अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका – रा. रं. बोराडे
वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो. ‘कांडा’ या सुनिताराजे पवार यांच्या कादंबरीत प्रसंगाची नेटकी मांडणी आहे. प्रवाही विवेचन आहे.
– रा. रं. बोराडे
ही आहे आफ्रिकेतल्या जंगलात दीडशे हत्तींच्या कळपाचं नेतृत्व करणाऱ्या एका हत्तिणीच्या पोटी जन्माला आलेल्या कांडा या नावाच्या एका उमद्या, देखण्या हत्तीची गोष्ट. त्याच्या जन्मापासून ते वीरमरण येईपर्यंतची कथा, जंगलात वावरणाऱ्या प्राण्यांचे विश्व वेगळे असते. जेव्हा ते मानवी संपर्कात येतात तेव्हा त्यांचं संपूर्ण विश्व बदलून जाते. त्यांचे स्वातंत्र्य, राहणीमान, साथीदार, बरंच काही ! पण जुळवून घेणं हा त्यांचा स्वभावधर्म…असाच एक हत्तीचा बछडा, जंगलातून माणसांच्या जगात आलेला… कुणीही प्रेमात पडावं असा हा कांडा.
वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो. ‘कांडा’ या सुनिताराजे पवार यांच्या कादंबरीत प्रसंगाची नेटकी मांडणी आहे. प्रवाही विवेचन आहे. भाषेचं लालित्य आहे. सुनिताराजे पवार या नामवंत प्रकाशक म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. वेगळ्या अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून त्या अधिक परिचित आहेत.
काळाशी आणि काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती – डॉ. यशवंत पाटणे
मुक्या प्राण्यालाही भावना असतात.. त्या भावना वाचण्यासाठी आईचे काळीज लागते.. कांडा चितारताना आपल्यातील वत्सल आई पानोपानी भेटते.. डोळे पाणावतात..
– डॉ. यशवंत पाटणे
‘कांडा’हे संस्कृतीचे सुंदर अपत्य आहे.. आईला पोरका असलेला.. पोरक्या कृष्णाची साथसंगत लाभलेला.. कृष्णा आणि सत्याच्या प्रेमकहाणीचा दुवा झालेला.. राजासारखा रुबाबदार..कर्णासारखा दिलदार..असा हा कांडा वाचकांना लळा लावतो.
मुक्या प्राण्यालाही भावना असतात.. त्या भावना वाचण्यासाठी आईचे काळीज लागते.. कांडा चितारताना आपल्यातील वत्सल आई पानोपानी भेटते.. डोळे पाणावतात..अस्वस्थता दाटते ….भावभावनांचा कल्लोळ उसळतो.. ‘कांडा’तील प्रसंगचित्रणे चित्तवेधक आहेतच.. या शिवाय ती आपल्या प्रतिभेचे विलोभणीय दर्शन घडवितात.. आपला प्राणी जगताचा अभ्यास आणि निरीक्षण शक्ती यांचाही प्रत्यय येतो..
कांडा हातात घेतल्यावर ..तो मनाची जबरदस्त पकड घेतो.. आणि एकाच बैठकीत पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण करतो.. हे आपले लेखनकौशल्य उल्लेखनीय आहे.. ‘कांडा’ही कोरोना काळातील निर्मिती असली तरी ती काळाशी आणि काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती झाली आहे..
वेगळ्या विषयावरची लक्षणीय कादंबरी – डॉ. राजेंद्र माने
सुनिताराजे पवार यांनी लिहिलेली ‘कांडा ‘ कादंबरी सलग वाचून झाल्याचा आनंद एक वेगळाच आहे. तो काळ त्या पात्रांच्या समवेत असल्याचा एक अनुभव त्यातून मिळतो.
डॉ. राजेंद्र माने
आफ्रिकेतल्या जंगलात ही कादंबरी सुरु होते. विशेष म्हणजे या कादंबरीचा नायक एक हत्ती आहे. ‘ कांडा ‘ नावाचा. हत्तींचा मोठा कळप. जंगलात वास्तव्य करणारा. त्या कळपाच्या प्रमुख हत्तीणी पोटी जन्मलेला हा कांडा. त्याची ही कहाणी. तेथून त्याला माणसात कसे आणले जाते? त्याच्या संपर्कात येणारी माणसे.. त्याच्यावर झालेले संस्कार.. आणि शेवटी ‘ कांडा ‘ला आलेले वीरमरण. हा सगळा प्रवास म्हणजे ‘कांडा ‘ कादंबरी.
माणूस आणि प्राणी या नात्यावर अप्रत्यक्षपणे ही कादंबरी प्रकाश टाकते.. कृष्णा आणि कांडा यांच्यातले मनोहारी नाते यातून सामोरी येते. प्राण्यांचं जंगलात एक स्वतंत्र जगणं असतं. निसर्गात रमलेलं हे जगणे माणसात आले की बदलते. स्वातंत्र्य संपते. त्याचे विश्व बदलते. एका सुंदर हत्तीच्या बछड्याची तो मोठा होईपर्यंतची ही कहाणी त्याच्या भावविश्वावर प्रकाश टाकते. माणसात आल्यावर तो माणसावर प्रेम करतो. त्यांच्यात रमतो आणि माणसासाठीच वीरमरण पत्करतो. प्राणी विश्वावर खूप दिवसांनी आलेली ही कादंबरी आहे.
सुनिता राजे यांनी हत्तीच्या भावनांचा विचार करुन त्यावर चिंतन करुन यातला ‘ कांडा’ शब्दबध्द केला आहे. त्यामुळे वाचताना त्याचं देखणेपण डोळ्यासमोर उभा रहातं. कादंबरीला वेग आहे. एक वेगळं विश्व सुनिताराजे वाचकासमोर उभे करतात. सुनिताराजे पवार यांची लेखणी सर्व प्रसंगांची सजग मांडणी करते. त्यामुळे प्रसंग जिवंत झालेत.
अक्षरबंध प्रकाशनचे किरण बोधे यांनी कादंबरीची निर्मिती देखणी केली आहे. मुखपृष्ठावरचे कांडां ( हत्ती ) चे चित्र सुंदर आहे. प्रतिक काटे यांची आतील रेखाचित्रे आशय वृद्धिंगत करणारी. सुनिल मांडवे यांची मुखपृष्ट मांडणी देखणीच. मध्यंतरी केरळमध्ये एका हत्तीणीला कोणा माणसाने स्फोटकं अननसातून खायला घातली. ती तिच्या पोटात गेलेवर तिची तगमग झाली. वेदना सहन न होवून ती मृत्यू पावली. त्यावेळी ती गर्भिणी होती. या हत्तीणीस ही कादंबरी सुनिताराजे पवार यांनी अर्पण केलीय. त्यामुळे ती आणखी संवेदनशील वाटते. साहित्यविश्वात या वेगळ्या कादंबरीने समृद्धता आणलीय. ल. म. कडू यांची प्रस्तावना वाचनीय आहे.