September 9, 2024
A Collection of Sanskar Katha - Baba's Cycle
Home » संस्कार कथांचा संग्रह – बाबांची सायकल
मुक्त संवाद

संस्कार कथांचा संग्रह – बाबांची सायकल

मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा कथासंग्रह – बाबांची सायकल

मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक पात्रे, समायोचित घटना प्रसंग सुंदर संवाद ही या कथांची वैशिष्ट्ये आहेत. गुलाब बिसेन यांच्या या सर्वच कथा बोध करणाऱ्या संस्कार कथा आहेत.

मुलांना आनंद देणे आणि त्यांना बोधप्रद अशी शिकवण देणे या हेतूने मराठीत आजपर्यंत बालसाहित्य लिहिले गेले आहे. परिकथा, चातुर्यकथा, चिऊकाऊच्या कथा, राजा राणीच्या कथा त्यांनी आजपर्यंत मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातलेली आहे. अलीकडे मुलांच्या भावविश्वातील घटना घडामोडींचा वेध बालसाहित्यातून घेतला जात आहे. आपल्या अवतीभवतीचे विषय कथा कवितेत आल्यामुळे मुलांनाही याचे विशेष आवड निर्माण झाल्याचे दिसून येते. हाच धागा पकडून गुलाब बिसेन यांनी बाबांची सायकल आणि इतर कथा हा बालकथा संग्रह लिहिला आहे.

करील मनोरंजन जो मुलांचे |
नाते जडेल प्रभुशी तयाचे ||
याच पद्यपंक्तीला प्रमाण मानून मुलांचे मनोरंजन आणि त्याचबरोबर प्रबोधन करण्याचे काम तसेच त्यांच्या भावविश्वाला साद घालण्याचे काम यातील कथा करताना दिसतात. चोरून चिंचा खाणाऱ्या मुलांना वेगळी शिक्षा देणारे गुरुजी हिरवी शिक्षा या कथेमध्ये भेटतात. मुलांनी फळांच्या बिया जमा करायच्या आणि पावसाळ्यात त्यांची लागवड करायची असा शिक्षेचा एक उपक्रम ते राबवतात आणि मुलांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणतात. खऱ्या अर्थाने मुलांना निसर्ग शिक्षण देतात. तर पाणी बचतीचा संदेश देणारी पाणीपंचमी ही कथा खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे मुलांना शिक्षण देणारी आहे.

बाबांची सायकल ही शीर्षक कथा खूपच लक्षवेधी आहे. सायकल चोरीला गेल्यामुळे वडिलांचे होणारे हाल पाहून कथेतील मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेतील मिळालेले बक्षीस आपण वडिलांना सायकल घेऊन देते. तर डफली वादन करणाऱ्या आपल्या गुरूंचा अपघात झाल्याने शाळेच्या लेझीम पथकाची गैरसोय टाळण्यासाठी हिरू हा कथेचा नायक डफलीवादन करतो व हिरो ठरतो. तर मंग्या कथेतील सगळ्यांच्या थट्टेचा विषय असणारा नायक हा गुरुजींच्या दृष्टीने हिरो ठरतो. त्याचे कारण असे त्याच्या पिशवीतील खेकडा मुलांना दाखवून गुरुजी परिसर अभ्यास शिकवतात. गुरुजींच्या परीक्षेत मंग्या केवळ पास होत नाही तर गुरुजींच्या कौतुकास पात्र ठरतो.

हसऱ्या बिया या कथेतील बबीचा पर्यावरण विषयक दृष्टिकोण लेखकाने खूप छान टिपला आहे. तिच्या दप्तरात सापडलेल्या सिताफळाच्या बिया बाई कचरा समजतात. पण पुढे चार वर्षांनी तिच मुलगी बाईंना पिशवी भरून सीताफळे आणून देते. तेव्हा बाई त्याच्या बिया बबीला परत करतात. कधी कधी मुले सुद्धा शिक्षकांना आपल्या कृतीतून शिकवतात याचे उत्तम उदाहरण आहे.

फुलझाड ही बोधप्रद रूपक कथा आहे. अहंकाराचे बाजार झालेले झाड रुसते आणि एकाकी राहते. त्याला गर्वाची बाधा होते. त्यामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा येतो. वेळेवर चूक सुधारून घेतली पाहिजे हा संदेश ही कथा देते. तर छोटा संशोधक या कथेत शास्त्रज्ञ व्हायचे या कल्पनेने झपाटलेला नायक विनय आपल्याला भेटतो. तर रेनकोट या कथेत गरीब आणि श्रीमंत मुलांच्या परिस्थितीच्या जाणीवा लेखकाने व्यक्त केल्या आहेत.

मुलांना शिक्षणाबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख करून देणे. त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे. त्यांच्यावरती उत्तमोत्तम संस्कार करणे. त्यांना बोध देणे व त्यांची जाणीव जागृती करणे अशी काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच गुलाब बिसेन यांचे कथालेखन झाल्याचे दिसून येते. साधी सोपी आकलन सुलभ भाषा हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. सशक्त आणि समृद्ध अशी कथासूत्रे यामध्ये आहेत. मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक पात्रे, समायोचित घटना प्रसंग सुंदर संवाद ही या कथांची वैशिष्ट्ये आहेत. गुलाब बिसेन यांच्या या सर्वच कथा बोध करणाऱ्या संस्कार कथा आहेत.

पुस्तकाचे नाव – बाबांची सायकल आणि इतर कथा
लेखक – गुलाब बिसेन
प्रकाशक – जेके मिडिया, ठाणे
पृष्ठे – ६२
मुल्य – १००/- रू


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ईस्राईल अभ्यास दौरा केल्यानंतर…

जयश्री कुलकर्णी अंबासकर, वैशाली भागवत यांना ‘मेघदूत’ पुरस्कार जाहीर

बौद्ध वारसा जतन करण्यावर सरकारचा भर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading