच माळदावर सर्वचजण गप्पा मारत आम्ही चंद्र चांदण्या बघत झोपी जायचो. तर प्रकाश पायगुडे यांनी आपल्या बालपणातील आईची आठवण मनभरुन सांगीतलेली आहे. मंदा खांडगे यांनी समुद्र किनार्‍यावर वसलेले दापोली हे स्वप्नातले गाव उभे केले आहे. कोकणातील निसर्गाने मला भुरळी घातली होती. तेथील भातखाचरात भातलावणी सुरु झाली की मी दारात खुर्ची टाकून बसायची. कोकणातील माणसं कष्टाळू, चिवट रात्रंदिवस काम करणारी अशा वातावरणात बालपण गेले असल्याचे मंदा खांडगे सांगतात. तर मौजे राहेरी ता सिंदखेडराजा या गावाची आठवण श्रीकांत देशमुख सांगतात. बोरी आणि हिवरांच्या झाडावर बसणा-या सोनेरी भुंग्याचा शोध आम्हाला या काळात लागला. माझ्या अस्तित्वाच्या मुळ खाणाखुणा मला माझ्या गावच्या मातीतच सापडतात. तर डॉ. महेंद्र कदम हे माढा तालुक्यातील वडशिंग्या गावची आठवण सांगतात. जरी आपला प्रवास आधुनिकतेच्या आणि जागतिकीकरणाच्या दिसेने होत असला तरी तुमच्या मुळाला ही गावची माती चिटकून येते. तशी माती मलाही चिटकून आली आहे. थंडीच्या दिवसात शेकोटी केली जायची. त्यासाठी उकिरड्यावरचे गवत आणले जायचे. ते न आणणाऱ्याला शेकायला मिळायचे नाही. त्या गवताला सासू असे म्हणायचे. ज्याची सासू आधिक पेट घेणारी जास्त वेळ जळणारी त्या आधिक चांगली बायको मिळणार असा समज होता. त्यामुळे चांगली बायको मिळावी म्हणून खूप उकिरड्यांचे उंबरठे झिजवले आहेत. अशा अनेक आठवणी महेंद्र कदम यांनी सांगितले आहेत.

डॉ. रणधीर शिंदे हे बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथील आपल्या बाल आठवणी सांगतात. प्रत्येकांच्या मनात गाव कायम वसलेलं असतं. गावाविषयीचा अपरंपार जिव्हाळा आयुष्याला लगडून राहतो. मनात वसलेल गाव घेऊनच माणसं वर्तमानात वावरतात. माझ्या गावाला कँनाल असल्याने भुईमुगाच्या शेंगा खूप पिकायच्या. गाव झाडून रानात शेंगा काढायला जायचे. बालपणी सोबत्यांसोबत घालवलेल्या आयुष्याची स्मरणसाखळी मनातून फारशी मिटत नाही. लहानपणापासून मासे पकडायला खूप आवडायचे. झाडे फांद्यांना धरुन नद्यात उड्या मारायचो.

पुसेगावात वाढलेल्या सुनिताराजे पवार ही आपल्या बालपणातील गावमातीतल्या जुन्या आठवणी सांगतात. लहानपणी पैशांची नाही पण नात्याची समृद्धी मी अनुभवलेली आहे. वडीलांनी आपल्या रसाळ कथांद्वारे माझे बालविश्व समृद्ध केले आहे. या गावची शिकवण सेवागिरी महाराजांचा अदृश्य आशिर्वाद आणि कुटुंबातील नात्यांच्या घट्ट बंधांनी आयुष्य समृद्ध झाले. याचे सारे श्रेय माझ्या या गावच्या कसदार मातीला आहे. अशा सुनिताराजे पवार सांगतात.

कल्पना दुधाळ ह्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावच्या आठवणी सांगतात. काट्याकुट्यांच्या रानवाटा,बोरीबाभळी,वेलतारांची गर्दी यातून गावातला बरा रस्ता गाठायचा. आम्हाला चपल्लांची गाठभेट नव्हती आमचं अनवाणी पायाने चलणं असायचं. झिरपीवस्ती, कुटेवस्ती, बागवाले वस्ती, खारामळा अशा रानवाटा तुडवत बालपणातील आयुष्य मी घालवले. तर वाघूर नदीच्या काठावरच्या आठवणी अशोक कोळी सांगतात. नाटकांसोबतच, भारुड, भजन कीर्तनांच्या रंगात रंगून जाणार माझं गाव होतं. वेगळा सांस्कृतिक चेहरा घेऊन गाव उभं होतं. तर उद्धव कानडे माझे बालपण माझ्या आजोळी गेल्यांचे सांगतात.मुसळधार पावसांच्या चिखलात माझा जन्म झाला असे सांगतात. तसेच वि. दा. पिंगळे सांगतात की लहानपणापासून मी जात्यावरच्या ओव्या ऐकत ऐकत मी मोठा झालो आहे. माझ्या गावाने मला ब-याच गोष्टी शिकवल्या असून माझे बालपण मजामौजेत गेल्यांचे सांगतात.

सचिन ईटकर हे मराठवाड्यातील कळंब येथील असल्यांने त्यांना लातूरचाही सहवास लाभला आहे. बालपणातील एक गोष्ट सतत माझ्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे तेथील भीषण पाणीटंचाई, सायकलींना घागरी लटकावून जिथे कुठे मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी दररोज पायपीट आणि त्यातच खर्ची गेलेली कित्येक वर्षे. मला आयुष्यात पाण्यांचे महत्त्व शिकवून गेले. आजही पुणे मुंबईतील पाण्याची नासाडी पाहिली की,मला माझ्या गावचा दुष्काळ डोळ्यासमोर उभे राहतो. तर वृत्तपत्र ते संपादक हा रस्ता पार करतांना गावानेंही आपणाला बरेच काही शिकवले आहे असे घनश्याम पाटील सांगतात. चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर हे बालपणाची आठवण करून देणारा गाव. आम्ही सगळी पोरं एकत्र जेवायचो, खेळायचो, शिकायचो, जातीपातीचे विचार तेंव्हा कधी मनात यायचेच नाहीत. रानातली रानमेवे घेऊन बाजारात विकायला जायचो, निंबोळ्या, करंज्या विकून चार पैसे गोळा करायचं. असे धगधगते जीवन घालवत भुकंपाचा परिसर पालथा घातला. वाचन लेखनाची आवड असल्याने बातमी लेखन करुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहायचं. मला माझ्या प्रेरणेचे मुळ माझ्या गरिबीत आहे. सोसलेल्या चटक्यात आहे. एकेकाळी जाळलेल्या पन्नास पन्नास जणांच्या चितेत आहे. भूकंपाच्या काळरात्रीने अनेकांना उद्ध्वस्त केले पण मला जगण्याचा नवा मार्ग दाखवला. निसर्गाने दिलेले ते तांडव बालपणीच बघितल्याने यापेक्षा आपले वाईट होऊच शकणार नाही याची जाणीव झाली. आणि ती आठवण मनात घर करून बसली आहे असे घनश्याम पाटील सांगतात.

सुनिताराजे पवार यांनी अतिशय दखलपात्र व वाचनिय, प्रेरणादायक पुस्तकाची निर्मिती केली आहे. वाचत असताना वाचकाच्या समोरही स्वतः चे बालपण पिंगा घालू लागते. मी कसा घडत गेलो, लिहीत गेलो हे लेखकांनी मोजक्या शब्दात सांगण्यांचा प्रयत्न केला आहे. खरं तर गाव पुस्तकात बसू शकत नाही. इतक्या कधी न संपणा-या आठवणी खुणगाठ बांधून चिरंतन आपल्या सोबत असतात. यातील लेखकांने आपले बालपणातील वेगवेगळ्या आठवणी उभ्या केलेल्या आहेत. आयुष्याची वाटचाल करीत असताना जीवन प्रवासातील सुख दुःखाचे डोंगर पार करून नव्या वाटा कशा शोधाव्या लागतात हे वाचल्यावर कळते. गावांनी, मातींनी आपणाला कसे लिहायला लावले. हे लेखक खूप छानपणे सांगतात. कितीही वाचत राहावं असं मनाशी वाटतं. डॉ. द. ता. भोसले यांची पाठराखण व प्रस्तावना आहे. सुनिल मांडवे यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. वाचक या पुस्तकाचे नक्कीच मोठ्या मनाने स्वागत करतील. लेखकाच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव – प्रतिभावंतांचं गाव
लेखिका – सुनिताराजे पवार
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे – ३६८
मुल्य – ५०० रुपये

Related posts

नराचा नारायण झाल्यावर पुन्हा…

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

कागदी फुल…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406