April 19, 2024
how Swaraj built article by Rajendra Ghorpade
Home » स्वराज्य उभे राहाते तरी कसे ?
विश्वाचे आर्त

स्वराज्य उभे राहाते तरी कसे ?

हां गा राजन्यत्व नव्हता आंगी । रावो रायपण काय भोगी ।
कां आंधारू हन आलिंगी । दिनकरातें ।। ११४४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – राजेपण अंगी नसतां, राजा आपला राजेपणा भोगूं शकेल ? अथवा अंधार आपण अंधकाररूप राहून, सूर्याला अलिंगन देऊ शकेल.

प्रजेचे रक्षण करणे, प्रजेला न्याय देणे हे राजाचे सर्वात महत्त्वाचे गुण आहेत. हे तो देऊ शकत नसेल तर त्याला प्रजाच राजा म्हणून मान्य करणार नाही. पूर्वीच्याकाळी वन्य प्राण्याचा नागरी वस्तीत वावर होत असे. शेतीची नासाडी ते करत असत. अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे राजाचे कर्तव्य होते. तशी व्यवस्था उभी करणे हे राजाचे कर्म होते. प्रजेमध्ये सुख, शांती, समाधान नांदण्यासाठी राजाचे कर्म हे महत्त्वाचे असते. राजाची नियुक्ती वारसा हक्काने होत असली तरी त्याच्यातील गुणानुसार प्राधान्य दिले जात असे. यासाठी राजाची परिक्षाही घेतली जात असे. राज्याभिषेकावेळी राजाला विविध प्रतिज्ञा घ्याव्या लागत अन् त्याचे पालन करावे लागत असे. राज्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेल्या वचनाला कटिबद्ध राहाणे हा राजाचा धर्म आहे. हा राजधर्म त्याला पाळावा लागतो. हे गुण नसतील तर तो राजपदावर बसण्या योग्य आहे का ?

नुसते राजेपण मिरवणारे कधी राजे होत नसतात ? राजा हा प्रजेच्या हृदयात असावा लागतो. हल्ली मतांची गोळाबेरीज करून राजकर्त्ये होत आहेत. हे राजकर्त्ये केवळ सत्ता आपल्या हातात कशी राहील हेच पाहात असतात. या सत्तेच्या खेळात लोकशाहीत जनता भरडली जात आहे. हल्ली तर ही गोळाबेरीज करणारी यंत्रणाच उभी राहीली आहे. हे लोकप्रतिनिधी कधीच राजे होऊ शकत नाहीत. हे जनतेचे सेवकही नसतात. केवळ स्वतःची घर भरणारे अन् मान मिरवणारे जनतेचे लुटारू आहेत. यांना आपण राजकर्त्येम्हणू शकू का ? अशांच्याकडून विकास काय होणार ? अशांच्या नियोजन शुन्य कारभारामुळेच वरवर विकास दिसत असला तरी यात धरतीचा मोठा ऱ्हास झाला आहे. प्रजेच्या हितासाठी, सर्वांगिन विकासासाठी दूरदृष्टी ठेवून विचार करण्याचे सामर्थ्य राजाजवळ असायला हवे.

राजमहालात राहातो, सर्व ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी असते तरीही त्याला प्रजेमध्ये जाऊन वारसाहक्क सांगावा लागत असेल तर हे कसले राजे ? राजा कोठेही असला, सर्व सामान्यांच्यात असला तरी तो त्याच्या गुणांनी राजेपण सिद्ध करत असतो. यासाठी राजाचे गुण कोणते आहेत अन् तो स्वराज्य कसे उभे करतो हे अभ्यासणे गरजेचे आहे. हिंसेने किंवा दुसऱ्याचे राज्य हिसकावून घेऊन किंवा जिंकून मिळवलेले राज्य हे कधीच स्वराज्य असू शकत नाही. वारसा हक्कासाठी भांडून किंवा दुसऱ्याजवळ भिक मागून मिळवलेले राज्य हे स्वराज्य होऊ शकत नाही. मग स्वराज्य म्हणजे काय ? प्रजेला स्वतःचे राज्य वाटायला हवे. आपले हक्काचे राज्य वाटायला हवे इतका विश्वास त्यांच्यात निर्माण व्हायला हवा असे राज्य उभे करणे म्हणजे स्वराज्य. प्रजेच्या हितासाठी, प्रजेच्या न्यायासाठी उभा केलेले राज्य असते ते स्वराज्य असते.

प्रजेच्या न्याय हक्कासाठी उभा केलेले राज्य हे राजाच्या नावावर असले तरी ते राज्य मुळात प्रजेचे असते. प्रजाच राजावरील विश्वासाने ते राज्य उभे करत असते. राजा या सर्व गोष्टीत निमित्तमात्र असतो. तो सार्वभौम राजा छत्रपती जरी झाला तरी तो निमित्तमात्रच असतो. सर्व त्याच्याचमुळे असते, पण तो यापासून अलिप्त असतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये लोकशाही उभी राहीली आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी उभा केलेले ते शासन आहे. ही लोकशाहीच राजाला नियुक्त करत असते. राजाला वारसाहक्काने राज्य प्राप्त होत असले तरी तो त्या पदाला योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियमावली असते. हे ठरवणारी स्वतंत्र व्यवस्था, प्रशासन असते. त्या नियमावलीनुसारच राजा हा ठरवला जात असतो. असा राजाच सुराज्य उभे करत असतो. नियमावलीतील परिक्षेचा पेपर फोडून राजे होऊ पाहाणारे कधी सुराज्य उभे करू शकत नाहीत. असे राजे कधी स्वराज्य उभेही करू शकत नाहीत. कारण स्वराज्य हे प्रजाच राजासाठी उभे करत असते. तसा विश्वास राजाने प्रजेमध्ये निर्माण केलेला असतो. असा राजा मग तो महालात असला काय अन् सर्वसामान्यांच्यात असला काय ? खऱ्या अर्थाने तो राजाच असतो. अशा राजाच्या प्रकाशाने राज्यातील सर्व अंधार दूर होतो.

Related posts

सद्गुरुभाव रुपात भक्ती हीच खरी भक्ती

बारामतीमधील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा एक ऐतिहासिक अन् क्रांतिकारी प्रयोग

डॉ. यशवंत थोरात त्यांच्या लेखनातून माणूसपणाचे अधोरेखन

Leave a Comment